लालकिल्ला : टीम अण्णाचा नवा ‘चीट’ फंड Print

सुनील चावके - सोमवार, ६ ऑगस्ट  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

देशाचे गृहमंत्री होताच ‘हितचिंतकां’नी पुण्यात रक्तहीन साखळी बॉम्बस्फोटांची सलामी देत पहिल्या दिवशीच अपशकुन घडवून सुशीलकुमार शिंदे यांच्या चिंता वाढविल्या. पण हा अपशकुन शिंदेंसाठी शुभशकुनच ठरला. कारण दिल्लीत ठाण मांडून बसलेले त्यांचे महाराष्ट्रातील शुभचिंतक अण्णा हजारेंनी लगेचच जंतरमंतरवरील दहा दिवसांचे आंदोलन गुंडाळण्याची घोषणा केली. ज्या आंदोलनाला हाताळताना शिंदे यांचे पूर्वाधिकारी पी. चिदम्बरम यांची कारकीर्द बदनाम झाली, त्याच आंदोलनाने गृहमंत्री म्हणून शिंदे यांची पहिली मोठी चिंता विनासायास दूर केली.

केंद्रातील मनमोहन सिंग सरकारला गोत्यात आणण्याचा सलग दुसरा मराठी प्रयत्नही त्यामुळे मोडीत निघाला.
गेल्या सोळा महिन्यांपासून बेछूट विधाने करणारी टीम अण्णा आणि त्यांना डोक्यावर घेणारी उन्मादी प्रसिद्धी माध्यमे यांचे दिल्लीतील ‘रॉक शो’ तूर्तास थांबल्यामुळे राजकीय वर्गाला निश्चितच हायसे वाटत असेल. आतापर्यंत देशातील लहानमोठे राजकीय पक्ष टीम अण्णाच्या नैतिकतेच्या चुंबकीय क्षेत्राकडे खेचले जात होते, आता त्याच टीम अण्णाने पक्ष स्थापन करून राजकीय अनैतिकतेच्या दलदलीत पाय टाकायचे ठरविले आहे. जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर नैतिकतेचे मचाण बांधून ‘हिंस्र’ राजकारण्यांची शिकार करू पाहणाऱ्या टीम अण्णाला आता खाली उतरून त्याच श्वापदांसोबत अस्तित्वासाठी स्पर्धा करावी लागेल. ज्या संसदेवर टीम अण्णाने आजवर यथेच्छ चिखलफेक केली, तिच्याच ‘शुद्धीकरणा’साठी नाइलाजाने का होईना, संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवणे टीम अण्णाला भाग पडले आहे. ‘इफ यू कान्ट बीट देम, जॉइन देम’ या उक्तीनुसार भ्रष्ट राजकारण्यांना नमवण्यात अपयशी ठरलेल्या टीम अण्णाने सरतेशेवटी त्यांच्याच भ्रष्ट खेळात सहभागी होण्याचे ठरविले.
केंद्रातील भ्रष्ट आणि बेइमान सरकारविरुद्ध लबाडीने केलेल्या आंदोलनाचा ‘समर्पक’ शेवट, असेच थंड बस्त्यात पोहोचलेल्या लोकपाल आंदोलनाचे वर्णन करता येईल. गेल्या १५ ऑगस्टला अण्णांचा हुंकार दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना भयकंपित करीत होता, पण कमालीची अनुकूलता आणि ‘साऱ्या’ देशाची साथ लाभूनही अण्णांना आपल्या आंदोलनाचा सरकारवर धड वर्षभरही दबाव कायम राखता आला नाही. या आंदोलनाला सतत कुठल्या ना कुठल्या उत्तेजकाची आवश्यकता भासली. अविश्वसनीय वाटणारे दहा-बारा दिवसांचे उपोषण, बेछूट आरोप, बेभान वक्तव्ये, अमर्याद प्रसिद्धी, छोटय़ा पडद्यावर दाटलेल्या गर्दीचा उन्माद आणि आंदोलनस्थळी उपलब्ध चमचमीत खाद्यपदार्थाचे आकर्षण यांसारख्या अनेक महागडय़ा उत्तेजकांनी या आंदोलनाच्या फुग्यात हवा भरली. यथावकाश अशा साऱ्या उत्तेजकांचा प्रभाव ओसरताच फुग्यातील हवा संपली. ज्या जंतरमंतरवर मागच्या एप्रिल महिन्यात सरकारला गुडघे टेकावे लागले होते, तिथेच या आंदोलनाचा अँटिक्लायमॅक्स स्वत: अण्णा हजारेंनी लिहिला. गेल्या वर्षी रमजानच्या महिन्यात अण्णा हजारेंनी अभूतपूर्व लोकप्रियतेचे शिखर गाठले, यंदा त्याच रमजानच्या महिन्यात त्यांचे पाय जमिनीवर आले. टीम अण्णाच्या उग्र नैतिक दबावामुळे सरकारला लोकपाल नावाची संस्था अस्तित्वात आणणे भाग पडेल, त्यात अण्णांच्या काही प्रतिनिधींना स्थान मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून आपले व्यावसायिक प्रतिस्पर्धी तसेच राजकीय अडवणूक करणाऱ्यांचा हिशेब चुकता करता येईल, असे आडाखे बांधून सरकारवर नाराज असलेल्या अनेक उद्योजकांनी टीम अण्णाच्या पाठीशी आर्थिक ताकद उभी केली. त्यातून रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची खाण्या-पिण्यासह हरतऱ्हेची सरबराई झाली. हीरो मोटोकॉर्पसारख्या बडय़ा उद्योग घराण्याने तर टीम अण्णाच्या समर्थनासाठी आपल्या कर्मचाऱ्यांनाच जंतरमंतरवर धाडले. चोवीस तास कव्हरेज आणि रोज दहा-बारा पानांच्या वृत्तांतासह आंदोलनात ‘झोकून’ देत पेड न्यूजच्या आरोपात गुरफटलेल्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनीही अण्णांच्या उपोषणासोबत  ‘विपश्यना’ साधून घेतली. पण चोहोबाजूंनी सरकारवर जबरदस्त दडपण आणूनही टीम अण्णाला हवे तसे जनलोकपाल विधेयक अस्तित्वात येणार नाही, याची जाणीव होताच आंदोलनाला मिळणारी रसद बंद झाली. परिणामी रामलीला मैदानावरील ‘अण्णा की रसोई’ नामक फूडकोर्टमधील चमचमीत खाद्यपदार्थाची जागा जंतरमंतरवर मिळमिळीत व्हेज बिर्याणीने घेतली. एअरकंडिशन्ड गाडय़ांबाहेर तिरंगे झेंडे काढून ‘मै भी अण्णा’ म्हणणाऱ्यांचा उत्साह मावळला. या आंदोलनाचे कर्णधार अण्णा हजारे यांनाही आपल्या सहकाऱ्यांचा तिटकारा आला आहे, पण तो अद्याप उघड झालेला नाही. अण्णा वगळता या आंदोलनातील अन्य नेते अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास, संजय सिंह आदींची जनमानसात प्रतिमा ठसलीच नाही. त्यामुळेच ‘मधुमेह’ असतानाही केजरीवाल आणि सिसोदियांनी केलेल्या दहा दिवसांच्या उपोषणामुळे सर्वसामान्यांचा सरकारविरोधातील संताप अनावर होऊ शकला नाही. ज्या जंतरमंतरवर प्रचंड उकाडा आणि दमट हवामानात पत्रकारांची वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांपुढे बोलताना दमछाक होत होती, तिथेच दहा दिवसांच्या उपोषणाअंती भाषण करताना केजरीवाल यांचा खणखणीत आवाज भरल्या पोटाने वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही लाजवत होता. मधुमेहावर ‘मात’ करणारे केजरीवाल खरोखरीच दहा दिवस उपोषण करीत होते, की रमजानचे रोजे पाळत होते? गेल्या वर्षी रामलीला मैदानावरही बारा दिवसांच्या उपोषणादरम्यान अण्णा हजारेंनी काचेऐवजी स्टीलचा ग्लास वापरत ‘पारदर्शकता’ टाळल्याने कुटाळांच्या मनात ग्लुकोज आणि इलेक्ट्रॉलसारख्या शंका डोकावल्याच होत्या. आंदोलनाला मिळणारा पैसा आणि त्यामागचे उद्देश यामुळे टीम अण्णाच्या सचोटीवर सतत प्रश्नचिन्ह लागत राहिले. पण हे आरोप अतिभ्रष्ट राजकारण्यांच्या गोटातून होत होते. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी टीम अण्णाकडून ‘परिवर्तना’ची (ममता बॅनर्जींप्रमाणे केजरीवालांनीही ‘परिवर्तना’चा ध्यास घेतला आहे) भाबडी अपेक्षा बाळगणाऱ्या जनतेने त्याकडेही कानाडोळा केला. पण जंतरमंतरवर आंदोलन विसर्जित करणारी टीम अण्णा जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू शकली नाही.
खंबीर भूमिका घेऊन एकाही मुद्दय़ावर अण्णा आणि त्यांचे सहकारी शेवटपर्यंत ठाम राहू शकले नाहीत. राज्याराज्यांमध्ये भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भाजपला केंद्रातील भ्रष्ट सरकारविरुद्ध लढण्याची ताकद आणि मानसिकता दाखवता आली नाही. भाजपच्या कमकुवतपणामुळे निर्माण झालेली प्रचंड मोठी राजकीय पोकळी अण्णा हजारे यांना सिव्हिल सोसायटीच्या सामाजिक आंदोलनाने भरून काढता आली असती. पण भाबडय़ा जनतेच्या भावनिक लाटेवर स्वार होत टीम अण्णाने आपला ब्रँड प्रस्थापित केला आणि राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणाच्या भांडवली बाजारात लोकप्रियता कॅश करण्यासाठी नव्या पक्षाचा आयपीओ आणण्याचे ठरविले. सर्वसामान्य जनतेवर सव्वा वर्ष लोकपाल आंदोलनाचा ‘इमोशनल अत्याचार’ करून राजकीय महत्त्वाकांक्षेची शिडी चढणाऱ्या टीम अण्णाच्या या ‘चीट’ फंडवर विश्वास ठेवणाऱ्यांची फसगत होणारच नाही, हे कुणालाही छातीठोकपणे सांगता येणार नाही. टीम अण्णावर पंचतारांकित आंदोलनासाठी पैसा गोळा करतानाच अनेक आरोप झाले. आता लोकसभा निवडणुकीच्या तिकिटांचे वाटप करतानाही त्यांना असंख्य प्रलोभनांना सामोरे जावे लागणार आहे.
दुर्दैवाने आजची राजकीय परिस्थिती अशी आहे की, काँग्रेसच्या विरोधात उभ्या असलेल्या भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी आदी नेत्यांच्या तुलनेत सर्वसामान्य जनतेच्या मनात अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, संतोष हेगडे, प्रशांत भूषण आणि किरण बेदी यांची विश्वासार्हता निश्चितपणे अधिक आहे. कारण सत्ताधाऱ्यांशी लढण्यातल्या भाजप आणि अन्य राजकीय पक्षांच्या नकलीपणाचे पितळ उघडे पडल्यामुळे तूर्तास तरी टीम अण्णाला संशयाचा फायदा मिळणार आहे. अर्थात, अण्णांच्या ऐतिहासिक न ठरू शकलेल्या या क्षणिक आंदोलनामुळे अनेकांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांना रातोरात रॉक स्टार बनविणाऱ्या उन्मादी प्रसिद्धी माध्यमांचा तर पार मुखभंग झाला आहे. या माध्यमांमुळेच अण्णा हजारे हे दुसरे महात्मा गांधी आहेत आणि त्यांनी उभारलेले आंदोलन म्हणजे दुसरा स्वातंत्र्यलढा आहे, असा जयप्रकाश नारायण यांचेही आंदोलन न पाहिलेल्यांना आभास होऊ लागला होता. आंदोलनाचा शेवट होण्यापूर्वीच अंतिम निष्कर्ष काढून हजारो तासांचे लाइव्ह कव्हरेज करणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि रकानेच्या रकाने भरून लिहिणाऱ्या वृत्तपत्रांना आता आपल्या विश्वासार्हतेचीही चिंता वाहावी लागणार आहे. उदात्त उद्देशांनी राजकारणात उतरलेल्या टीम अण्णाचे कव्हरेज ही माध्यमे पूर्वीच्याच उत्साहाने करतील काय, याचीही उत्सुकता लागलेली असेल. बाबा रामदेवच्या आगामी आंदोलनाकडे वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांनी पाठ फिरविली तर रामलीला मैदानावर ते कितपत टिकाव धरू शकतील, हाही प्रयोग आता माध्यमांनी करून बघायला हरकत नाही. प्रणब मुखर्जींप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा अवाजवी उदोउदो करून तिला संकटमोचक म्हणून डोक्यावर बसविण्यापेक्षा सरकारला आव्हान देणारे किती पाण्यात आहेत, याचा वास्तववादी अंदाज कधीही उपयुक्त ठरू शकतो, हे आता सरकारच्याही लक्षात आले असेल. सर्वव्यापी भ्रष्टाचारासारख्या व्यापक जनहिताच्या ज्वलंत मुद्दय़ावर तळमळीने सत्याग्रह करणाऱ्यांची विश्वासार्हताही अण्णांनी गुंडाळलेल्या या आंदोलनामुळे धोक्यात आली आहे. टीम अण्णाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसताना भ्रष्टाचाराचा मुद्दा दोन वर्षांसाठी थंड बस्त्यात टाकण्याचे व्यावहारिक चातुर्य दाखवले असले तरी हा प्रश्न अधिकाधिक उग्र होत चालला आहे आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वसामान्य जनता त्यात होरपळत आहे. केंद्रातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार आणि गुर्मी कमी झालेली नाही. राज्याराज्यांतील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर तर कुणाचाच अंकुश नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. महागाई, भ्रष्टाचार, लाचखोरीमुळे प्रामाणिक नागरिकांचे जगणे असह्य़ झाले आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे समाजाला पोखरून काढणारा हा रोग ऐरणीवर आला. त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिमाण लाभले. पण सोळा महिन्यांच्या अंतरात जंतरमंतर, रामलीला मैदान, राजघाट आणि मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आंदोलनाचे फड भरविणाऱ्या टीम अण्णाने सर्वसामान्यांची ही कुचंबणा दूर तर केलीच नाही, उलट प्रसिद्धीच्या अतिलोभापोटी उपोषणाच्या अस्त्राची धार संपुष्टात आणली. जंतरमंतरवर हे आंदोलन शेवटचे आचके देत असतानाही भ्रष्ट तंत्रापुढे हरलेले असंख्य नागरिक अण्णांकडे मोठय़ा आशेने बघत होते. पण टीम अण्णाच्या हातून उपोषणाच्या नैतिक हत्याराला बोथट करण्याचे पातक घडल्यामुळे न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनात उतरलेल्या अशा आशाळभुतांची कुचंबणा अटळ ठरणार आहे. राजकीय पक्ष स्थापन करून भ्रष्ट राजकारण्यांना त्यांच्याच संसदेत घुसून धडा शिकविण्याच्या भीष्मप्रतिज्ञेमुळे त्याचे पापक्षालन होणार नाही.