क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज -द्रविड Print

पी.टी.आय., भुवनेश्वर

खेळात मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता खेळ आणि तंदुरुस्ती याबाबतीत आता क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले.‘‘छोटय़ा यशानेही आपण समाधानी असतो. अव्वल खेळाडूंनी त्यांच्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवलेले असते. मात्र त्यांच्या यशात अनेकांची मेहनत दडलेली असते. खेळात चांगले यश मिळवायचे असल्यास, निकालाकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सहा दशकांत क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेता आलेली नाही. त्याउलट लहान देशांनी अनेक स्टार खेळाडू घडवले,’’ असेही द्रविडने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘खेळामध्ये जास्त धोका असल्यामुळे योग्य शिक्षण घेऊन कारकीर्द घडवणे, हाच सुरक्षित पर्याय आहे, असा भारतातील लोकांचा समज आहे. त्यात सध्या तरी कोणताही बदल होणार नाही; पण काही धाडसी पालक आपल्या मुलांना शालेय शिक्षणाऐवजी खेळात कारकीर्द घडवण्याची सवलत देऊ लागले आहेत. अमेरिका किंवा दक्षिण आफ्रिकेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच खेळातही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचप्रमाणे खेळांवर आपण लक्ष द्यायला सुरुवात केली तरी अनेक हरहुन्नरी आणि गुणवान खेळाडू पुढे येतील. त्यांना खेळाबरोबरच उच्च दर्जाचे शिक्षण घेता येईल, अशी सोयही उपलब्ध करून द्यायला हवी. सुशिक्षित अ‍ॅथलीट तयार झाल्यास, ते अधिक जबाबदारीने, विचारपूर्वक आणि अधिक उज्ज्वल कारकीर्द घडवू शकतील.’’
तळागाळातील गुणवत्ता शोधून काढणे, ही क्रीडा संघटनांची मुख्य भूमिका असायला हवी, असे द्रविडला वाटते. तो म्हणतो, ‘‘योग्य गुणवत्ता शोधून काढून त्यांना चांगले व्यासपीठ करून देणे तसेच त्यांच्या भरभराटीस प्रयत्न करणे, हे क्रीडा संघटनांचे उद्दिष्ट असायला हवे. त्याचबरोबर क्रीडा प्रशासकांनी खेळाडू तयार करण्याबरोबरच चाहते वाढविण्यावरही लक्ष केंद्रित करायला हवे.’’