अग्रलेख : समाजवादी बेनं Print

बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२
भारतवर्षांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यांनी आतला आवाज ऐकून सत्तेपासून दूर राहायचा निर्णय घेतला त्या त्यागमूर्ती सोनियाजी गांधी यांच्यासाठी जो प्रसंगी नश्वर नरदेहाचा त्यागही करावयास तयार आहे, त्या सलमान खुर्शीद यांच्यासाठी ७१ लाख रुपडे ते काय? याची आम्हा जनताजनार्दनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, दरमहा वेतनातूनच कापला जातो म्हणून प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या सामान्य जनास कशी कल्पना असणार? आणि मुदलात ७१ लक्ष रुपयांचा संबंध आमच्यासारख्या अनेकांच्या अनेक पिढय़ांत कधी आलेला नाही. अनेकांच्या तर अनेक पिढय़ांचे वेतन, खरेखुरे भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आदी रकमेची बेरीज केली तरी ती ७१ लाख होणार नाही. तेव्हा ७१ लाख कसे असतात ते आम्हास कसे कळावे? आमच्यापैकी अनेक जण मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार किंवा गेला बाजार जिल्हाधिकारीदेखील नाही. तेव्हा आम्हास इतकी कोणी लाच देण्याचीही शक्यता नाही. दिवाळीत जरी भेटी आल्या तरी मिठाई वा पेन यांच्यापलीकडे आमच्या भेटी जात नाहीत. तेव्हा आम्हास ७१ लाखांची भेटही कोणी देण्याची शक्यता नाही आणि आमची विद्यमान स्थावर, जंगम आणि संभाव्य मालमत्ता जरी एकत्र केली तरी तिची किंमत ७१ लाख होणार नाही अशी आमच्यासारख्या अनेकांना खात्रीच असणार. आम्ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महापालिका आयुक्त जयराज फाटक, रामानंद तिवारी वा तत्सम कोणी नाही. सबब घर देण्याइतके  आम्ही आदर्श नाही. तेव्हा ७१ लक्ष रुपयांचे मोल आम्हास कसे समजावे? त्यात पुन्हा अपक्ष आमदार वा खासदार म्हणून आमच्यासारखे अनेक जण निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी वा पाडण्यासाठी आम्हास कोणी इतकी रोख रक्कम देईल असेही नाही. तेव्हा या सगळय़ाचा अर्थ इतकाच की ७१ लक्ष रुपये म्हणजे किती भरतात हे आम्हास कसे ठावे असणार? तेव्हा बेनी प्रसाद वर्मा जे म्हणतात ते आम्हास शतश: मान्य आहे. असे लक्ष लक्ष रुपये हाताळण्यातील बेनी प्रसाद वर्मा यांचा अधिकार दांडगा आहे, याचीही आम्हास कल्पना आहे. मुळातले हे समाजवादी. त्यातही उत्तर प्रदेशी. तेव्हा समाजवाद ते माजवाद असा त्यांचा प्रवास असणार हे सांगण्यास राजकीय विश्लेषक असण्याची गरज नाही. समाजवादीतील स ज्यांच्या आयुष्यात सोयिस्कररीत्या योग्य वेळी गळाला अशांची उत्तरदेशीय प्रभावळ मोठी आहे. मुलायमसिंग हे अशांचे मेरुमणी. त्यांच्याइतके मुलायम स्थित्यंतर कोणाचेच झाले नाही. समाजवादातील स गाळणारे त्यांचे बिहारी सहकारी म्हणजे लालू प्रसाद यादव. बेनी प्रसाद या मंडळींच्या सहवासातले. दक्षिणेतले असे स सोडणारे समाजवादी हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा यांच्या आयुष्यात समाजवाद सुफळसंपूर्ण होऊन पंतप्रधानपदी बसण्याचा योग आला त्या वेळी बेनी त्यांच्या समवेत होते. परंतु देवेगौडा यांचा बराचसा काळ पेंगण्यात गेला. त्यामुळे त्यांना बेनी यांच्यातील गुणांची पुरेशी जाणीव झाली नाही. देवेगौडा यांनी बेनींना दळणवळण मंत्री केले खरे. पण त्यात बेनी यांच्या कर्तृत्वास मान मिळू शकला नाही. समाजवादी म्हणवून घेणाऱ्या बऱ्याच जणांच्या बाबतीत असे होते. आपण इतके गुणवान आहोत की समाजास आपल्या गुणांची जाणीव नाही याची खात्री समाजवादी म्हणवून घेणाऱ्यास पटलेलीच असते. किंबहुना असेही म्हणता येईल की अशी खात्री पटल्याखेरीज समाजवादी होताच येत नाही. तेव्हा बेनी यांचीही तशी पुरेशी खात्री झाल्यावर त्यांना जाणीव झाली की आपला समाजवाद हा आता मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षात मावणार नाही. दुसरे असे की त्या पक्षाच्या नावातच समाजवाद. त्यामुळे सगळेच समाजवादी. तेव्हा समाजवाद्याने समाजवाद्यांच्या कळपातच राहण्यात काय हशील, असा रास्त सवाल बेनी प्रसाद यांना पडला. कदाचित असेही असेल की मुलायमसिंग यांचा समाजवाद सुपुत्र अखिलेशसिंग, बंधू राम गोपाल, स्नुषा डिंपल आदींतच वाटला गेल्यामुळे बेनी यांच्या वाटय़ास पुरेसा समाजवाद राहिला नसावा. समाजवादाच्या अशा घरगुती वाटणीमुळे तो इतरांना देण्यास राहत नाही, याची जाणीव झाल्यामुळे सरदार अमरसिंग यांनीही त्यांच्या मुलायम समाजवादास सोडचिठ्ठी दिल्याचा परिणाम बेनी यांच्यावरही झाला असावा. मुलायम आणि जयाप्रदा यांच्यात जेव्हा एक निवडण्याची वेळ आली तेव्हा सरदार अमरसिंग यांनी मुलायम यांचा हात सोडल्याचे बेनी यांनी पाहिले होतेच. त्यामुळेही असेल त्यांनी समाजवादी पक्षाच्या समाजवादास सोडचिठ्ठी दिली आणि थेट काँग्रेसच्या गोठय़ात स्वत:ला बांधण्याचा निर्णय घेतला ते योग्यच म्हणायला हवे. ज्याप्रमाणे म्हैस कोणत्याही रंगाची असली तरी तिचे दूध पांढरेच असते त्याप्रमाणे काँग्रेसच्या गोठय़ातील बैल कोणत्याही रंगाचे असले तरी निधर्मी आणि समाजवादीच असतात, याची पूर्ण जाणीव झाल्यानेच बेनी यांनी हे योग्य पाऊल उचलले याबद्दल तिळमात्र किंतु बाळगण्याचे कारण नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय अंगणात त्याचमुळे बेनींच्या समाजवादास अधिक जागा मिळाली आणि तो पसरू लागला. याची लक्षणे गेल्याच निवडणुकीत दिसू लागली होती. उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकांत त्यांनी थेट निवडणूक आयोगास आव्हान दिले. आपण आचारसंहितेचा भंग केला आहे, तेव्हा मला अटक कराच असा आग्रह बेनी यांनी निवडणूक आयोगाकडे धरला होता. खराखुरा समाजवादी असल्याशिवाय का हे शक्य आहे? ऐन निवडणुकीत अल्पसंख्याकांसाठी काँग्रेस राखीव जागा वाढवेल, अशी घोषणाच बेनी यांनी करून टाकली ती याच समाजवादी प्रेमामुळे. त्याच काळात अल्पसंख्याकांसाठी अशाच प्रकारे राखीव जागा काँग्रेस वाढवू इच्छित असल्याचे उत्तर प्रदेशीय सलमान खुर्शीद यांनी जाहीर केले होते. वास्तविक ते कायदामंत्री. तेव्हा तेच अशा प्रकारची विधाने करीत असल्याचे पाहून बेनी यांना हा राखीव प्रसाद आणखी अनेकांना देण्याची इच्छा झाल्यास गैर ते काय? सच्च्या समाजवाद्याचेच ते लक्षण मानावयास हवे. याचमुळे बेनी प्रसाद यांनी गेल्या महिन्यात तेल, डाळी आदींचे भाव गगनाला भिडले तेव्हा आनंद व्यक्त केला होता. खूप महागाई झाली की दलालांना खूप पैसे मिळतील, त्यांना खूप पैसे मिळाले तरच ते शेतकऱ्यांना त्यातील थोडेफार का होईना देऊ शकतील, हाच समाजवादी विचार बेनींनी यामागे केला. त्यावर काहींनी टीका केली. परंतु त्यांना अर्थशास्त्र आणि समाजवाद यातील एकही कळत नाही, असे म्हणायला हवे. याचे कारण असे की दलालांनाच जर चार पैसे जास्त मिळाले नाहीत तर ते शेतकऱ्यांना त्यातील एखादा देणार कसा? त्यामुळे बेनी प्रसाद यांनी दरवाढीचे समर्थन केले ते योग्यच.७१ लक्ष रुपयांचे एवढे ते काय, असे त्यांना वाटले ते याच समाजवादीय दृष्टिकोनामुळे. आपला मंत्रिमंडळातील सहकारी फक्त ७१ लक्ष रुपयांची लाच घेतल्याच्या टीकेचा धनी झाला, याचा कोण राग बेनींना आला. आपल्या सहकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोपच होणार असतील तर ते किमान ७१ कोट रुपयांचे व्हायला हवेत. ७१ लक्षांचा आरोप हा मंत्रिमंडळ सदस्यासाठी कमीपणा आहे, असे बेनींचे मत पडले त्यामागील समाजवादी भावना आपण समजून घ्यायला हवी. वास्तविक आपल्या सहकाऱ्यावर इतक्या कमी भ्रष्टाचाराचा आरोप केल्याबद्दल बेनी यांनी स्वघोषित राजकीय स्वच्छता कर्मचारी संघाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटलाच भरावयास हवा. त्यामुळे इतरांना अद्दल घडू शकेल. तशी ती घडायला हवी. अन्यथा असे जातिवंत समाजवादी बेनं फोफावणार नाही.