पश्चिम, मध्य रेल्वे उपांत्यपूर्व फेरीत Print

आरसीएफ कबड्डी स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे संघांनी आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पश्चिम रेल्वेने यजमान राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचा २२-१० असा सहज पाडाव केला, तर मध्य रेल्वेने आपल्या भक्कम बचावाच्या आधारे देना बँकेला ६-५ असे हरवले.
युनियन बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्यात निर्धारित वेळेत ४-४ अशी बरोबरी झाल्याने ५-५ डावांच्या ‘टायब्रेक’मध्ये पोलिसांनी ९-६ अशी बाजी मारली. पहिल्या तीन चढायांमध्ये ५-१ अशी आघाडी पोलिसांनी घेताच युनियन बँकेला आपल्या पराभवाची जाणीव झाली होती. मुंबई पोलिसांना सीमा सुरक्षा दलाने २३-२० असे हरवले.
आता उपांत्यपूर्व फेरीत ओएनजीसी वि. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे वि. भारत पेट्रोलियम, केंद्रीय राखीव पोलीस दल वि. सीमा सुरक्षा दल आणि एअर इंडिया वि. महाराष्ट्र पोलीस अशा लढती होतील.
महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत महात्मा गांधी अकादमीला ३२-२३ असे पराभूत केले. चेंबूर क्रीडा केंद्राने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सला २६-२२ असे नमवले.