भारताची फिरकी साधी, सोप्पी - स्वान Print

वृत्तसंस्था, अहमदाबाद
इंग्लंडच्या संघाला फिरकीच्या जाळ्यात ओढण्याचे भारताचे डावपेच सुरू आहेत. साध्या सराव सामन्यांमध्येही इंग्लंडला भारताने स्थानिक फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी करण्याची संधी दिली नाही, असे एकीकडे होत असतानाच भारताच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने एक वक्तव्य करत खळबळ उडवून दिली. ‘भारताची फिरकी गोलंदाजी ही साधी, सोप्पी आहे. त्यामध्ये अनाकलनीय किंवा गूढ असं काहीही नाही,’ असे स्वानने म्हटले आहे. या वक्तव्यानंतर द्राक्ष न मिळालेल्या कोल्ह्य़ासारखी भूमिका स्वानने व्यक्त केली असल्याचे क्रिकेट वर्तुळात म्हटले जात आहे.
पाकिस्तानविरुद्ध आम्ही पराभूत झालो, कारण त्यांच्याकडे सइद अजमलसारखा दर्जेदार फिरकीपटू होता. पण भारताकडे असलेल्या आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांची गोलंदाजी साधी, सोप्पी आहे. त्यांच्या गोलंदाजीमध्ये नावीन्य पाहायला मिळत नाही. त्यांचे चेंडू आणि जुन्या फिरकीपटूंच्या चेंडूंमध्ये जास्त फरक जाणवत नाही. त्यामुळे आमच्यासाठी भारताची फिरकी ही साधी आणि सोपी असेल, असे स्वानने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, या दौऱ्यावर येण्यापूर्वी आम्ही दुबईमध्ये काही सामने खेळलो, त्या वेळी पाकिस्तानच्या फिरकीपटूंपुढे आम्हाला खेळणे सोपे गेले नव्हते. कारण त्यांच्या फिरकीमध्ये विविधता होती, त्यांच्या फिरकीपटूंकडे वेगवेगळे चेंडू होते. पण भारताच्याबाबतीत मात्र तसे बोलता येणार नाही. कारण भारताच्या संघात असलेल्या फिरकीपटूंमध्ये विविधता नाही. त्यामुळे भारताच्या फिरकीपटूंना आम्ही घाबरलो आहोत, हे म्हणणे साफ चुकीचे आहे. त्यांचा सामना कसा करायचा हे आम्हाला चांगलेच माहिती आहे.