अग्रलेख : पंडितांचा विक्रम Print

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
शीर्षस्थपदावरील व्यक्तीचा अचानक पदत्याग एका गोष्टीचा निश्चित निदर्शक असतो. ती म्हणजे परिस्थिती हाताळण्यात त्या व्यक्तीस अपयश आल्याने स्वत:हून राजीनामा देण्याचा निर्णय त्या व्यक्तीस घ्यावा लागला अथवा त्या व्यक्तीस नारळ देण्यात आला. विक्रम शंकर पंडित हे मंगळवारी रात्री अकस्मात सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी पदावरून पायउतार झाले त्या मागे ही दोन्हीही कारणे आहेत.

तब्बल २०० वर्षांपूर्वी, म्हणजे १८१२ साली, स्थापन झालेली सिटी बँक आज जगातील काही निवडक प्रचंड बँकांत गणली जाते आणि मायदेशात, अमेरिकेत, ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतक्या मोठय़ा इतिहासाचा भाग असलेल्या संस्थेच्या इतिहासात व्यक्ती महत्त्वाची नसते. आणि जेथे संस्थात्मक यंत्रणा उत्तम आहेत अशा अमेरिकेसारख्या ठिकाणी तर एखाद्याच्या एखाद्या पदावर राहण्याचा अथवा जाण्याचा संदर्भ केवळ तात्कालिक असतो. तेव्हा विक्रम पंडित यांचा राजीनामा ही काही बँक व्यवसायाला हादरा बसावा अथवा प्रचंड उलथापालथ व्हावी अशी घटना नाही. तरीही त्या घटनेची दखल दोन कारणांसाठी घेणे जरुरी आहे. एक संकुचित अर्थ अर्थातच त्यांच्या मराठीपणाशी आहे. सध्या कोणाही यशस्वी व्यक्तीस भाषा, धर्म, प्रादेशिकता आदी लोकप्रिय चौकटीत डांबून कुरवाळण्याची प्रथा असल्याने पंडित यांच्या राजीनाम्यास महाराष्ट्रात महत्त्व दिले जात आहे. आणि दुसरे म्हणजे ज्या परिस्थितीत पंडित यांनी सिटी बँकेची धुरा सांभाळली आणि बँक वाचवली त्याबद्दल पंडित यांचे कौतुक होत असताना असे काय घडले की त्यांना अचानक राजीनामा द्यावा लागावा, हेही समजून घेणे गरजेचे आहे.
एकदा कधी तरी विजय मिळवून दिला म्हणून त्या भांडवलावर पुढची कारकीर्द ढकलता येण्याची व्यवस्था अमेरिका आदी देशांत नाही. अशा व्यवस्थेत भूतकाळातील कामगिरी ही सुखासीन भविष्याची हमी देऊ शकत नाही. तेव्हा पंडित यांनी जे काही साध्य केले ते २००८ सालच्या बँकिंग संकटाच्या परिघातूनच बघायला हवे. जगातील अन्य कोणत्याही अगडबंब यशस्वी संस्थांप्रमाणेच त्या वेळी सिटी बँक होती आणि २००८ सालातील गंभीर आर्थिक संकटाने बँकेच्या प्रारूपाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. विक्रम पंडित सिटी बँकेत नुकतेच आले होते आणि पुढे काय वाढून ठेवले आहे, याची चिन्हे दिसू लागली होती. अमेरिकेत बँका आणि अन्य वित्तीय संस्थांनी कर्जाचा भलामोठा असा फुगा फुगवून ठेवला होता. अशा प्रकारच्या वातावरणात आपण आर्थिकदृष्टय़ा खूप सशक्त आहोत, असा भ्रम होत असतो आणि वास्तवाची जाणीव करून देणाऱ्याकडे कानाडोळा केला जात असतो. अमेरिकेत नेमके असेच सुरू होते. अमेरिकेच्या रिझव्‍‌र्ह बँकेचे, म्हणजे फेडरल रिझव्‍‌र्हचे, तत्कालीन प्रमुख बेन बर्नाके यांनी अतिस्वस्त पतपुरवठय़ाच्या मोहात साऱ्या अमेरिकेला पाडले होते आणि पैसा इतका स्वस्त झाला होता की वित्तीय संस्था ज्याला गरज नाही, ज्याची ऐपत नाही त्यालाही कर्जे देत सुटल्या होत्या. त्याच वेळी नुरियल रूबिनी आदी तज्ज्ञ पुढील कर्जसापळ्याची जाणीव करून देत होते. पण या अर्थोन्मादक वातावरणात त्याकडे पाहण्यास कोणास वेळ नव्हता. अशा वेळी होते तेच त्याही वेळी झाले आणि कर्जे बुडण्याचे प्रमाण वाढू लागल्याने बघता बघता बँकाही रसातळाला जाऊ लागल्या. सिटीसारख्या बलाढय़ बँकेच्या नाकातोंडातही त्या वेळी पाणी गेले होते. त्या वेळी अमेरिकी सरकारने बुडू लागलेल्या बँकांना जीवरक्षक डॉलरचा अमर्याद पुरवठा केला. सिटी बँकेलाही पहिल्यांदा २५०० कोटी डॉलर्स आणि नंतर आणखी २००० कोटी डॉलर्स अमेरिकी सरकारने पुरवल्यामुळे बँक तरली. याच सुमारास सिटी बँकेची सूत्रे हाती घेतलेल्या पंडित यांनी अतिरिक्त खर्च कपात केली, बँकेचे अनुत्पादक विभाग बंद केले आणि आर्थिक शिस्त आणीत बँकेचा गाडा रुळावर आणला. विस्ताराच्या मोहात बँकेने जे नवनवे उद्योग सुरू केले होते ते सगळे स्वतंत्र कंपनी करून त्याकडे वर्ग करण्याचा निर्णय पंडित यांनी घेतला आणि बँकेचे जे मूळ काम, म्हणजे बँकिंग, त्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. ज्या झपाटय़ाने पंडित निर्णय घेत होते त्याबद्दल त्यांचे कौतुकच झाले आणि जेथे काम करतो ती यंत्रणाच तोटय़ात असताना आपण वेतन घेणे योग्य नाही या त्यांच्या प्रांजळ भूमिकेने तर ते अनेकांच्या कौतुकाचा विषय बनले. बँक नफ्यात येईपर्यंत आपण नाममात्र वेतनावर काम करू, अशी त्यांची प्रतिज्ञा होती आणि त्यांनी ती पाळून दाखवली.
परंतु युद्धकाळातील नेतृत्व शांतता काळात तितकेच प्रभावी ठरते असे नाही. पंडित यांच्या बाबतीत याचा प्रत्यय येऊ लागला होता आणि सिटी बँकेचे समभागधारक आणि संचालक दोघेही त्यांच्यावर गेले काही महिने नाराज होते. संकट काळात एक डॉलर इतकेच वेतन घेणाऱ्या पंडित यांना यंदा दीड लाख डॉलर्सपेक्षाही अधिक वेतन देण्याचा प्रस्ताव होता आणि काही संचालकांनी त्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्याहीपेक्षा अधिक गंभीर प्रकरण घडले ते वाशोव्हिया ही वित्तीय कंपनी ताब्यात घेण्यावरून. २००८ साली ही कंपनी ताब्यात घेण्यावरून अमेरिकेत बँकांत युद्ध पेटले होते. अमेरिकेतील ही चौथ्या क्रमांकाची वित्तसंस्था पण आर्थिक संकटामुळे डबघाईला आली होती. त्या वेळी सिटी बँकेने ही संस्था ताब्यात घेण्यासाठी पावले उचलली. त्याआधी वेल्स फागरे या दुसऱ्या बहुराष्ट्रीय वित्तसंस्थेनेही वाशोव्हियात रस दाखवला होता. परंतु फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉपरेरेशन या नियंत्रकाच्या मदतीने सिटी बँकेने वाशोव्हिया विकत घेण्याची प्रक्रिया त्वरेने सुरू केली आणि त्यास मंजुरी मिळवल्याची प्राथमिक फेरी पूर्ण केल्यानंतर या यशस्वी विलीनीकरणाच्या जाहिरातीही प्रसृत केल्या. परंतु पंडित पुढे गाफील राहिले. अशा विलीनीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे त्वरित करारात रूपांतर करणे गरजेचे असते. ते झाले नाही. सिटी बँक आणि वाशोव्हिया या दोघांनी केवळ इरादापत्रावरच समाधान मानले. ही बाब स्पष्ट होताच वेल्स फागरे या कंपनीने अत्यंत झपाटय़ाने हालचाल करीत त्याच दिवशी सिटी बँकेपेक्षा कितीतरी अधिक रकमेचा देकार वाशोव्हिया विकत घेण्यासाठी दिला. सिटी बँकेने वाशोव्हियाच्या एका समभागासाठी दोन डॉलर देऊ केले होते तर वेल्सचा देकार प्रतिसमभाग सात डॉलर इतका होता. खेरीज, सिटी बँकेला वाशोव्हियाच्या फक्त बँकिंग कार्यातच रस होता तर वेल्स फागरेने संपूर्ण वाशोव्हियाच ताब्यात घेण्याची तयारी दाखवली. साहजिकच वाशोव्हियाच्या संचालक आणि समभागधारकांनी सिटी बँकेपेक्षा वेल्स कागरेला पसंती दिली. वाशोव्हिया हातातून गेल्याचे उघडकीस आल्यावर सिटी बँकेचे समभाग गडगडले होते आणि त्या दिवशी रात्री २ वाजता विक्रम पंडित यांना आपल्या सहकाऱ्यांना उठवून हा व्यवहार फसल्याने उद्विग्नता व्यक्त करावी लागली होती. अत्यंत शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे विक्रम पंडित यांचा संताप त्या दिवशी कसा अनावर झाला होता आणि फेडरल डिपॉझिटच्या माजी प्रमुख शेला बायर यांच्या नावाने ते कसे बोटे मोडत होते त्याचा साद्यंत वृत्तांत त्या वेळी प्रकाशित झाला होता. त्यामुळे पंडित यांना आज पायउतार व्हावे लागल्यावर शेला बायर यांनी समाधान व्यक्त केले आणि पंडित यांच्या संकटकालीन कार्याचा गौरव करताना त्यांच्यासमोर सिटी बँकेला कोठे न्यायचे याची निश्चित दिशा नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली. त्यात गेले काही महिने पंडित यांच्यावर बँकेचे संचालक मंडळ नाराज असल्याचेही वृत्त येत होते. त्याचाच कडेलोट अखेर झाला आणि पंडित यांनी पदत्याग करावा अशी वेळ आणली गेली. एक मराठी व्यक्ती इतक्या उच्चपदी गेली याचा आपणास अभिमान वाटणे साहजिक असले तरी त्यांचे मराठीपण हा केवळ योगायोग होता. असे योगायोग गर्व से कहो.. म्हणून मिरवायचे नसतात. त्यामुळेच पंडित यांचा विक्रम आपण त्यांच्या कर्तबगारीसाठी मानायला हवा आणि त्याच कर्तबगारीविषयक कारणांसाठी तो मोडला गेला म्हणून त्याचाही आदर करायला हवा.