नितीनभौ काय करून राह्यले.. |
![]() |
बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ हे त्यांच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे निदर्शक आहे. परंतु उच्चपदी गेल्यावर या स्वभावास मुरड घालायची असते. ज्यास नेतृत्व करावयाचे आहे त्याच्या जिभेवर खडीसाखरेने कायमस्वरूपी वसतीस असावे लागते. एरवी गोडधोडाचे प्रेमी असणाऱ्या नितीनभौंना गोड भाषेचे तेवढे वावडे आहे. त्यामुळेच मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम हे दोन्ही नावे एकाच वाक्यात घेऊ शकले. त्यांच्याकडून जे काही घडले ते भाजपच्या सद्यस्थितीचे निदर्शक आहे. या पक्षाचे नियंत्रण सध्या नक्की कोणाच्या हाती आहे, हे कळावयास मार्ग नाही. पक्षात अटलबिहारी वाजपेयी यांच्या युगाचा अस्त झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांचा कालखंड सुरू होईल असे मानले जात होते. तसे झाले नाही. अडवाणी कराचीच्या कात्रीत सापडले आणि स्वत:च नेतृत्व शर्यतीतून कापले गेले. त्याचे शल्य त्यांच्या मनातून अद्याप गेलेले नाही आणि ते साहजिकच म्हणावयास हवे. त्यामुळे त्यांच्यानंतर भाजपच्या नेतृत्वफळीत अचानक मोठा खड्डा पडला आणि आता सगळेच समवयस्क तू पुढे का मी मागे हे ठरवण्यात मग्न आहेत. देशउभारणीसाठी पुढच्या पन्नास वर्षांचे नियोजन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही एका अर्थाने हे अपयश म्हणावयास हवे. संघाने कितीही नाकारले तरी भाजपचा नेतृत्वपुरवठा संघाकडूनच होतो, हे सत्य आहे. संघाला बाजूला सारून थेट जनतेपर्यंत पोहोचावयाची धमक असलेले अटलबिहारी वाजपेयी हे जोपर्यंत कार्यरत होते तोपर्यंत त्यांचे थेट पंख कापण्याची हिंमत संघाला झाली नाही. वाजपेयी यांच्या काहीशा उदारमतवादी दृष्टिकोनास चाप लावण्याचा प्रयत्न त्याही वेळी दत्तोपंत ठेंगडी वा माजी सरसंघचालक के. सुदर्शनजी यांनी करून पाहिला. परंतु वाजपेयी यांची लोकप्रियताच एवढी की त्यांनी या मंडळींना अजिबात जुमानले नाही आणि आपल्याला हवे तसेच केले. अडवाणी यांना ती संधी मिळाली नाही. वाजपेयी कार्यरत होते तोपर्यंत अडवाणी यांना एक तर त्यांच्या छायेखालीच राहावे लागले आणि नंतर संधी मिळाली तेव्हा ते कराची कल्लोळात सापडले. त्यांच्यानंतर भाजपत आता समवयस्कांचेच रान माजले आहे. अरुण जेटली हे सुषमा स्वराज यांना पाण्यात पाहतात आणि सुषमाताइरे या अरुणभाईंचा रागराग करतात. हे दोघे मिळून मग उत्तर प्रदेशचे राजनाथ सिंग यांना विरोध करतात. राजनाथ सिंग यांना उत्तर प्रदेशचे कलराज मिश्र आणि लालजी टंडन आदी आव्हान देऊ पाहात असतात. या तिघांतील संघर्षांस पुन्हा राजपूत आणि ब्राह्मण अशीही किनार आहे. बिहारात भाजपने जनता दलाच्या नितीशकुमार यांच्यापुढे दुय्यम भूमिका स्वीकारली आहे. वास्तविक भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारात घवघवीत यश लाभले, परंतु त्यास नितीश यांच्या मागेच सध्या तरी राहावे लागणार. त्यातही भाजपचे तेथील नेते सुशील मोदी हे स्वपक्षीयांपेक्षा नितीशकुमार यांच्याच अधिक प्रेमात आहेत. शिवाय सी. पी. ठाकूर आणि अन्य यांच्यातही संघर्ष आहे. भाजपचे बिहारी मोदी निदान सुशील तरी आहेत. परंतु दुसरे मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, यांच्याबाबत तसेही म्हणता येणार नाही. ते फक्त स्वत:लाच मानतात. नेतृत्वाच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर आहोत याची त्यांना पूर्ण खात्री आहे आणि त्यांना वेसण घालायची ताकद आज भाजपत कोणाकडेही नाही. राजस्थानात भाजपच्या सर्वेसर्वा वसुंधराराजे यांचे रुसवेफुगवे अद्याप संपलेले नाहीत. यामुळे दक्षिणेकडे नेतृत्व द्यावे तर वेंकय्या नायडू हे फक्त एकवाक्यी प्रतिक्रिया देण्यापुरतेच उरले आहेत की काय, असा संशय यावा. तामिळनाडूत भाजपस काही लक्षणीय स्थान नाही. तेव्हा तिकडचे काही नेते पक्षाने तोंडी लावण्यापुरते वापरून पाहिले, पण त्यातून फारसे काहीही साध्य झाले नाही. |