अग्रलेख : मैं और मेरी तनहाई.. Print

 

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणारा शोले हा सिनेमा ज्या वर्षी आला त्याच वर्षी दीवारदेखील प्रसृत झाला. शोलेची भव्यता त्यात नव्हती. शोलेने पुढे इतिहास घडवला. तरीही शोलेस एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही आणि इतिहासाला आकार देण्यात दीवारही मागे पडला नाही. मेरे पास माँ है.. हे त्यातील एक वाक्य अजरामर झाले आणि अँग्री यंग मॅनला विकल करणाऱ्या त्या वाक्याचे लेखक सलीम-जावेद हेही त्यामुळे यशोशिखरावर स्थानापन्न झाले.

ही कमाल यश चोप्रा यांची. वास्तविक दीवारच्या आधी त्यांनी दाग हा अत्यंत यशस्वी चित्रपट दिला होता. मेरे दिल में आज क्या है. तू कहे तो मैं बता दूँ. असे आपल्या प्रेमविव्हळ चेहऱ्याने प्रचंड गुणवान किशोरकुमारच्या आवाजात गाणारा राजेश खन्ना, गोबऱ्या गालांत गुंडाळून ठेवणारी राखी आणि गालावरच्या खोलवर खळीत खिळवून ठेवणारी शर्मिला टागोर या तिघांचा दाग यशस्वी न ठरता तरच नवल. परंतु तरीही त्यानंतर सिनेमा बनवताना यश चोप्रा यांनी राजेश खन्नाला स्थान दिले नाही. तोपर्यंत राजेश खन्नाच्या डोक्यात हवा जाऊन पाय जमिनीवरून उचलले गेले होते. नेमक्या त्याच काळात आपल्या लांब लांब पायांनी चित्रपटक्षेत्राची वाट मळणारा अमिताभ बच्चन त्यांना गवसला. ज्या वर्षी दाग आला त्याच वर्षी अमिताभचा जंजीरही बाजारात यशस्वी ठरत होता. तेव्हा पुढच्या आपल्या चित्रपटासाठी यश चोप्रा यांनी अमिताभला घेतले आणि त्या सिनेमाची कथा सोपवली सलीम-जावेद यांच्या हाती. यातील गुणशोधन हा कौतुकाचा भाग. ती खास यश चोप्रा यांची खासियत. ज्या वर्षी दाग आला, ज्या वर्षी काडीपैलवान अमिताभचा जंजीर आला, त्याच वर्षी आणखी एका सिनेमाने यश चाखले होते. तो होता नासिर हुसेन यांचा यादों की बारात. या सिनेमाची कथा सलीम-जावेद यांची होती. याचा अर्थ सलीम-जावेद या जोडगोळीच्या नावावर फार काही यश होते असे नाही. परंतु त्यांच्यातील गुणांचा गंध यश चोप्रा यांना आला आणि त्यांनी दीवार या सगळ्यांना घेऊन बनवला. जंजीरमधला अमिताभ आणि यादों की बारात साजरी करून आलेले सलीम-जावेद. यांचे हे अद्भुत मिo्रण भलतेच चवदार बनले. अर्थातच दीवारने यशाचा विक्रम केला. तो करताना त्या सिनेमाने ज्याप्रमाणे सलीम-जावेद या लेखकद्वयीस यश दिले त्याचप्रमाणे भारतीय चित्रपटसृष्टीला ज्वालामुखीसारखा खदखदणारा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन दिला. त्या सिनेमातील मेरे पास माँ है. हे मध्यमवर्गीय वाटणाऱ्या शशी कपूर याच्या तोंडचे वाक्य जरी लोकप्रिय झाले असले तरी गोदीत टपरीवर बशीत ओतून चहा पिणाऱ्या अमिताभच्या तोंडातून निघणाऱ्या- अगले हप्ते और एक कुली पैसे देने से इन्कार करने वाला है.. या वाक्याने सिनेमागृह पेटून उठायचे. हे असे होऊ शकते हे कळणे हे यश चोप्रा यांचे यश. ते त्यांना आयुष्यात भरभरून मिळाले. परंतु मिळालेल्या यशाच्या रांगोळ्या काढीत बसण्यात त्यांना कधीच रस नव्हता. तसा तो असता तर अँग्री यंग मॅन म्हणून लोकप्रिय होत असलेल्या अमिताभच्या भव्य दीवार यशानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी पूर्णपणे भिन्न असा कभी कभी काढला नसता. राखीच्या मोकळ्या केसांत स्वत:ला अडकवून मैं पल दो पल का शायर हूँ. गाणारा अमिताभ सादर करणे तसे आव्हानच होते. परंतु ते यश चोप्रा यांनी सहजपणे पेलले. ते पेलताना पूर्णपणे अडगळीत पडलेल्या खय्याम यांनाही त्यांनी हात दिला आणि त्याच खय्याम यांनी पुढे हिंदी चित्रपट संगीतात स्वरांचे अमूर्त ताजमहाल उभे केले. कभी कभीच्या यशात आणखी एकाचा हात लागला. कवी साहिर लुधियानवी. वास्तविक साहिरची कविता हिंदी चित्रपटसृष्टीच्या सोयिस्कर बाजारू प्रेमाला न पेलणारी. पण यश चोप्रा यांच्या सिनेमाने ती पेलली. त्यासाठी त्यांनी साहिरच्या कवितेला एकही पायरी उतरवले नाही. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है कि जिंदगी तेरी जुल्फों की नर्म छाओं में गुजर न पाती. तो शादाब हो भी सकती थी.. असे भावविभोर शब्दांत आणि अमिताभच्या तितक्याच भावगर्भ आवाजात म्हणणारा सिनेमा यश चोप्रा यांनी एक पायरी वर नेला. हे यश चोप्रा यांचे वैशिष्टय़ मानावे लागेल. व्यावसायिक सिनेमा म्हणजे तद्दन गल्लाभरू आणि चांगले, खरे कलात्मक काही असेल तर समांतर सिनेमातच असे एक मत दरम्यानच्या काळात तयार झाले होते. त्यामुळे समांतर सिनेमावाले नाक वर करून वावरत असत आणि व्यावसायिक सिनेमावाले चांगल्या गल्लयाने उगाचच ओशाळे होत असत. या दोघांतील दरी ज्यांना सांधता आली त्यातील एक नाव म्हणजे यश चोप्रा. यशस्वी सिनेमा म्हणजे काही वाईटच असायला हवा असे नाही आणि प्रत्येक अयशस्वी सिनेमा काही कलात्मकच असतो असे नाही, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. सर्वसाधारणपणे या कचकडय़ाच्या मोहमयी दुनियेत प्रत्येकाचा एक साचा बनत जातो. बाजारपेठेलाही तसे होणे सोयीचे असते. तसा तो बनला की ती व्यक्ती सहज वाचता येते आणि त्याच्या कामाचा अंदाज बांधता येतो. यश चोप्रा यांनी स्वत:चे तसे होऊ दिले नाही. त्यांच्या सिनेमाच्या यादीवरूनही ते सहज समजू शकेल. ऐ मेरे जोहरा जबी. गाणारा तगडा अभिनेता बलराज सहानी याचा १९६५ सालचा वक्त असो की मेरे हाथों में नौ नौ चुँडियां हैं. गाणाऱ्या o्रीदेवीचा १९८९ सालातील चांदनी असो, यश यांच्या सिनेमाने प्रेक्षकांना भरभरून दिले.
हे असे भरभरून देणे त्यांच्या पंजाबी स्वभावातच असावे. फाळणीचे आणि त्यापाठच्या दु:खाचे ओझे घेऊन भारतात राहिलेल्या चोप्रा यांना कदाचित आपल्याला जे मिळाले नाही ते देण्याची आस असावी. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात भव्य, सुंदर निसर्ग असतो, अगदी स्वित्र्झलडमध्ये जाऊन तो आपल्याला भेटतो, उत्तम संगीत असते.. त्यासाठी वेळ पडल्यास शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरासिया हे कामाला लागलेले असतात. शायरी उच्च दर्जाची असते. छायालेखन प्रसन्न असते आणि तंत्रज्ञानावरील खर्चात कोठेही हात आखडता घेतलेला नसतो. एकापेक्षा एक सुरेख, बघत राहावे असे सिनेमे त्यांनी दिले. या माध्यमाची म्हणून एक भाषा असते आणि प्रेक्षकांच्या भाषेशी ती जुळावी लागते. ती कला यश चोप्रा यांना साधली होती. परंतु एखाद्या कलाकृतीपुरती ही कला साधणे वेगळे आणि प्रत्येक कलाकृतीवर अशी हुकमत असणे वेगळे. त्यासाठी साधना लागते आणि प्रेक्षकांच्या नाडीवर हात लागतो. हे दोन्हीही यश चोप्रा यांच्याकडे होते. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमात एक आत्मविश्वास दिसतो आणि प्रत्येक सिनेमागणिक तो वाढत जातानाही दिसतो. या आत्मविश्वासामुळे एक प्रकारचे समाधान आणि दिलदारपणा यश चोप्रा यांच्या ठायी तयार झाला होता. कलाकृतीची आणि त्यांचीही दिलेरी हे आणखी एक त्यांचे वैशिष्टय़. अशी माणसे आपल्या जगण्यावर आणि आपल्या कामावर मनापासून प्रेम करतात. उगाच आपणास कोणी फसवले, नागवले, कसा अन्याय झाला वगैरेंच्या कथा विकत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. जे काही भाष्य करायचे ते आपल्या कामातूनच, यावर त्यांचा विश्वास असतो. म्हणूनच वयाच्या ऐंशीव्या वर्षीही अशी माणसे कालबाहय़ होत नाहीत. यश चोप्रा हे असे होते. कालानुरूप ताजे राहणारे. त्यांच्या निधनाने सिनेमालाच आयुष्य मानणारी एक संस्थाच शांत झाली.
त्यांच्या या चिरंतन तनहाईची दखल घेत हिंदी चित्रपटसृष्टीच त्यांना आता म्हणेल. तुम होते तो ऐसा होता, तुम होते तो वैसा होता.. मैं और मेरी तनहाई अक्सर ये बातें करते हैं..