अग्रलेख : नाक मुरडण्याचा अधिकारं Print

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
साहित्यक्षेत्रात वाद होतात आणि शमतात, ते दरवेळी साहित्यिक वादच असतात असेही नाही. याबाबत मराठी वा इंग्रजीची स्थिती सारखीच आहे. मराठीतील साहित्य संमेलने कुणा उदार नेत्याला उद्घाटक बनवून पार पडणार, अनेक वक्ते नेहमीचे प्रयोग करण्यासाठीच व्यासपीठावर येणार आणि ग्रंथविक्रीच अधिक लक्षात राहणार.

इंग्रजीत तर याहून दयनीय स्थिती आहे, कारण साहित्यिक आणि सेलिब्रिटी यांतील फरक कळेनासा व्हावा, अशी पुस्तके इंग्रजीत वाढली आहेत. इंग्रजीतील साहित्य-उत्सवांचे बाजारीकरण इतके आहे की, साहित्यात घुसलेल्या चंगळवादाबद्दल कवी दिलीप चित्रे यांनी दोन दशकांपूर्वी केलेल्या, ‘बापट-पाडगावकरांनी कवितेचे बघे निर्माण केले’ या आरोपाची आठवण वारंवार व्हावी. बघ्यांच्या गर्दीत साहित्यिक वाद उद्भवले तरी त्यांचे च्युइंगगम होणार किंवा वादाचा उद्गाता कानफाटय़ा ठरणार, अशी शक्यता दाट असते. मग बावनकशी साहित्यिक वाद ज्यांना म्हणावे, अशी मतांतरे उपस्थितच होत नाहीत आणि या अभावात लोकांच्या भावनांना हात घालणारे, जातिवाचक, कंपूमंडूक वृत्तीचे शेरे मारणारी माणसे साहित्यिक म्हणून परिचित असली की मग त्यांनी जणू काही महत्त्वाच्या मुद्दय़ाला हात घातला आहे, अशी जाहिरात हितसंबंधी गट करतात. या अनाठायी भलामणीवर प्रखर प्रतिक्रिया उमटली की ‘अब्रह्मण्यम’ची ओरड करण्यासाठी हेच हितसंबंधी पुढे येतात. याउलट खरा साहित्यिक वाद केवळ एखाद्या साहित्यिकावर आक्षेपांची राळ उडवल्यासारखा प्रथमदर्शनी भासला, तरी आवाहन सर्वच साहित्यिकांना त्यांच्या काळाची आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याची ताकद त्यात असते. गिरीश कर्नाड यांनी व्ही. एस. नायपॉल यांच्यावर मुंबई लिट-लाइव्ह नामक साहित्य उत्सवात केलेली जाहीर टीका ही अस्सल साहित्यिक वादाचे उदाहरण ठरते, ती या ताकदीमुळे. या उत्सवाचा प्रारंभच नायपॉल यांना खास जीवनगौरव पुरस्कार देऊन झाला होता आणि मुंबईने नायपॉल यांना जीवनगौरव देणे अनाठायी आहे, हे सांगण्यासाठी कर्नाड यांनी, त्यांच्याकडून येथे अपेक्षिले गेलेले ‘प्रेझेंटेशन’ बाजूला ठेवण्याची हिम्मत केली.
नायपॉल यांच्या लंपटपणाचे दाखले त्यांचा एकेकाळचा चेला, प्रवासवर्णनकार पॉल थेरॉ यांनी ‘सर विडियाज् श्ॉडो’ या पुस्तकात दिले होते. नायपॉल यांच्या तुसडय़ा वर्तणुकीचे मूळ त्यांच्या अभ्यासूपणात नसून स्वार्थीपणात आहे, असे थेरॉ यांचे म्हणणे.  हे पुस्तक १९९८ मध्ये प्रकाशित झाले आणि तीनच वर्षांनी नायपॉल साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले. यानंतर जवळपास एका तपाने कर्नाड यांनी केलेली टीका अजिबात व्यक्तिगत नाही, नायपॉल यांना भारताचे वादी-संवादी सूर कळतच नाहीत, असा कर्नाड यांचा आरोप आहे. सूर न समजण्याच्या स्थितीला इंग्रजीत जो टोन-डेफनेस असा शब्द आहे, तो कर्नाड यांनी नायपॉल यांच्यासाठी वापरला आणि भारतीय संगीतामध्ये हिंदू-मुस्लीम परंपरांचा कसा संगम दिसतो आहे तो पाहा, असा सल्लाही कर्नाड यांनी दिला. ताजमहालाबद्दल नायपॉल यांनी केलेल्या विधानांत निराळेपणाचे मूल्य आहे, परंतु त्याखेरीज कोणतीही सखोलता त्या विधानांना नाही आणि भारतीय वास्तुकलेत इस्लामी वास्तुकलाही कशी मिसळली याचे भान तर नाहीच, ही कर्नाड यांची खंत आहे. भारतवर्षांवर बाबराने केलेली चढाई आणि पुढल्या पाच शतकांत झालेली मोगलाई, ही भारतावरील जखम असल्याचा जो गवगवा ‘फोडा आणि झोडा’ नीतीच्या सुरुवातीपासून ते १९०० पर्यंत ब्रिटिश विद्वानांमार्फत सुरू होता, त्या आणि तेवढय़ाच विद्वानांच्या पुस्तकांवर नायपॉल यांनी विसंबून राहावे हे खेदकारी आहे, असे कर्नाड यांना वाटते.
बिनडोकपणाने याचा अर्थ एखाद्या अतिसोप्या वाक्यात सांगता येईल आणि नायपॉल मुसलमानांच्या विरुद्ध आहेत म्हणून कर्नाड यांना लगेच मुसलमानांचा पुळका येतो अशा शब्दांची रेलचेल त्या वाक्यात असेल. पण इथे एक लक्षात घ्यायला हवे की, कर्नाड यांच्यावर बेगडी धर्मनिरपेक्षतावादाचा- म्हणजे स्यूडो सेक्युलॅरिझमचा- हातखंडा आरोप कुणीही करू शकणार नाही, इतकी त्यांची योग्यता आहे. चार दशकांपूर्वी ‘तुघलक’ लिहिणाऱ्या या नाटककाराने पुढे भारतीय रंगभूमीच्या परंपरांचा- लोकपरंपरांचा आणि पुराणकाळापासून भारतीय नाटय़ ज्यामुळे निर्माण होते त्या मिथकांचा अभ्यास केला. या अभ्यासातून आजही भारतीय नातेसंबंधांना लागू ठरतील, अशी हयवदन आणि नागमंडलसारखी लखलखीत नाटके लिहिली. विजया मेहता यांच्या ज्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन रविवारी झाले, त्यात कर्नाडांचे हे नाटक जर्मनीत विजयाबाईंनी केले तेव्हा तिथल्या संचातील नटमंडळींनी ते आपलेसे कसे केले, याचीही वर्णने आहेत. देशीवादी म्हणवणाऱ्या लेखक-कलावंतांना जो इथेच राहून, याच मातीत रुजून जगभर जाण्याचा बहुमान हवा असतो, तो कर्नाड यांनी नक्कीच मिळवला याची पावती विजयाबाईंच्या त्या वर्णनांतून मिळेल. तेव्हा इतिहासाचा आपण लावतो तसा अर्थ कर्नाड लावत नाहीत म्हणजे त्यांचा हेतू आपल्याविरुद्ध आहे, असे मानता येणे फार फार कठीण आहे. कर्नाड यांच्या विधानाने कदाचित या देशातील बहुसंख्याकांचे लांगूलचालन करण्याची संधी गमावलीच असेल, पण लांगूलचालनादी हेतूंपासून आपण शेकडो योजने दूर आहोत आणि लेखक म्हणून आपण लोकानुनयवादी नाही, हे कर्नाड यांनी साहित्यकृतींमधून अगोदरपासूनच दाखवून दिलेले आहे.
पाश्चात्त्यांचा अनुनय नायपॉल यांनी केला, हा नायपॉल यांच्या लिखाणावरील नेहमीचा आक्षेप कर्नाड यांनी घेतलेला नाही. उलट, या अनुनयवादी उपयोजित शैलीचा उल्लेख ‘माणसांचे आणि स्थळांचे चित्रदर्शी वर्णन करणाऱ्या पत्रकारितासदृश लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना’ असा कर्नाड यांनी केला. नायपॉल यांच्याकडे भाषालालित्य आहे, हे कर्नाड यांनी आवर्जून सांगितले. परंतु मूळ भारतीय असून ज्यांच्या दोन पिढय़ा बेटांवर वाढल्या आणि पुढे ब्रिटनचे नागरिक झाले, त्या नायपॉल यांनी भारताचे, ‘बाबराने जखमी केलेली संस्कृती’ हेच वर्णन मान्य करून टाकल्याने त्यांच्या अभ्यासावर शंका येते आणि ही शंका घेणे रास्तच आहे. कारण नायपॉल यांनी कालबाह्य आधार स्वीकारताना त्या आधारांमागच्या हेतूंची शहानिशा केलेलीच नाही, याबद्दल कर्नाड अस्वस्थ आहेत. भारताची सद्यस्थिती सांगत असल्याचा देखावा करीत या देशाबद्दल विषारी किल्मिषे पेरण्याचा जो ‘इंडिया बॅशिंग’ साहित्यप्रवाहच इंग्रजीत सुरू झाला, त्याच्या आदिपुरुषांपैकी नायपॉल एक. त्यामुळे त्यांना कर्नाड यांच्यासारख्या देशप्रेमी देशीवाद्याकडून अहेर मिळणे सयुक्तिकच होते. इंग्रजी मीडियाला मात्र कर्नाड पचणे कठीण आहे, त्यामुळे आता नायपॉलसुद्धा मुस्लीमप्रेमीच असल्याचा भलता प्रचार इंग्रजी पत्रांनी आरंभला आहे!
‘आपण’ आणि ‘ते’ एवढय़ाच बाजू असणारा वाद साहित्यिक नसतो आणि साहित्यिकाला मिळणाऱ्या जीवनगौरवाकडे पाहून नाक मुरडायचे, तर त्याआधी काहीएक अधिकार कमवावा लागतो. मुस्लीम, ब्राह्मण, दलित, शहरी, ग्रामीण यांच्या पलीकडले पाहावे लागते. मात्र, मी पलीकडलेच पाहणार असा पवित्रा घेऊन गप्पच राहणेही योग्य नसते. कर्नाड यांचे कौतुक आहे ते, नाक मुरडण्याचा त्यांचा अधिकार त्यांनी योग्य वेळी, योग्य ठिकाणी  वापरल्याबद्दल.