अग्रलेख : रामलीलेवरील राहुलावतरण |
![]() |
सोमवार, ५ नाव्हेंबर २०१२ सरकारने अलीकडच्या काळात जे काही आर्थिक सुधारणांचे निर्णय घेतले त्यांच्या समर्थनार्थ रविवारचा मेळावा होता असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या मेळाव्याचे उद्दिष्ट एक दिसते. ते म्हणजे, राहुल गांधी यांना निवडणुकीपूर्वी एकदाचे घोडय़ावर बसवणे. राहुल गांधी यांच्या मनात नक्की काय आहे, याचा अंदाज अद्याप काँग्रेसजनांना नाही. ते म्हणतात एक आणि करायला जातात दुसरे आणि होते तिसरेच याचा अनुभव काँग्रेसजनांना वारंवार आला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका नक्की आहे तरी काय, हे समस्त काँग्रेसजनांना कळावे हा यामागील उद्देश असू शकतो आणि त्यात गैर काही नाही. गेल्या आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात राहुल गांधी एखाद्या खात्याची जबाबदारी स्वीकारतील, अशी अपेक्षा होती. राहुल गांधी यांनी ऐनवेळी बसकण मारून पंतप्रधान सिंग आणि काँग्रेसजनांचा हिरमोड केला. त्या वेळी राहुल आता पक्षात मोठी जबाबदारी स्वीकारतील, असे सांगण्यात आले. रविवारची सभा त्या दृष्टीनेच बेतली गेली यात शंका नाही. या सभेत सोनिया गांधी यांनी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या बरोबरीने ‘राहुलजीं’ंचा उल्लेख केल्यावर उपस्थितांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यावरून या सभेच्या उद्दिष्टांविषयी शंका घेण्याचे कारण नाही. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी देश बदलायचा असेल तर काँग्रेसला बदलायला हवे, असा सल्ला दिला. हे कोण करणार? आजवरचा अनुभव असा की काँग्रेस जेवढा बदलाचा दावा करतो तेवढा तो मागासच होत जातो. देशातील किराणा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचे राहुल गांधी यांनी समर्थन केले. त्यांना या निर्णयात आता तरी गुण दिसायला लागले, हे बरेच झाले. या निर्णयाला भाजपचा मोठा विरोध आहे. त्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला. त्यांचे म्हणणे विरोध केल्याने काही होणार नाही. हा साक्षात्कार राहुल गांधी यांना नक्की कधी झाला? परकीय गुंतवणूक किराणा क्षेत्रात येऊ देण्याचा ठराव भाजपने आणला होता, हे खरेच. परंतु मग त्या वेळी काँग्रेसने या निर्णयास का विरोध केला होता, याचेही राहुल गांधी यांनी उत्तर द्यायला हवे. पंतप्रधान सिंग हे आर्थिक सुधारणांचा चेहरा आहे, असे राहुल गांधी यांचे म्हणणे. ते ठीकच आहे. परंतु मग याच मनमोहन सिंग यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात अनेक आर्थिक सुधारणा प्रस्तावांना विरोध केला होता. तो का? या वेळी राहुल गांधी यांनी देशातील गरिबांचा आवाज सरकापर्यंत पोहोचतच नाही, अशी तक्रार केली. गेली आठ वर्षे राहुल गांधी यांच्या काँग्रेसचे सरकार देशात आणि अनेक राज्यांत सत्तेवर आहे. तेव्हा हा गरिबांचा आवाज सरकापर्यंत पोहोचविण्यासाठी राहुल गांधी यांना कोणी रोखले होते काय? देशातील गरिबातील गरीब तरुण जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती झाली असे म्हणता येणार नाही, असे राहुलबाबांना वाटते. त्यांच्या पक्षाच्या संघटनेत वा आताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अशा किती गरीब मुलांना संधी देण्यात आली आहे, हेही त्यांनी सांगावे. सर्व आजी-माजी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांनी हा पक्ष आकंठ भरलेला आहे, हे वास्तव आहे. या वास्तवाची जाणीव राहुलबाबांना एकवेळ राहिली नसल्यास ते समजण्यासारखे आहे. परंतु त्याकडे इतरांनी डोळेझाक का करावी? देशाला आर्थिक सुधारणांची गरज असल्याचेही त्यांनी देशवासीयांना सांगितले. परंतु पंतप्रधान सिंग यांचे सरकार गेली आठ वर्षे या सुधारणांसाठी नक्की काय करीत होते, हेही त्यांनी सांगायला हरकत नव्हती. किंबहुना जेव्हा जेव्हा सिंग यांनी सुधारणावादी निर्णय आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा काँग्रेसने. आणि त्यातही गांधी मायलेकांनी.. सिंग यांच्यावर डोळे वटारले आणि सुधारणा मागे पडल्या, ते कशामुळे? तेव्हा आता तरी या मंडळींना सुधारणांची गरज वाटली असेल तर त्याचे स्वागतच करावयास हवे. |