केदारच्या शतकाने महाराष्ट्राचा भक्कम प्रारंभ Print

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, पुणे
केदार जाधव याने केलेले नाबाद शतक तसेच हर्षद खडीवाले, संग्राम अतितकर व अंकित बावणे यांची दमदार अर्धशतके यामुळेच महाराष्ट्राने उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात भक्कम सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात ३ बाद ३३९ धावा केल्या.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू झालेल्या या लढतीत पहिला दिवस महाराष्ट्राच्या फलंदाजांचाच ठरला. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर उत्तर  प्रदेशच्या अनुभवी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्यांनी आश्वासक सुरुवात केली. महाराष्ट्राने चिराग खुराणा (२१) याची विकेट लवकर गमावली. मात्र त्यानंतर खडीवाले याने अतितकरच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. खडीवाले याने २१९ मिनिटांच्या खेळात ८ चौकारांसह ६८ धावा केल्या.