अग्रलेख :जवापाडे सुख.. Print

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
चहूबाजूंना दाटलेल्या काळ्याकुट्ट ढगांचा पडदा वाऱ्याच्या एखाद्या दमदार झोतामुळे नाखुशीनेच बाजूला व्हावा आणि पलीकडे चमकणाऱ्या सूर्याचा एखादा किरण अंधार भेदत त्यातून बाहेर पडावा, त्या किरणांनी काळ्याकभिन्न ढगांनाही सोनेरी किनारीचा साज चढवावा आणि काजळल्याने उदासउदास झालेली अवघी सृष्टी पुन्हा आनंदाने उजळून निघावी, तसे काही मोजके, सुखाचे क्षण पर्वताएवढी दु:खे झेलणाऱ्या माणसाच्याही वाटय़ाला यावेत, यासाठी वर्षांनुवर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी! आनंद साजरा करण्याच्या या अनोख्या परंपरेला संस्कृतीच्या कित्येक रंगांनी समृद्ध केले आहे. वनवास संपवून राजधानीत परतलेल्या रामचंद्रांच्या आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थ दीपज्योती उजळून साजऱ्या झालेल्या उत्सवाची परंपरा कुणी दिवाळीशी जोडतात, तर कुणाला सम्राट अशोकाच्या दिग्विजयाचे दिवाळीशी नाते दिसते. कुणी विक्रमादित्य चंद्रगुप्ताच्या राज्याभिषेकाचा आनंद दिवाळीच्या निमित्ताने साजरा करतात, तर कुणी भक्तिभावाच्या सात्त्विक रंगांनी दिवाळीचे दिवस सजवितात. दिवाळीच्या या परंपरेला अगदी पुराणकाळाचा इतिहास असला, तरी मराठमोळ्या दिवाळीला गेल्या शतकभराच्या सांस्कृतिक इतिहासाने आणखी समृद्ध केले आहे. दिवाळी म्हणजे अभ्यंगस्नान, सुगंधी उटणे, सुवासिक तेले, सूर्योदयाअगोदरचे देवदर्शन, नवे कोरे कपडे, फराळाचा आस्वाद, आप्तेष्टांचे अभीष्टचिंतन, फटाके, आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई आणि घरासमोरच्या अंगणाला शोभा देणारी रंगीबेरंगी, प्रसन्न रांगोळी.. दिवाळी म्हणजे वर्षभरातील वेदनांवर फुंकर घालणारा, पर्वताएवढी दु:खेही दूर करून आनंदाच्या क्षणांनी न्हाऊ घालत मनाला नवी उभारी देणारा ‘जवाएवढय़ा सुखा’चा काळ.. दिवाळी म्हणजे आयुष्याच्या सुंदर अर्थाची अनुभूती देणाऱ्या ‘जेमतेम’ क्षणांची साठवण आणि लहानपणीच्या, ‘हरवलेल्या भूतकाळा’ची आठवण.. बदलत्या काळासोबतच्या प्रथा-परंपरांनी समृद्धीच्या या उत्सवात असंख्य नवनव्या आनंदक्षणांची भर घातली आणि हा सणदेखील समृद्ध करून सोडला. दैनंदिन आयुष्यातील व्यथांनादेखील या सणाने आनंदाची झालर आणि दु:खाचे डोंगर पार करण्याची शक्तीही दिली. म्हणूनच, संतांपासून सामान्यांपर्यंत सर्वाच्या आयुष्यातील आठवणींच्या कप्प्यात दिवाळीच्या प्रत्येक सणाची शिदोरी साठून राहिलेली असते. दिवाळीचे दिवस जवळ येऊ लागतात, तसतसे आठवणींचे हे कप्पेही ताजेतवाने होऊ लागतात. मोहरलेली मने भूतकाळातल्या दिवाळीची साठवण जागी करू लागतात आणि मनाच्या आरसपानी आरशात लख्खपणे उजळणाऱ्या आठवणींच्या फुलबाज्यांतून आनंदाच्या चांदण्यांचे शिंपण सुरू होते..
..पहाटे पहिला कोंबडा आरवला, की गावाला जाग येते आणि घराघरांत लगबग सुरू होते. देवघरात समईची ज्योत तेवू लागली, की त्या ज्योतीचे तेज एखाद्या पणतीमध्ये उतरते आणि एका पणतीची ज्योत असंख्य नव्या ज्योती उजळवून सोडते. बघताबघता दिव्यांच्या माळा घराचा कानाकोपरा उजळवून टाकतात आणि ‘दिवाळी’ सुरू होते.. दूरवरच्या माळरानावरून गावात शिरणारा तांबडय़ा मातीचा, थंडीने कुडकुडणारा एकाकी रस्ता पहाटेआधीपासूनच पहिल्या ‘एसटी’ची आसुसलेपणाने वाट पाहत असतो. कित्येक वर्षांपूर्वी आपल्या अंगाखांद्यावर बागडलेली चिमुकली पावले आज पुन्हा इथूनच आपल्या घराची वाट धरणार या कल्पनेनेच तो मोहरून गेलेला असतो. पहाटेचा संधिप्रकाश सुरू होण्याआधीच उटण्याच्या आणि अगरबत्ती-अत्तराच्या सुगंधाने गाव परमळून जाते आणि चुलीवर तापलेल्या खमंग पाण्याच्या अभ्यंगस्नानानंतर देवघरांतून स्तोत्रे, आरत्यांचे सूर घुमू लागतात. कडाक्याच्या थंडीने गारठून आपापल्या घरटय़ांत चिडीचूप झालेल्या पाखरांनाही पहाटे काहीशी लवकरच जाग येते आणि स्तोत्रांच्या सुराला चिमण्या-पाखरांच्या किलबिलाटाची साथ सुरू होते. ताटकळत वाट पाहणाऱ्या रस्त्यावर तांबडीभडक एसटी अचानक अवतरते आणि आनंदाने मोहरलेला रस्ता धुळीचा एक दणदणीत लोट आकाशात उधळून आनंद साजरा करतो. आता गावात खरी दिवाळी झालेली असते.. कधीपासून जागा झालेला अवघा गाव हेच अनुभवण्यासाठी जणू आतुरलेला असतो. तांबडा लोट आकाशात उमटताच, ‘बाबल्या इलो रे..’ अशी आरोळी गावात घुमते.. लांबच्या प्रवासामुळे धापा टाकणारी एसटी घरघर थांबवून रस्त्याकडेच्या पाराशेजारी विसावते आणि अवघ्या गावाच्या दिवाळीचे दिवस आनंदाने फुलून जातात.. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मराठमोळ्या गावागावांत अशीच दिवाळी अजूनही साजरी होते..
गावाकडचे अभ्यंगस्नान आणि फराळाच्या मेजवानीत आनंदाच्या आणखी एका झिरमिरी कारंज्याची भर पडली आहे. दिवाळी साजरी करणाऱ्या प्रत्येक घराला फराळ, फटाके आणि रोषणाईसोबत एका आगळ्या मेजवानीचीही चटक आहे. गेल्या शंभर वर्षांपासूनची प्रत्येक मराठमोळी दिवाळी या मेजवानीमुळे समृद्ध झालेली आहे. शहर असो वा गाव, ज्या घरात दिवाळीचा दिवा उजळतो, त्या घरात ‘दिवाळी अंका’चेही दर्शन घडते. एकशेतीन वर्षांपूर्वी दिवाळीच्या आनंदाला ‘मनोरंजना’चा साज चढविणाऱ्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाने मराठमोळी दिवाळी आगळीवेगळी करून सोडली. दिव्यांच्या रोषणाईने घरेदारे सजली, तशीच दिवाळी अंकांनी मनामनांवर रोषणाई केली. काही दिवाळी अंकांनी मनांना नव्या उभारीचं ‘टॉनिक’ दिलं, तर काही दिवाळी अंकांनी अनेक ‘किशोर’मनांना नवे आकार दिले.. कुणी ‘आवाजा’चे खुसखुशीत कप्पे उलगडत विनोदाच्या डोहात मनसोक्त डुंबत राहिले.. दिवाळी अंकाची ही परंपरा पुढच्या प्रत्येक वर्षांगणिक अधिकाधिक समृद्ध होत गेली आणि सातासमुद्रापार, ‘सिलिकॉन व्हॅली’सारख्या दूरच्या कोपऱ्यात, गावाकडची दिवाळी ‘मिस’ केल्याच्या भावनेने खंतावत भूतकाळातील दिवाळीच्या आठवणींत रमणारा, घराकडून ‘कुरिअर’ने येणाऱ्या फराळाच्या ‘पार्सल’ची आतुर वाट पाहणारा एखादा मराठमोळा तरुणदेखील दिवाळी अंकाच्या ओढीनं ‘संगणकजाला’वरचं ‘मराठी विश्व’ धुंडाळत एकटेपणाची भावना झटकू लागला.. कारण दिवाळी अंकांच्या शतकोत्तरी परंपरेला आता ‘ई-अंकां’च्या नव्या तंत्राची जोड मिळाली आहे. आता दिवाळी अंक केवळ ‘वाचनीय’च नव्हे, तर ‘श्रवणीय’ आणि ‘प्रेक्षणीय’देखील होऊ लागला आहे.. चहूबाजूंच्या काजळलेल्या क्षणांनाही आनंदाची, उत्साहाची एखादी रुपेरी किनार चढविणाऱ्या दिवाळीला मनाची मशागत करणाऱ्या या आगळ्या परंपरेने आणखी समृद्ध केले आहे.
दिवाळी हा आनंदाचा सण तर आहेच, तिला ज्ञानाची, जाणिवांची, विवेकाची जोड मिळाली, तर प्रत्येक दिवाळी आगळी होऊन जाते. सामंजस्याने जगाकडे पाहण्याची दृष्टी लाभली की सर्वत्र सदासर्वदा दिवाळी दिसते. मराठमोळ्या मनांवर अशा दिवाळीचे संस्कारही फार पूर्वीपासूनच झाले आहेत. ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैसी याचा श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी..’ असे संत ज्ञानेश्वरांना वाटते, तर ‘दसरा दिवाळी तोचि माझा सण, सखे हरिजन भेटतील’ असे म्हणणाऱ्या तुकोबारायांना, आप्तेष्टांच्या भेटीत दिवाळीचा आनंद मिळतो. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा..’ अशी शिकवण असलेली मराठी मने अलीकडे ‘व्हच्र्युअल दिवाळी’च्या आहारी जाऊ लागली आहेत, अशी खंत कधी कधी कुठे ऐकू येते. बाजारपेठांच्या अतिरेकी जाहिरातबाजीच्या कोलाहलात खरी सांस्कृतिक दिवाळी हरवत चालली आहे, असा काळजीचा सूरही कुठे तरी उमटू लागतो आणि जगाचे भौगोलिक अंतर भेदून क्षणकालापेक्षाही कमी वेळात भावना पोहोचविणाऱ्या ‘एसएमएस’च्या नव्या संस्कृतीने मनामनांचे भावनिक अंतर मात्र वाढत जाईल, अशी भीतीही व्यक्त होते.
पण ही खंत, ही भीती आणि ही काळजीच, आपल्या जीवनशैलीतील ‘जवापाडे सुख’ जोपासणाऱ्या या सणाची संस्कृती जपण्यासाठी सिद्ध आहे. जोवर ही काळजी व्यक्त होते आहे, तोवर काळजीचे कारण नाही. आपली सांस्कृतिक दिवाळी सदैव सजलेलीच राहणार!