संक्षिप्त : शेरेबाजी हलक्याफुलक्या स्वरूपात स्वीकारावी -सचिन Print

मुंबई : जगातल्या भेदक अशा गोलंदाजांचा सामना केलेल्या सचिन तेंडुलकरने गोलंदाजांकडून होणाऱ्या शेरेबाजीचाही पुरेसा सामना केला आहे. मात्र त्यांनी केलेली शेरेबाजी हलक्याफुलक्या स्वरूपात स्वीकारावी, असे मत सचिनने व्यक्त केले. स्मॅश सिम्युलेटर गेमिंग केंद्राचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असलेला सचिन म्हणाला की, ‘‘प्रत्येक गोष्टीमागे एखादी हलकीफुलकी गोष्ट दडलेली असते. महान खेळाडूंकडून काहीतरी शिकायचे असते. वेगवान गोलंदाजांकडून तुम्हाला बरेच काही ऐकायला मिळते. मात्र या गोष्टींची नोंद ठेवण्याची किंवा लक्षात ठेवण्याची कोणतीही गरज नसते.’’         

खो-खो : ठाणे, मुंबई उपनगरची दमदार सलामी
मुंबई : महाराष्ट्र खो-खो संघटनेतर्फे आयोजित ४९व्या वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत मुंबई उपनगर आणि ठाणे या संघांनी दमदार सुरुवात केली. गारखेडा, औरंगाबाद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबई उपनगरने नाशिकवर १ डाव आणि २ गुणांनी मात केली. उपनगरतर्फे मयूरी पेडणेकर, सोनिया मिठबावकर आणि शिल्पा जाधव यांनी सुरेख खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला. पुरुष गटात ठाणे संघाने बीडला १ डाव आणि ३ गुणांनी नमवले. अमित पवार, सचिन पालकर आणि महेश मढवी या विजयाचे शिल्पकार ठरले. दुसऱ्या लढतीत सांगलीने हिंगोली संघाचा २३-५ असा १ डाव आणि १८ गुणांनी धुव्वा उडवला. सांगलीच्या विजयात नरेश सावंत आणि युवराज जाधव चमकले.     

राज्यस्तरीय सिपॅक टॅकरो स्पर्धा
ठाणे : ठाणे जिल्हा सिपॅक टॅकरो असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या मान्यतेने २३वी महाराष्ट्र राज्य सिपॅक टॅकरो स्पर्धा ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सेकंड हार्ट स्कूल, कल्याण येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष आणि महिला गटात ही स्पर्धा होणार असून २० हून अधिक जिल्ह्य़ांचे संघ सहभागी होणार आहेत. रेगू आणि सांघिक अशा दोन प्रकारांत ही स्पर्धा होते. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेद्वारे निवडला जाणार आहे.     

सी. के. नायडू स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर
मुंबई : सी. के. नायडू एलिट ‘क’ गटाच्या लढतीसाठी मुंबईचा २५ वर्षांखालील संघ जाहीर करण्यात आला. ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात यूपीसीएविरुद्ध ही लढत होणार आहे. मुंबईचा संघ : सर्वेश दामले (कर्णधार), स्वप्नील साळवी, ब्राव्हिश शेट्टी, सुफियान शेख, निळकंठ परब, सिद्धेश लाड, निखिल पाटील ज्युनियर, गौरव जठार, निखिल मांडले, सागर गोरीवले, जावेद खान, प्रतीक दाभोळकर, मोहम्मद आमीर, ओनिंदर सिंग, सौरभ नेत्रावळकर.    

पहिली मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा
मुंबई : लालबागच्या बाल शिवाजी क्रिकेट क्लबतर्फे पहिल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत लालबाग म्युनिसिपल स्कूल, लालबाग येथे ही स्पर्धा रंगणार आहे. पुरुष आणि महिला एकेरी अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे प्रवेश आणि नोंदणी शुल्क प्रत्येकी १०० रुपये भरून आपल्या क्लबमार्फत ९ आणि १० नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत मुंबई जिल्हा कॅरम संघटना, वूलन मिल म्युनिसिपल शाळा, माटुंगा (पश्चिम) येथे नोंदवावीत.

एनएससीआयमध्ये टेबल टेनिस स्पर्धा
मुंबई : वरळीच्या एनएससीआय क्लबमध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी दोनशेहून अधिक प्रवेशिका आल्या असून, शहरातील अव्वल टेबल टेनिसपटू सहभागी होणार आहेत. पुरुष आणि महिलांमध्ये कॅडेट, सब-ज्युनियर, ज्युनियर, यूथ अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.     

ट्वेन्टी-२० क्रिकेट : डी. वाय. पाटील संघ अजिंक्य
मुंबई : ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि भिवंडी महानगरपालिका क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित धनराज सोळंकी स्मृती ट्वेन्टी-२० स्पर्धेत डी. वाय. पाटील संघाने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात डी. वाय. पाटीलने टाटा स्टीलवर १८ धावांनी मात करत जेतेपद पटकावले. डी. वाय. पाटीलने श्रीदीप मांगेलाच्या ४५ चेंडूत ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत १८८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखलटाटा स्टीलला १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. करण मोरेने ९२ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. करणलाच सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.     

एमआयजीतर्फे रवी सावंत यांचा सत्कार
मुंबई : वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लबतर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत आणि कोषाध्यक्ष मयांक खांडवाला यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅबी कुरुविल्ला, अमित दाणी, दीपक जाधव, संजीव जाधव, अतुल रानडे आणि नीलेश भोसले या निवड समिती सदस्यांसह मुंबईच्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी आणि भारतीय महिला संघाच्या व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य यांनाही गौरविण्यात आले.