अग्रलेख : प्रतीकांचा युगधर्म Print

 

शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान केल्याबद्दल असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकारावर देशनिंदेचा (सेडिशन) गुन्हा दाखल होऊन नऊ महिन्यांनी हा व्यंगचित्रकार स्वत:ला अटक करवून घेतो, त्याच्यावर पोलिसांनी जणू आत्ताच देशद्रोहाचा (ट्रेचरी) गुन्हा लादला आहे असा गवगवा होतो आणि मग, महाराष्ट्रातील दोन सुपरिचित व्यंगचित्रकार नेते या त्रिवेदीची पाठराखण करतात. हा घटनाक्रम गेल्याच आठवडय़ात घडला.

त्रिवेदीच्या व्यंगचित्रकलेची वाखाणणी शिवसेनाप्रमुख वा मनसेप्रमुखांनी केलेली नसली, तरी संसदीय परंपरांना काळिमा फासणाऱ्यांविरुद्ध किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध व्यंगचित्रे काढणाऱ्यांना गुन्हे-अटक अशा पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणे गैर आहे, असा मुद्दा या दोघांनी मांडला आहे. देशाच्या प्रतीकांची अवहेलना म्हणजे जाणूनबुजून देशाबद्दल अप्रीती निर्माण करणारा देशविरोधी प्रचारच, असा जो अर्थ सध्याच्या कायद्यातील एका कलमामुळे काढता येतो, ते कलमच रद्द करून टाकण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्यात आता त्रिवेदीची भर पडली आहे. जी व्यंगचित्रे कित्येक लोकांना देशविरोधी वाटली नाहीत, ती एखाद्याला तशी वाटली म्हणून व्यंगचित्रकाराला देशविरोधक ठरवणे गैर आहे आणि त्यासाठी कडक कायद्यांचा आधार घेणे त्याहून गैर आहे, असा त्रिवेदी प्रकरणाचा अर्थ निघतो. हा अर्थ, प्रतीके सशक्तच आणि पवित्रच मानली गेली पाहिजेत, या जुन्या गृहीतकाशी फारकत घेणारा आहे. ज्ञात इतिहासात मध्ययुगापासून प्रतीकांचे पावित्र्य पाळले जाते आणि एखाद्या गोष्टीला प्रतीक मानले की तिच्याविरुद्ध काहीही उणे होऊ न देण्याची जबाबदारी हे प्रतीक मानणाऱ्यांवर येऊन पडते. ही मध्ययुगीन संकल्पनाच राष्ट्र- राष्ट्रीय प्रतीके आदींना जन्म देणाऱ्या आधुनिक काळातही मानली जात होती. दलाक्रॉच्या ‘लिबर्टी लीडिंग द पीपल’पासून पिकासोने शांति-प्रतीक ठरवलेल्या कबुतरापर्यंत अनेक कलाकृतींनी युरोपीय लोकांच्या मनात घर केले, याचे एक कारण इतकी सशक्त प्रतीके आजही निर्माण होताहेत, याचा लोकांना आनंद मिळाला. ‘चरखा चला चला के’ स्वराज्य आणू पाहणाऱ्यांना चरख्याचे प्रतीक सशक्तच वाटत होते. मात्र प्रतीके अशक्तही ठरू शकतात, ती पवित्र वगैरे तर नसतातच, असे मानणाऱ्या उत्तर आधुनिक विचारवाटेवरून चालणाऱ्यांची संख्या पाश्चात्त्य जगात गेल्या ६० वर्षांत वाढू लागली. हा वैचारिक बदल म्हणजे केवळ विचारवंतांनी केलेला शब्दच्छल नव्हता.. ब्रिटनचा युनियन जॅक असलेल्या ‘बिकिनी’ तोवर बाजारात आल्या होत्या!
उत्तरआधुनिक म्हणजे आधुनिकापेक्षाही खूप जास्त आधुनिक, असा अर्थ चुकीचाच आहे आणि उत्तरआधुनिक प्रेरणा ही सामूहिक नसून स्वतपुरती असल्यामुळे नवनिर्माण, उत्थान, त्यासाठी प्रसंगी बंडखोरी यांची चर्चा उत्तरआधुनिक स्थितीत फोलच ठरेल, असेही हे विचारवंत सांगत होते. त्या सांगण्याचा खरेपणा तात्काळ पटला, तो आधुनिक रूपाला फाटा देऊन रोमन इमारतींसारखी बाह्य सजावट असलेल्या इमारती उभारणाऱ्या काही उत्तरआधुनिक वास्तुरचनाकारांमुळे. रोमन इमारतींची बाह्य सजावट हे रोमन साम्राज्याच्या काळाचे प्रतीक मानले जाई; तो अर्थ आणि प्रतीकपणाच हिरावून घेतला गेला. हॉटेले वा ऑफिसे असलेल्या इमारतीदेखील रोमन बाह्य-सजावटीच्या दिसू लागल्या. हे उत्तरआधुनिक विचारांशी सुसंगत मानले गेले.
या साऱ्याला दुसरी बाजूही आहे. रोमन साम्राज्य- मध्ययुग- पुनरुत्थानाचा काळ- प्रबोधनकाळ- आधुनिकता अशी पाश्चिमात्य विचार-कल्पनांच्या इतिहासाची, म्हणजे हिस्टरी ऑफ आयडियाजची थेट साखळी सांगता येते. सामाजिक उत्थानासारख्या कल्पनांचे गोडवे गाणारी ही साखळी उत्तरआधुनिकतावादाने मोडीत काढली आणि या साखळीमध्ये कधी ना कधी पवित्र ठरलेल्या प्रतीकांना आज काही अर्थ नाही, हेही दाखवून दिले. उत्तरआधुनिकतावादाने कुठलीच नवी भर घातली नाही आणि हा काही सिद्धान्त नव्हेच, अशी टीका होत असते. युरोपीयांनी इतिहासाला आणि जगण्याचे अवलोकन करणाऱ्या विचाराला बांधलेली सैद्धान्तिक साखळीच उत्तरआधुनिकतावादाने कमकुवत केली हे खरे आणि त्यामुळे एक मात्र बरे झाले : आशियाई, आफ्रिकी समूहांचे वैचारिक इतिहासदेखील तितकेच महत्त्वाचे असू शकतात, याचे भान युरोपात वैचारिक शब्दच्छलावर गुजराण करणाऱ्यांनाही आले! याचे कारण, प्रतीके आपलीच तेवढी खरी असे मानणारी मध्ययुगीन जाणीव सुटली. पण कुणाची? पाश्चात्त्यांचीच. इंडोनेशिया वा श्रीलंकेत, अफगाणिस्तानात वा भारतात ही प्रतीक-पावित्र्याची जाणीव आजही लोकजीवनात रुजलेली असू शकते, भले ती मध्ययुगीन असली तरी लोकांच्या सामूहिक व्यवहारांत तिला स्थान असू शकते,  हा समूह-व्यवहार जेव्हा धर्माचा असतो, तेव्हा पावित्र्याबाबत तडजोड अजिबात नसते, हे पाश्चिमात्यांना सैद्धान्तिकदृष्टय़ा कळतेच असे नाही. ‘ओरिएंटॅलिझम’कर्त्यां एडवर्ड सैद यांनी पाश्चात्त्य सिद्धान्तातली ही उणीव भरून काढणाऱ्यांची फळीच निर्माण केली. आज इस्लामी जगतात जो दहशतवाद माजतो आहे त्याचे वैचारिक मूळ अप्रत्यक्षपणे सैद यांच्या विचारांतही शोधता येईल, असे काही पाश्चात्त् य अभ्यासकांचे म्हणणे आजही आहे, एवढी वैचारिक दरी! पण ती असण्याचे कारण नाही, प्रतीके पवित्र असतात ही मध्ययुगीन जाणीव अमेरिकेत, युरोपात वा ऑस्ट्रेलियातही जिवंत असल्याचे दिसतेच.. ‘पवित्र धार्मिक प्रतीका’चा अपमान झाला की लगेच हिंसक होणारे गट अमेरिकी, स्वीडिश, फ्रेंच, वा ऑस्ट्रेलियन लोकांचेही असू शकतात. धार्मिक प्रतीकांबद्दल जिवापाड प्रेम सर्वच धर्माच्या अभिमान्यांना हिंसेकडे नेऊ शकते. १९८७ साली आंद्रेआ सिरॅनो याने टिपलेल्या ‘पिस ख्राइस्ट’ या फोटोची मोडतोड फ्रान्समध्ये २०११च्या एप्रिल महिन्यात झाली, पण अगदी १९८७ पासूनच अमेरिकेतील कॅथलिक गटांनी या फोटोवर बंदी आणली होती! अभिव्यक्तीस्वातंत्र्याची परिसीमा गाठणाऱ्या अमेरिकेत ही बंदी आली, कारण हे छायाचित्र दाखवले गेलेल्या सर्व सामाजिक सेवांची मदत बंद करून टाकण्याचा इशारा चर्चच्या संघटनांनी दिला होता. देशाला धर्मापुढे झुकवण्याचा हा अहिंसक, पण असहिष्णू मार्ग होता. पण ऑस्ट्रेलिया, स्वीडन आदी देशांत या फोटोसह सिरॅनोच्या प्रदर्शनाची मोडतोडच कॅथलिकांनी केली. पुन्हा असे कराल तर परिणाम हिंसकच होतील, अशा धमक्याही दिल्या.
राष्ट्रीय वा धार्मिक प्रतीकांची अवहेलना काहीजणांना असह्य झाल्यास उसळणारा आगडोंब किती असतो, हे गेल्या दोन दिवसांत पश्चिम आशियातील देशांमध्ये दिसू लागले आहे. इजिप्त, लिबिया, येमेन आदी देशांत अमेरिकेविरोधात हिंसाचार उसळला, अमेरिकी राजदूतासह तिघांचा बळी गेला, याला कारण ‘द इनोसन्स ऑफ मुस्लिम्स’ या चित्रपटाची अवघ्या १४ मिनिटांची झलक. यूटय़ूबमुळे ही झलक जगभर पोहोचली, पण चित्रपट तयार आहे की नाही कुणालाच माहीत नाही. तो कुणी तयार केला, हेही गुलदस्त्यात. इंटरनेट-युगात जी अनामिक राहून प्रचार आणि अपप्रचारही करण्याची सोय आहे, ती या चित्रपटाने- वा त्याच्या ट्रेलरने - पुरेपूर वापरली. याबद्दलच्या बातम्या येतच आहेत आणि त्यातून इस्लामचे आजचे अनुयायी हिंसक प्रतिक्रियेचा अतिरेक करतात, असेही निष्कर्ष निघणारच आहेत. हिंसक प्रतिक्रियांचा संबंध गरिबीशी असतो का? गरीब देश, गरीब वस्त्या येथेच प्रतिक्रिया नेहमी हिंसक का असतात, असेही प्रश्न विचारले जाणारच आहेत.
धर्म ही संकल्पना मध्ययुगापर्यंत विकसित होत होती. पुढे ती दृढ झाली. धर्मात दृढ असलेल्या प्रतीकांचे पावित्र्य राखण्याच्या कल्पनाही मध्ययुगीन असणारच आणि धार्मिक प्रतीकाच्या अवमानावरची मध्ययुगीन प्रतिक्रिया म्हणजे थेट धर्मयुद्धच, याचे वैचारिक भान पाश्चात्त्यांसह सर्वानाच असायला हवे. प्रतीकांचे पावित्र्य कायम राहात नसते आणि लोक बदलतात किंवा प्रतीकांच्या अर्थाशी असलेले नाते बदलते तशा पावित्र्याच्या संकल्पनाही बदलतात, कमकुवत होतात, हे उत्तरआधुनिक विचारवंतांचे म्हणणे योग्यच असल्याचे भारतात, मुंबईत असीम त्रिवेदीच्या प्रकरणातून दिसले. राष्ट्रीय प्रतीकांबद्दल लोकांना आदर वाटेल असे वर्तन राजकारण्यांकडून हवे आहे, असे बजावण्यासाठी प्रसंगी या प्रतीकांचा अवमान करणारी व्यंगचित्रे काढण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे.. म्हणजे लोकांनी ते त्याला देऊ केले आणि नेत्यांनी ते ओळखले. अर्थात, नेते देशाला नागवतात, हे सांगण्यासाठी भारतमातेचे प्रतीक वापरण्याची परवानगी असीमला नाही. त्या प्रतीकाचे पावित्र्य विशिष्ट धार्मिक गट अद्यापही जपतो, हे एम. एफ. हुसेन प्रकरणातून दिसले होतेच. प्रतीकांचा युगधर्म आज एकाच काळात दोन टोकांचा दिसतो, तो असा.