पेस-स्टेपनेकची विजयी सलामी Print

वर्ल्ड टूर फायनल टेनिस स्पर्धा
पी.टी.आय., लंडन
वर्ल्ड टूर फायनल टेनिस स्पर्धेत लिएण्डर पेस-राडेक स्टेपनेक जोडीने विजयी सलामी दिली. सातव्या मानांकित ऐसाम उल हक कुरेशी आणि जिन ज्युलियन रॉजर जोडीवर पेस-स्टेपनेक जोडीने ६-४, ७-५ अशी मात केली.
ताकदवान परतीचे फटके आणि नेटजवळचा सुरेख खेळ यांच्या जोरावर पेस-स्टेपनेक जोडीने हा विजय साकारला. पहिल्या सेटमध्ये स्टेपनेकने एक ब्रेकपॉइंट वाचवला तसेच कुरेशीची सव्‍‌र्हिस भेदत पेस-स्टेपनेक जोडीने पहिला सेट नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये पेस-स्टेपनेक जोडीला संघर्ष करावा लागला. स्टेपनेकने सलग चार गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. रॉजरची सव्‍‌र्हिस भेदत या जोडीने ६-५ अशी आगेकूच केली. सहा ब्रेकपॉइंट्स गमावल्याने कुरेशी-रॉजर जोडीला पराभवाला सामारे जावे लागले.
महेश भूपती-रोहन बोपण्णा या भारतीय जोडीचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आल्याने लिएण्डर पेसकडून अपेक्षा वाढल्या आहेत.