अग्रलेख : बुद्धी नाठीच! Print

 

शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
जहांगीर आर्ट गॅलरी हे महाराष्ट्राच्या राजधानीतले सुपरिचित कलादालन आहे आणि या संस्थेला साठ वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद अनेकांना होणे साहजिकच आहे. मात्र कोणताही आनंद साजरा करायचा म्हटले की, त्याचा उत्सव किंवा इव्हेंट बनतो आणि मग इव्हेंटबद्दल औचित्याचे प्रश्न येतात. जहांगीर कलादालनाच्या साठीचा जो काही उरूस सध्या साजरा होतो आहे, त्याच्या औचित्याबद्दल प्रश्न आहेतच.

शिवाय, या गॅलरीच्या कामकाजात जी ढिलाई गेल्या दोन दशकांत वाढू लागली, तिचा परिपाक साठीच्या इव्हेंटमध्ये दिसून येतो आहे. सपना कार या बाईंनी इव्हेंटच्या नावाखाली जे आरंभले आहे, ते सारे खपवून घेण्याइतका दुबळेपणा जहांगीर आर्ट गॅलरीकडे याच वर्षांनुवर्षांच्या ढिलाईमुळे आलेला आहे. एरवी हे सारे एखाद्या संस्थेतला घोळ म्हणून खपूनही गेले असते, परंतु मुंबईत आणि देशात कलासंस्थांचा जो नवा बहर येतो आहे, त्याकडे पाठ फिरवून केवळ काही बडय़ा धेंडांना जवळ करण्याचा जो प्रकार गेल्या काही वर्षांत मुंबईतील या सार्वजनिक कलादालनाने केला, तो कलारसिकांनाच नव्हे तर कोणत्याही नागरिकाला अस्वस्थ करणारा आहे. आजच्या कुडमुडय़ा भांडवलशाहीचे कुरूप चित्र जहांगीर आर्ट गॅलरीतही दिसू लागले आहे.
पैशाशी कलेची सांगड घातली जाते, तेव्हा लोक कलेपासून दुरावू लागतात असा आपल्याकडला अनुभव आहे. खरेतर पैसा वाईट नसतो आणि कलेची जाण अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, याहीसाठी पैसा उपयोगी पडतोच. अमेरिकेत गुगेनहाइम कुटुंबाची एकमेव वारसदार पेगी यांनी उभारलेले मोठे संग्रहालय असो की कावसजी जहांगीर कुटुंबीयांनी दिलेल्या अडीच लाख रुपयांच्या देणगीतून उभे राहिलेले जहांगीर कलादालन असो.  पैसा नसता, तर या संस्था उभ्याच राहिल्या नसत्या. पण निव्वळ व्यावसायिक फायद्यासाठी भलत्याच चित्रांच्या किमती वाढवून ठेवणे हे एकंदर कलाक्षेत्रात जितके सर्रास चालते, तितकेच कलासंस्थांतही पैशाचे काही खेळ चालतात. संस्थेला दिलेल्या देणगीपेक्षा श्रेय अधिक घेणे, संस्थेची कीर्ती वा तिची लोकमान्यता स्वत:साठी वापरून घेणे, संस्था आपल्या तालावर नाचवण्यासाठी पैसा ओतणे आणि या संस्थेच्या वर्धापन दिनांसारखे सोहळे म्हणजे आपल्या तोलामोलाच्या धनिकवणिक बाळांना एकत्र येण्याचे, नेटवर्किंगचे आणखी एक निमित्त मानणे असे दोष अनेक भारतीय कलासंस्थांमध्ये पैशामुळेच दिसू लागले. याचे सर्वाधिक दु:ख असते ते तरुण किंवा अद्याप पुरेशी संधी न मिळालेल्या कलावंतांना आणि नोकऱ्या सांभाळत कलेचा नुसता दुरूनच आस्वाद घेऊ शकणाऱ्या सभ्य समाजाला. विदेशातही पैशाचे खेळ चालतातच, पण तिथल्या सार्वजनिक कलासंस्थांची पावले वाकडी पडल्यास तो जाहीर चर्चेचा विषय होतो. आपल्याकडे मात्र संस्थानिकांचे हत्ती आले की रस्त्याकडेला उभे राहायचे, ही शिस्त पाळली जाते. संस्थांची संस्थाने होत राहतात, या संस्थानांवर नवे संस्थानिक येत राहतात आणि षठीसहामासी त्यांच्या इव्हेंटचे पांढरे हत्ती, आधीच मुंगीएवढय़ा असलेल्या आपल्या कलाजाणिवांना चिरडत राहतात.
आम्हीही कलाप्रेमीच आहोत, असे म्हणत सार्वजनिक कलासंस्थांमध्ये लुडबूड करणाऱ्या बडय़ा मंडळींची संख्या गेल्या १५ वर्षांत वाढू लागली. अशा लुडबुडीमुळे जे वाद झाले, ते या संस्थांची काळजी असणाऱ्यांच्या कुजबुजीपर्यंतच मर्यादित ठरले. कलाप्रेम आणि श्रेय-प्रेम यांच्या गल्लतीचे एक उदाहरण गेल्या दशकात घडले होते. आर्ट इंडिया हे नियतकालिक उत्कृष्ट चालवणाऱ्या संगीता जिंदाल यांनी, ‘फ्रेंड्स ऑफ जेजे’ नावाची समांतर संस्था स्थापून जेजे स्कूल ऑफ आर्टच्या आवारात उभारल्या जाणाऱ्या संभाव्य कलासंग्रहालयाला स्वत:च्या कुटुंबीयांचे नाव द्यावे, असा प्रयत्न आरंभला. जेजेमधील कलाठेव्याशी या कुटुंबाचा काय संबंध आणि सार्वजनिक कामाला मदत दिली तर त्याची किंमत किती वसूल करावी, असा वाद यामुळे वाढला. त्यावर आम्ही जेजेच्या इमारतीचे संधारण केले, असा बचाव जिंदाल हमखास करीत. आता जेजेच्या आवारातील संग्रहालयाची शक्यताच दुरावते आहे आणि जिंदाल यांना त्या कलाशाळेच्या ऐवजी जहांगीर कलादालनात अतोनात रस वाटू लागला आहे. इतका की, सपना कार यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटवर विसंबलेल्या या दालनाला साठीनिमित्त थोडा आर्थिक हातभार लागावा यासाठी चित्रकारांच्या मदतीने जो लिलाव परवा झाला, त्याच्या चित्रपुस्तिकांवर जिंदाल साऊथवेस्ट फाऊंडेशन आणि हर्ष गोएंका यांचे आरपीजी फाऊंडेशन यांचा हक्क जहांगीर कलादालनापेक्षा अधिक आहे. दालनात, दालनाच्याच साठीनिमित्त भरलेल्या प्रदर्शनामधील चित्रांची ही लिलावपुस्तिका, पण दालनाच्या विक्रीकेंद्रात ती विक्रीसाठी उपलब्ध नाही. दहा वर्षांपूर्वी, जहांगीरचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना शारदा द्विवेदी यांनी गॅलरीबद्दल लिहिलेली छोटेखानी पुस्तिका भरपूर छायाचित्रांसह उपलब्ध झाली होती. त्याआधी या दालनाला २५ वर्षे झाली, तेव्हा तर राम चटर्जी या कर्तृत्ववान गॅलरी संचालकाने भारतभरची समकालीन शिल्पकला, रेषाटनकला -म्हणजे ड्रॉइंग- आणि सिरॅमिक्स या तुलनेने दुर्लक्षित कलांची खास पुस्तके काढली, ती आजही संदर्भ म्हणून उपयुक्त आहेत. अशा संदर्भनिर्मितीचे काम गेल्या १५ वर्षांत सुहास बहुळकर आणि प्रफुल्ला डहाणूकर यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ या प्रदर्शनांच्या उपक्रमाद्वारे केले. इतिहासात अनुल्लेखित राहिलेल्या काही महाराष्ट्रीय चित्रकारांच्या चित्रांना त्यामुळे गॅलरीचा प्रकाश दिसला, सोबत पुस्तिकाही निघाल्याने संदर्भसाहित्यात भर पडली. मास्टरस्ट्रोकमधील चित्रांना पुढे लिलावगृहे, जुन्या चित्रांमध्ये खास रस असलेली खासगी कलादालने आदी वाटा फुटल्या. आठ वर्षांत बहुळकर आणि डहाणूकरांचा या उपक्रमांतील रस संपला, त्याचे कारण जहांगीर कलादालनाच्या धुरिणांची अनास्था.
या सार्वजनिक कलादालनाचे धुरिणत्व ऐतिहासिक कारणांमुळे कावसजी जहांगीर कुटुंबीयांकडे आहे, तसेच बॉम्बे आर्ट सोसायटी आणि राज्य सरकारचे प्रतिनिधीही व्यवस्थापन समितीवर असतात. पण साठीनिमित्तचा इव्हेंट जहांगीरमध्ये ज्या पद्धतीने चालला आहे, त्याला या प्रतिनिधींचा पाठिंबा असल्यास तो कशामुळे, हे कळल्यास बरे होईल. इतिहास गाळीव पद्धतीने मांडायचा, बडय़ा लोकांनीच जहांगीर नावारूपाला आणली असे चित्र उभे करायचे आणि पुन्हा सार्वजनिक संस्थेच्या लोकमान्यतेचे लोणी खासगी कारणांसाठी ओरपायचे, हा प्रकार यंदाच्याही इव्हेंटमध्ये दिसतोच आहे. दिल्लीत सपशेल आपटलेला एक कलामेळा आणि अमिताभ बच्चन यांच्या सत्तरीनिमित्त सेलेब्रिटींसाठी भरलेले प्रदर्शन, एवढाच अलीकडच्या काळातला अनुभव असलेल्या इव्हेंट मॅनेजरकडून जहांगीर दालनाशी लोकांचे नाते जपणारे वा लोकांना शहाणे करणारे कार्यक्रम होतील, याची अपेक्षाच असू शकत नाही. मग जहांगीरच्या व्यवस्थापन समितीने अंधविश्वास का ठेवला, याचा खुलासा होणेही आवश्यक आहे.
खुलासे बऱ्याच गोष्टींचे मागावे लागतील. जहांगीरच्या संग्रहात अनेक चित्रे होती आणि चित्र-लायब्ररीचा अभिनव उपक्रम सध्याच्या व्यवस्थापक कात्यायनी मेनन या जेव्हा याच दालनात टायपिस्ट होत्या, तेव्हापासून चालत होता. हा उपक्रम बंद पडल्यावर चित्रसंग्रहाचे काय झाले, कमल मोरारका यांच्या देणगीतून नूतनीकरण झालेल्या सभागृह दालनासाठी किती खर्च आला, इथपासूनचे अनेक प्रश्न आहेत. हे दालन सुरू झाले तेव्हा इन्यागिन्या श्रीमंत मंडळींचा वरचष्मा असणे साहजिक होते, पण साठ वर्षांत लोकशाही येण्याची अपेक्षा सोडाच, उरलीसुरली पारदर्शकताही लयाला गेली आहे. जहांगीर कलादालनात प्रदर्शनासाठी सात-सात वर्षे प्रतीक्षा करावी लागते, मग ठराविक कलावंतांना कोणाच्या दबावाखाली इथे अवघ्या काही महिन्यांत प्रदर्शनसंधी मिळत गेल्या, याचेही वाद या अपारदर्शक कारभाराशी संबंधित आहेत. माहितीचा अधिकार वापरला गेला, तरीही तपशील मिळणे कठीण अशी सध्याची अवस्था आहे. या कलादालनाच्या पंचेचाळिशीपासूनच वाढू लागलेली ही नाठी बुद्धी साठीनंतर तरी सुधारावी, अशी सदिच्छा आपण मुंबईची शान असलेल्या या कलादालनाला द्यायला हवी.