अग्रलेख : नव्या पुस्तकाचा वास Print

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
बातमी एक आणि चर्चा वेगळीच असे अनेकदा होते आणि अशी चर्चा कोणत्या विषयांतरांची वळणे घेत गेली, हे पाहिल्यास बातमीमागची बातमी कळत जाते.. इंटरनेटमुळे माहितीच्या पायघडय़ाच डोळ्यांसमोर उलगडू लागलेल्या असताना या चर्चा, ही विषयांतरे आणि वळणे ही सर्वासाठी खुली असलेली ठेव झाली आहे.

पेंग्विन आणि रॅण्डम हाऊस या दोन बडय़ा प्रकाशन कंपन्यांचे एकीकरण होणार असल्याची बातमी आणि त्यापाठोपाठ सुरू झालेली चर्चा, यांचेही असेच झाले. जगातील सर्व देशांत इंग्रजी छापील पुस्तकांच्या प्रकाशनाचा जो काही व्यवसाय आहे, त्याचा २५ टक्के वाटा या दोन कंपन्या एकत्र झाल्यावर एकाच ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस’ कंपनीकडे जाणार आहे. हे एकीकरण प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी नऊ-दहा महिने लागतील, म्हणजे जगाच्या प्रकाशन धंद्यातील चतकोर एकाच बडय़ा कंपनीच्या खिशात आहे, हे चित्र दिसण्यात पुढील दिवाळी उजाडेल. तोवर काय झालेले असेल आणि एवढय़ा बडय़ा कंपन्यांना एकमेकींशी स्पर्धा न करता एकत्रित कंपनीतील ५३ टक्के रॅण्डम हाऊस आणि उरलेले पेंग्विनचे, अशी तडजोड करण्यास कोणत्या परिस्थितीने भाग पाडले, याची चर्चा अर्थातच ई-पुस्तकांच्या वळणाने सुरू झाली. किंडल अथवा तत्सम वाचनसामग्रीवर डिजिटल तंत्राने वाचता येणारी, पडद्यावरच पाने उलटण्यापासून ते चटकन एखादा शब्द शोधून तेवढाच भाग वाचण्याची सोय देणारी ही ई-पुस्तके युरोप-अमेरिकेत स्थिरावू लागली आहेत. छापील पुस्तकांचा जमाना गेला, अशा इशाराघंटाच प्रकाशन व्यवसायातील तज्ज्ञ मंडळी वाजवू लागली आहेत. पब्लिशर्स वीकली असो की पब्लिशिंग परस्पेक्टिव्हज्, जागतिक प्रकाशन धंद्याची बित्तंबातमी देणाऱ्या या नियतकालिकांना गेल्या दोन वर्षांत ई-बुकांपुढे छापील पुस्तकांचा कसा पाड लागणार, याखेरीज दुसरा विषयच उरलेला नाही. आजघडीला बडे प्रकाशकच ई-प्रकाशन व्यवसायातही आहेत. आमच्या ई-बुकांच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा ३२ पटीने वाढ झाल्याचे काही युरोपीय प्रकाशक सांगतात, तेव्हा तज्ज्ञ मंडळी त्यांना उत्पन्नवाढ किती झाली हे विचारतात आणि प्रकाशकांचे तोंड उतरते. ई-बुकांचा धंदा हा प्रकाशकाच्या हातात राहिलेलाच नाही, तो अमेझॉन वा अन्य ई-बुक विक्रीमाध्यमांच्या आणि वाचनमाध्यमांच्या मुठीत गेला आहे, हा या तज्ज्ञांचा आवडता दावा वेळोवेळी खरा ठरतो. ही चर्चा एरवीही सुरू असताना, ई-बुकांच्या धंद्यात पाड लागत नाही म्हणून गाशा तरी प्रतिष्ठेने गुंडाळावा, यासाठी पेंग्विन रॅण्डम हाऊससारख्या सोयरिका सुरू झाल्याची चर्चा या धंद्यात मुरलेल्यांनी आरंभली आहे. यात विघ्नसंतोषाचा आणि व्यर्थ भीतीचा भाग असणारच, पण ही सारी चर्चा फक्त पश्चिम युरोप आणि अमेरिका यांच्यापुरतीच आहे आणि तिचा भारताशी काही संबंध नाही. हे ओळखूनच, पेंग्विन आणि रॅण्डम हाऊस यांनी एकत्र येण्यामागचा एक महत्त्वाचा हेतू उदयोन्मुख बाजारपेठांकडे लक्ष केंद्रित करणे, असाच ठेवला आहे.
ही उदयोन्मुख बाजारपेठ म्हणजे आशिया आणि भारत, हे वेगळे सांगायला नको. या बाजारपेठेकडे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकाशक, विशेषत: छापील पुस्तकांचे बडे प्रकाशक-  लक्ष केंद्रित करू लागले आहेत. भारतात
ई-पुस्तकांचे चलनवलन वाढत असल्याचे कौतुक अधूनमधून होत असते आणि आकडे, टक्केवारी अशा देखाव्यांनी ईबुकांच्या भारतीय हनुमानउडीचा प्रवेश उत्तम वठतो. पण हे कौतुक अंमळ रुचिपालट म्हणून असते आणि छापील पुस्तके हीच खरी बाजारपेठ आहे, हे भारतातील प्रकाशन व्यवसायाला पक्के माहीत असते. दिल्लीत गेल्या फेब्रुवारीच्या अखेरीस भरलेल्या विश्व पुस्तक मेळ्यात ७५ टक्क्यांहून अधिक वाटा छापील पुस्तकांचा होता. फ्रँकफर्ट बुक फेअर ही जागतिक पुस्तकव्यापाराची पंढरी, तिथेही भारतीय प्रकाशकांच्या वतीने ‘फिक्की’ने गेल्या महिन्यात जे सादरीकरण केले त्याचा रोख भारतात छापील पुस्तकांची बाजारपेठ वाढू शकेल, असाच होता. असणारच, कारण बाजारपेठेचे समूह-मानसशास्त्र ओळखून काढल्या जाणाऱ्या ‘मास मार्केट’ पुस्तकांपासून ते गंभीर विषयांवरच्या पुस्तकांपर्यंत अनेक पुस्तकांना विविध प्रकारचा वाचकवर्ग असणारा हा देश आहे. इंटरनेट, किंडल यांचा प्रसार अद्याप फार न झाल्याने छापील पुस्तकांची सद्दी इथे कायम आहेच आणि केवळ भारतातील विक्रीसाठी म्हणून काढल्या जाणाऱ्या आवृत्त्यांचा खर्चही तुलनेने फार कमी आहे.
धंद्याची ही गणिते प्रकाशकांनी पाहावीत व आपण आपले वाचत राहावे, हा मार्ग उत्तमच. परंतु आपण काय वाचावे, गाजणारे पुस्तक म्हणून आपल्याला कशाचे कुतूहल वाटावे, हे प्रकाशक मंडळी ठरवत असतात. पेंग्विनला आज रॅण्डम हाऊसने अंकित करून घेतले, पण कालपर्यंत रूपर्ट मरडॉक यांच्या समूहातील हार्पर कॉलिन्स ही प्रकाशन कंपनी पेंग्विनशी हातमिळवणी करण्यात रस घेत होती. मरडॉक स्वस्थ बसणार नाहीत. कदाचित ते सायमन अ‍ॅण्ड शूस्टर या कंपनीशी एकीकरणाचा करार करतील. पाश्चिमात्य देशांत घटत जाणारा नफा सावरून धरण्याचा मार्ग म्हणजे ही एकीकरणे. मार्केटिंग, वाहतूक आदींवरच्या खर्चापासून ते कर्मचाऱ्यांच्या संख्येतही कपात करण्याची किल्ली एकीकरणातूनच मिळणार आहे. ती मिळाली की, भारतासारख्या देशांतील संधी साधण्यासाठी भारताला काय हवे, याचा फारच विचार हे लोक करू लागतील. त्यातून २०१४ च्या सुमारास, आध्यात्मिक इंग्रजी पुस्तकांची बाजारपेठ आपल्या ताब्यात असावी, अशी स्पर्धाच बडय़ांमध्ये सुरू झाल्यास नवल नाही. भारतीय इंग्रजी कादंबरीकारांमध्ये सेलेब्रिटी बनण्याची ताकद किती याला गेल्या काही वर्षांत महत्त्व आले आहेच, पण पुढल्या काळात आम्ही म्हणू ते साहित्यिक आणि आम्ही म्हणू ते सेलेब्रिटी, असाही प्रकार सुरू होईल. दुसरीकडे, भारतीय आत्मकथने, भारतीय इतिहासाला रोचक उजाळा देणारी पुस्तके यांचेही चलन वाढल्याने दर्दी वाचक सुखावतील.
भारतातील प्रकाशन व्यवसायाचे भविष्य खरोखर भारतातच घडवायचे असेल, तर भारतीय भाषांमधील ई-पुस्तकांचे तंत्रज्ञान इथे प्रगत झाले पाहिजे. याचा फायदा आज होणार नाही, परंतु पुढल्या पिढीला बडे प्रकाशक म्हणून फक्त पाश्चिमात्य नावांची चर्चा करावी लागणार नाही. काही भारतीय नावेही पुढे येऊ शकतील. भारतातील इंग्रजी पुस्तकबाजारात असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आजही काही प्रमाणात भारतीय भाषांवर लक्ष केंद्रित करताहेत. पण पुस्तकधंदा ही काही फक्त बाजारपेठीय नियमच लावावेत अशी गोष्ट नव्हे. लोकांनी काय वाचायला हवे, हे ठरवताना बाजाराच्या सर्वेक्षणाइतकेच वा त्याहून जास्त महत्त्व लोकांनी काय वाचून शहाणे किंवा अभिरुचिसंपन्न व्हायला हवे, अशा कळकळीलाही असते. या कळकळीचा मक्ता बडय़ांकडे जाणे हे तो व्यवसाय सुदृढ नसल्याचे द्योतक ठरेल.
नव्या पुस्तकांचा वास आवडतो, असे सांगणारे दर्दी आपल्या आसपास किती तरी असतात. पेंग्विन-रॅण्डम हाऊससारख्या एकीकरणांच्या बातम्या यापुढेही येतच राहतील, तेव्हा या दर्दीनी आपल्या हाती पुढल्या काही वर्षांत येणाऱ्या पुस्तकांना कोणता वास असेल, त्यात अभिरुची असेल की धंदाच, हे ओळखून प्रतिसादाची गणिते बदलण्यासाठी सिद्ध व्हायला हवे.