अग्रलेख : वाघाचे उलटे सीमोल्लंघन Print

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
कारणपरत्वे तर्कबुद्धीने दगा देण्यास सुरुवात केल्यास व्यक्ती भावनेचा आधार शोधू लागते. हा नियम पक्ष, संघटना वा संस्था आदींना तितक्याच प्रमाणात लागू होतो. शिवसेना व त्या संघटनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे झाले आहे. पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यास संबोधन करताना त्यांनी जी भाषा वापरली त्यावरून हे समजून येईल. अन्य कोणत्याही व्यक्तीसारखेच आणि व्यक्तीइतकेच o्री. ठाकरे हे वयपरत्वे थकले आहेत.

परंतु अन्य व्यक्ती आणि ठाकरे यांच्यातील फरक हा, की ते एका संघटना वा पक्षाचे प्रमुख आहेत. त्या नात्याने त्यांची एक प्रतिमा बनली आणि तशीच ती अबाधित राहू देण्यात या संघटनेचे हितसंबंध तयार झाले. त्यामुळेच ठाकरी भाषा, ठाकरी शैली, शिवसेनेचा वाघ, मग त्या वाघाचे छावे आदी शब्दप्रतिमा तयार झाल्या आणि त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले. हे सगळे मग सेनेच्या कथित-अकथित आक्रमकतेशी जोडले गेले. संघटनेच्या वाढीस या आक्रमकतेची गरज असते हे मान्य; परंतु संघटना स्थिरस्थावर झाल्यावर या आक्रमकतेची जागा विधायक, दीर्घकालीन उपक्रमांनी घेणे गरजेचे असते. ते सेनेच्या बाबत झाले नाही. त्यामुळे सेनेची आक्रमकता ही आजचा दिवस साजरा करण्यापुरत्या क्षुद्र उद्दिष्टपूर्तीसाठीच वापरली आणि ही उद्दिष्टपूर्ती म्हणजेच यश असे सेनानेते मानीत गेले. त्यामुळे कुठे पत्रकारांना बडव, लेखकांची लाज काढ असल्या फालतू कामातच सेनानेतृत्व मश्गूल राहिले आणि भरीव म्हणता येईल असे एकही काम सेनेच्या नावे उभे राहिले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे मुंबईत जवळपास दोन दशके सत्ता असूनही या पक्षाच्या काळात मुंबईचा अधिकाधिक ऱ्हासच होत गेला. सध्या तर हा पक्ष कंत्राटदारांसाठीच काम करताना दिसतो. या संदर्भात टीका झाली की राज्य सरकारकडे बोट दाखवण्याचा सोपा मार्ग सेनानेते चोखाळतात. परंतु ज्या गोष्टी मुंबई महापालिकेच्याच अखत्यारीत आहेत, त्यात आपण काय चांगले केले, हे तरी त्यांनी सांगावे. तसे करावयाचे असल्यास खड्डे बुजवणाऱ्या पेवर ब्लॉकमागील अर्थकारणही सेनानेत्यांना जनतेस समजावून सांगावे लागेल. ते कदाचित न परवडणारे असेल. सेनेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात स्थानीय लोकाधिकार समिती आदींमार्फत पुढील पिढी घडवण्याचा, त्यांना आकार देण्याचा स्तुत्य असा उपक्रम सेनेकडून सुरू होता. त्या उपक्रमाचे सुरुवातीचे यश हे सुधीरभाऊ जोशी आदींच्या संयत आणि प्रौढ अशा चेहऱ्यामुळे होते. परंतु पुढे सत्ताकारणालाच महत्त्व देण्याच्या नादात सुधीरभाऊंसारखी नेमस्त मंडळी सेनेत मागे फेकली गेली आणि गुंडपुंडगिरी करणाऱ्यांनाच महत्त्व आले. अशा मंडळींची मदत सेनेच्या.. आणि त्याहीपेक्षा सेनानेत्यांच्या.. अर्थकारणासाठी आवश्यक असेलही. परंतु त्यामुळे जनता या पक्षापासून कधी दुरावली ते या पक्षास समजलेही नाही. त्याच वेळी सेना नेत्यांची आक्रमकता किती पोकळ, फुकाची आणि गैरलागू होती, याचीही जाणीव नवमतदारास होत गेली. त्यात सेनेचे आणखी एक पातक म्हणजे जो आपला मतदारांचा गाभा, त्यालाच सेनेने वाऱ्यावर सोडले. आज सेनानेते कितीही आव आणीत असले तरी मराठी मतदार या पक्षापासून दूर गेला आहे, हे अमान्य करून चालणार नाही.
तेव्हा या वास्तवदर्शनाच्या पाश्र्वभूमीवर सेनाप्रमुखांच्या भाषणाचे विश्लेषण करायला हवे. सेनाप्रमुख, आपण घराणेशाही लादली नाही आणि आपल्या घराणेशाहीत आणि काँग्रेसच्या घराणेशाहीत फरक असल्याचा दावा करतात, तो केवळ हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरे हा जनतेचा निर्णय आणि राहुल गांधी वा सुप्रिया सुळे लादले गेलेले नेते, हे कसे? आता तर उद्धव ठाकरे यांचा प्रभाव सिद्ध व्हायच्या आतच आदित्य ठाकरे यांच्या राज्यारोहणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुळात सत्तांतर करताना सत्ता हाती असावी लागते. नसलेल्या सत्तेला वारस ठरवता येत नाही, हे साधे वास्तव सेनाप्रमुख विसरतात. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सिद्ध झाले असते आणि मग त्याची सूत्रे पुढच्या पिढीकडे दिली गेली असती तर समजण्यासारखे होते. तेव्हा जे काही सुरू आहे त्यास घराणेशाही म्हणावयाचे नाही तर काय? आपली ती जमीन आणि इतरांचा तो भूखंड हे कसे? तेव्हा सेनाप्रमुखांनी हा मुद्दा सोडलेला बरा. यातील विरोधाभास हा की, आपण उद्धवला लादले असेल तर तुम्ही ते विसरून जा, असेही सेनाप्रमुख म्हणतात. म्हणजे काय? एखाद्या संघटनेच्या वा कंपनीच्या प्रमुखपदी एखादी व्यक्ती लादली गेली असे मान्य केले गेले तर त्या कंपनीचे वा संघटनेचे हित लक्षात घेऊन एकच उपाय उरतो; तो म्हणजे त्या जागी अन्य लायक व्यक्तीची निवड करणे. सेनाप्रमुखांना शिवसेनेच्या बाबत असे अभिप्रेत आहे काय? तसे असल्यास त्यांनी तसे सांगावे. अन्यथा उद्धव आणि आदित्य यास सांभाळून घ्या, या आवाहनाचा अर्थ तरी त्यांनी सांगावा. जनतेने सांभाळून घ्यायचे म्हणजे काय करावयाचे? आपण व्यंगचित्रकार असल्याचा सार्थ अभिमान सेनाप्रमुखांना आहे. त्या क्षेत्रातील त्यांचे स्थान मोठे आहे, यातही शंका नाही. त्यामुळे त्यांना आपल्याच पक्षाच्या हाताळणीतील व्यंग लक्षातच येत नसेल यावर विश्वास ठेवता येणार नाही. ते लक्षात येऊनही सेनाप्रमुखांना हे सगळे करावे लागत असेल; तर त्यांच्याविषयी व्यक्तिगत सहानुभूती बाळगायला हवी यात शंका नाही.
विजयादशमीच्या सभेत सेनाप्रमुखांनी आपल्या तोळामासा प्रकृतीचाही दाखला दिला. आपल्याला आता बोलताना धाप लागते, चार पावलेही चालता येत नाही आणि आपण साफ कोसळलो आहोत असे सेनाप्रमुख म्हणाले. सर्वसामान्य वृद्धाने असे केले तर ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असे म्हटले जाऊ शकते. तीच भावना सेनाप्रमुखांच्या बाबतही व्यक्त झाल्यास त्यांना चालणार आहे का? वृद्धास आपल्या वार्धक्यास हात घालून भावनिक आवाहन करावे लागत असेल तर त्यातून शरीरापेक्षा मनाचा कमकुवतपणा दिसतो, असे मानले जाते. तेव्हा तो नियम सेनाप्रमुखांच्या बाबतही लागू करावयाचा काय? सेनाप्रमुख मराठी मतांच्या विभाजनाचा मुद्दाही अलीकडे वारंवार मांडताना दिसतात. शिवसेनेस मिळाली नाहीत तर मराठी मतांचे विभाजन झाले ही केवळ तर्कदुष्टता आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस वा अन्य कोणाही पक्षाचे उमेदवार निवडून येतात ते काय बिगर मराठी मतदारांमुळे की काय? महाराष्ट्रात कोणाही पक्षास मिळालेल्या मतांत बहुसंख्य मते मराठीच असणार. तेव्हा आमचे मतदार नाहीत ते मराठीचे मारेकरी हे सेनाप्रमुखांचे विधान आत्मवंचना ठरेल. वादासाठी ते खरे जरी मानले तरी मराठी मते फुटत असतील तर ती कोणामुळे याचाही विचार सेनाप्रमुखांनी करून पाहावा. मराठी मतदारांना सेना आपलीशी वाटत नसेल तर त्यामागील कारणे काय असू शकतात, याचा विचार त्यांनी केल्यास त्यांना या प्रश्नाचे उत्तर सापडेल.
वाघ वृद्ध झाला तरी गवत खात नाही, असे म्हणतात. सेनानेतृत्वाची, म्हणजे अर्थातच फक्त सेनाप्रमुखांची तुलना वाघाशी केली जायची. तेव्हा विजयादशमीस जे काही झाले ते वाघाचे उलटे सीमोल्लंघन म्हणायचे काय? तसे असेल तर या वाघावर तशी वेळ का आली याचा विचार करावा लागेल. त्यास सेनाप्रमुखांची तयारी आहे का, हा खरा प्रश्न आहे.