मुंबईची गाठ राजस्थानशी Print

रणजी करंडक क्रिकेट
पी.टी.आय., जयपूर
सचिन तेंडुलकर, झहीर खान, अजिंक्य रहाणे, अजित आगरकर या नावाजलेल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबई संघाची शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या रणजी सामन्यात गाठ पडणार आहे, ती सलग दोनदा विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान संघाशी. हे महत्त्वाचे खेळाडू संघात नसले तरी या सामन्यात यजमानांना धक्का देऊ, असा विश्वास मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे.
वानखेडेच्या खेळपट्टीने साथ न दिल्याने दिग्गज खेळाडू असूनही मुंबईच्या संघाला पहिल्या सामन्यात रेल्वेवर पहिल्या डावाच्या आघाडीवर तीन गुणांवर समाधान मानावे लागले होते, तर दुसरीकडे राजस्थाननेही बंगालवर पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर तीन गुण कमावले होते. त्यामुळे शुक्रवारपासून होणाऱ्या दुसऱ्या रणजी सामन्यात दोन्ही संघ निर्णायक विजयासाठी प्रयत्न करतील.