प्राजक्ताच्या आरोपांप्रकरणी संघटना योग्य निर्णय घेतील- गोपीचंद Print

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
युवा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतने केलेल्या कथित आरोपांप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी नकार दिला. यासंदर्भात भारतीय बॅडमिंटन संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण निर्णय घेईल, असे त्यांनी पुढे सांगितले.
‘आता या प्रकरणाबाबत मला काहीही बोलायचे नाही. संबंधित संघटनांना या प्रकरणाची पूर्ण कल्पना आहे. त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. योग्य वेळी, योग्य निर्णय आम्ही घेऊ’, असे गोपीचंदने स्पष्ट केले. मुंबई गेम्स या बहुविध क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी गोपीचंद मुंबईत आला होता.
दरम्यान, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ताला राष्ट्रीय शिबिरात सामील होण्यास मान्यता दिली. महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत साथीदार बदलणाऱ्या प्राजक्ताला राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याची परवानगी प्रशिक्षक गोपीचंद यांनी नाकारली होती.