लालकिल्ला : संगमांना ‘भरपाई’ची संधी Print

 

सुनील चावके - सोमवार, २५ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढून पराभूत झाल्याने संगमांचे विशेष नुकसान होणार नाही. उलट राष्ट्रीय राजकारणात खुरटलेल्या स्वत:च्या राजकीय कारकीर्दीला संजीवनी देण्याची संधीच त्यातून त्यांना साधता येईल. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यापुढे भाजपमध्ये जाण्याचा किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी युती करण्याचा पर्याय असेल.


आज पूर्णो संगमा काँग्रेसमध्ये असते तर सोनिया गांधींच्या खास विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांची गणना झाली असती. ईशान्य भारताला राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून ठेवणारे, देशातील दहा कोटी आदिवासींचे सर्वात विश्वासार्ह प्रतिनिधी, शिवाय कॅथोलिक ख्रिश्चन अशा उपजत वैशिष्टय़ांमुळे काँग्रेसच्या राजकारणात त्यांचे स्थान सुरुवातीपासूनच अनन्यसाधारण होते. काँग्रेसमध्ये टिकून राहण्यासाठी लागणारा किमान संयम त्यांच्या ठायी असता तर आज राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत त्यांचेच नाव अग्रक्रमावर असते आणि कदाचित त्यांच्या उमेदवारीपुढे प्रणब मुखर्जीची अवस्था राष्ट्रपती होण्यासाठी सर्व पात्रता असलेल्या डॉ. कर्णसिंहांसारखी झाली असती. राजकारणात अशी जर-तरची भाषा निर्थक ठरत असली तरी महत्त्वाकांक्षी झेप घेण्याची खरी संधी संगमांना काँग्रेसमध्येच होती, यात शंकाच नाही.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा राजकीय क्षितिजावर उदय होण्यापूर्वी नव्वदीच्या दशकाअखेर संगमांच्या प्रामाणिक, पारदर्शी आणि स्पष्टवक्त्या व्यक्तिमत्त्वाने राजकारणात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांची आस बाळगणाऱ्या मध्यमवर्गीयांचे कल्पनाविश्व काबीज केले होते. ‘मुख्य प्रवाहा’तील नेत्यांप्रमाणे कपटी डावपेचांचा लवलेश नसल्यामुळे राजकारणात असूनही ते राजकारणापासून अलिप्त असल्याचे भासत होते. लोकसभेत मुद्दय़ांऐवजी गुद्दय़ांवर येऊ पाहणाऱ्या नाठाळ सदस्यांना अध्यक्षांच्या खुर्चीतून ‘द होल कंट्री इज वॉचिंग अस’ असे म्हणत फटकारताना त्यांचा सात्त्विक संताप सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना व्यक्त करीत होता. पण १९९६ ते १९९८ दरम्यान मिळालेल्या या लोकप्रियतेची ‘नशा’ डोक्यात गेलेल्या संगमांनी १९९९ साली शरद पवारांच्या नादी लागून एका उंचीवर पोहोचलेली कारकीर्द स्वत:हूनच लाथाडली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून सोनिया गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देत काँग्रेसला ‘राष्ट्रीय’ पर्याय निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापक तर बनले, पण मुख्य प्रवाहातून बाजूला सारले गेले, स्वत:ची राष्ट्रव्यापी प्रतिमा घालवून बसले आणि मेघालयापुरतेच सीमित झाले. राष्ट्रवादी काँग्रेस जून महिन्यात तेरावा स्थापना दिवस साजरा करीत असतानाच स्वत: जन्माला घातलेल्या पक्षाला (तूर्तास) तिलांजली देत राष्ट्रपती बनण्याच्या ईष्र्येने संगमा मैदानात उतरले आहेत. तेरा वर्षांमध्ये पूर्णपणे वलयहीन झाल्यानंतर.
गेले वर्षभर टीम अण्णा आणि बाबा रामदेव यांनी यथेच्छ निंदानालस्ती करीत समाजात राजकीय वर्गाविषयी कमालीचा तिरस्कार आणि द्वेषपूर्ण वातावरण तयार केले. पण त्याकडे पूर्णपणे कानाडोळा करून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या ‘एक्स्क्लुझिव्ह क्लब’ने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी देशातील संसद व विधानसभा सदस्यांपुढे राजकारणात सक्रिय असलेल्या दोन उमेदवारांचेच पर्याय ठेवले आहेत. अब्दुल कलाम यांच्यासारख्या राजकारणाबाहेरच्या नावाचा आग्रह धरणाऱ्या ममता बॅनर्जी एकाकी पडल्या. राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी काँग्रेस-यूपीएचे उमेदवार प्रणब मुखर्जी यांच्या प्रगल्भतेमुळे सध्या मी मी म्हणणाऱ्या विरोधकांचे डोळे दिपून गेले असून त्यांच्यात उभी फूट पडली आहे. राष्ट्रीय राजकारण पुरते ढवळूून निघाले असून सारीच ‘नैसर्गिक’ राजकीय समीकरणे मोडीत निघाली आहेत. काहींना हा ‘ओन्ली प्रणब’ ब्रॅण्ड प्रस्थापित करण्यासाठी सरसावलेल्या बाह्य़ शक्तींचा परिणाम वाटत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसह येत्या दोन वर्षांतील प्रत्येक लहान-मोठय़ा निवडणुकीत आपला पक्ष गाळात जाणार याविषयी काँग्रेसजनांनाच शंका उरलेली नाही. पण प्रणब मुखर्जीना वश होऊन जनता दल युनायटेड, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, शिवसेना, माकप, फॉरवर्ड ब्लॉक यांसारख्या जन्मजात काँग्रेसविरोधी पक्षांनी कथानकाला नाटय़मय वळण लावले  असून हा ‘कमर्शियल ब्रेक’ जाणकारांना अचंबित करणारा ठरला आहे. २३ टक्के मते असूनही स्वत:चा उमेदवार देऊ न शकणाऱ्या मुख्य विरोधी पक्ष भाजपचीही त्यात भर पडली. व्यापक बहुमत आपल्या बाजूने झुकविण्याचा चंग बांधून निवडणुकीत उतरलेल्या प्रणब मुखर्जीना प्रतीकात्मक लढत देण्यासाठी भाजपने संगमा यांना ‘दत्तक’ घेतले. ‘राष्ट्रवादी’ मार्गाने संगमा यांनी काँग्रेस ते भाजप असा दोन ध्रुवांचा प्रवास पूर्ण केला. पण त्याचा या एकतर्फी लढतीवर परिणाम होण्याची शक्यता नसून प्रणब मुखर्जीचा विजय निश्चित वाटत आहे.   
आपण आयुष्यात एकाही निवडणुकीत पराभूत झालेलो नाही, हा संगमा यांचा दावा वयाच्या ७० व्या वर्षी लोकसभेत पहिल्यांदा निवडून येणाऱ्या प्रणब मुखर्जीच्या मनात घबराट निर्माण करणारा असला तरी तो सर्वस्वी खरा नाही.
पाच-सहा लाख मतदारांच्या तुरा लोकसभा मतदारसंघातून संगमा यांनी नऊ वेळा मिळविलेले विजय कौतुकास्पद असले तरी तुरामध्येजिंकणे आणि दिल्लीत विजय मिळविणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. १९९६ साली लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संगमा यांनी अल्पावधीत बेसुमार लोकप्रियता संपादन केली. पण १९९८ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीनंतर लोकसभा अध्यक्षपद शाबूत राखण्यात त्यांच्यासाठी ही लोकप्रियता कुचकामी ठरली. त्या वेळी लोकसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत याच लालकृष्ण अडवाणींनी संगमांना शब्द देऊन त्यांना ऐन वेळी दगा दिला आणि तेलुगू देसम पार्टीचे जी.एम.सी. बालयोगी यांच्याविरुद्ध निवडणूक लढून पराभूत होण्यास भाग पाडले. १४ वर्षांपूर्वी ज्या अडवाणींनी गंडविले, त्यांच्याच सौजन्याने दुसऱ्यांदा पराभूत होण्यासाठी संगमांनी पुन्हा कंबर कसली आहे, राजकारणात सक्रिय असलेल्या आपल्या अपत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सोडून. प्रणब मुखर्जीच्या उमेदवारीचा कसून विरोध करीत असल्या तरीही ममता बॅनर्जीनी संगमांचे समर्थन केलेले नाही. कारण त्यांची पसंती डॉ. अब्दुल कलाम यांनाच होती आणि कलामांनीही त्यासाठी ममता बॅनर्जीचे पत्र लिहून मनापासून आभार मानले. पश्चिम बंगालमधील ३० टक्के मुस्लीम मतदारांना अब्दुल कलामांच्या नावाने गुंतवून ठेवण्यासाठी ममतांनी बंगाली अस्मिता ठोकरण्याचा जुगार खेळला. भाजपच्या कुशीत बसलेल्या संगमांना पाठिंबा देणे ममता बॅनर्जीना राजकीयदृष्टय़ा सोयीचे नाही.
अर्थात, राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढून पराभूत झाल्याने संगमांचे विशेष नुकसान होणार नाही. उलट राष्ट्रीय राजकारणात खुरटलेल्या स्वत:च्या राजकीय कारकीर्दीला संजीवनी देण्याची संधीच त्यातून त्यांना साधता येईल. कारण राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यापुढे भाजपमध्ये जाण्याचा किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी युती करण्याचा पर्याय असेल. ईशान्येकडील राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने बस्तान बसविण्याचा गेल्या अनेक दशकांपासून भाजप प्रयत्न करीत आहे. संगमांच्या माध्यमातून ईशान्य भारतात भाजपला रेडिमेड नेता मिळेल आणि संगमांना राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्वाची व्याप्ती वाढविण्याची संधी. शिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक तसेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांच्या उमेदवारीचा सुरुवातीपासून पुरस्कार केल्यामुळे भाजप-रालोआपासून दुरावलेल्या पटनाईक-जयललिता यांच्यातील महत्त्वाचा दुवा बनण्याचीही त्यांना संधी असेल. रालोआतील सर्व घटक पक्षांना हाताळणारे जॉर्ज फर्नाडिस यांची जागा गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहे. आपल्या उतावळेपणाला लगाम घालून मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठीचा संयम राखल्यास संगमांना रालोआत निर्माण झालेली ही पोकळी भरून काढता येईल. अर्थात त्यासाठी संगमांना प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचा परतीचा दोर कापावा लागेल. कारण मेघालय विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले पुत्र कॉनरॉड आणि केंद्रात राज्यमंत्री असलेल्या कन्या अगाथा यांच्यासाठी संगमांना राष्ट्रवादीकडे परतण्याचा मोह होऊ शकतो. हा मोह टाळल्यास २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय नेते म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. वयाच्या ६५ व्या वर्षी संगमा यांना अजूनही एक दशकभर राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणे शक्य आहे. कधी काँग्रेसच्या विरोधाचे, तर कधी समर्थनाचे राजकारण करून तेरा वर्षे संभ्रमात काढल्यानंतर संगमा यांना राष्ट्रपतिपदाची निवडणूूक लढण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवरील आपला अज्ञातवास संपविण्याची संधी लाभली आहे. तीही अशा मोक्याच्या वळणावर जिथून यापुढे केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा सत्ता येण्याची शक्यता धूसरच आहे. अशा स्थितीत भाजप-रालोआ आणि तिसऱ्या-चौथ्या आघाडीतील पक्षांमध्ये संगमांसारखे व्यापक मान्यता असलेले नेते बोटावर मोजण्याइतकेच असतील. विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून सोनिया गांधींना विरोध करण्यात शरद पवार यांची साथ देताना संगमांनी स्वत:चा राजकीय उत्कर्ष खुंटवून घेतला. मेघालयात ते काँग्रेसच्या विरोधात लढत राहिले आणि महाराष्ट्रात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्मल्यापासून काँग्रेसशी युती करून सत्तेचे अखंड सुख उपभोगत राहिला. केंद्रातही काँग्रेसच्या सरकारमध्ये शरद पवार आठ वर्षांपासून सत्तेत आहेत. पण संगमांची अवस्था विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यासारखी झाली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा दुष्काळ संपविण्याची संधी संगमांना मिळाली आहे. सोनियांच्या सोबत राहून जे बरेच काही मिळू शकले असते, त्याची थोडीफार भरपाई सोनियांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या राजकीय आघाडीत सामील होऊन संगमांना करता येईल. कळत-नकळत दुसऱ्या ध्रुवावर पोहोचलेल्या संगमांना मात्र त्यासाठी लहरीपणा व उतावळेपणा वज्र्य करावा लागेल.