लालकिल्ला : बुजुर्गाची घालमेल Print

सुनील चावके, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ऐन उमेदीची दशके या संघर्षांत खर्ची घातल्यानंतर या बुजुर्गाच्या अस्तित्वाला विरोधकांनी वा प्रतिस्पध्र्यानी नव्हे; तर वारसांनीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आव्हाने उभी केल्याचे गेल्या काही दिवसांत दिसले..
लालकृष्ण अडवाणी, अण्णा हजारे आणि शरद पवार या तीन बुजुर्गाचे ‘भावविश्व’ सध्या ढवळून निघाले आहे. वैचारिक ‘वारसा’ पुढे चालविणाऱ्या आपल्या तरुण व विश्वासू सहकाऱ्यांच्या आक्रमकतेमुळे अण्णा, अडवाणी आणि पवार यांच्या दिल्लीतील भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या दोन दशकांपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी आणि शरद पवार पंतप्रधानपदाचे दावेदार ठरले आहेत. नेहमीप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीतही ते या मृगजळाचा पाठलाग सुरूच ठेवतील, यात शंका नाही. अण्णा हजारे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसले तरी (स्वातंत्र्याच्या ‘दुसऱ्या’ लढय़ानंतरचे) अनभिषिक्त ‘भावी राष्ट्रपिता’ या नात्याने त्यांचीही अडवाणी आणि पवार यांच्यासारखीच मानसिक घालमेल सुरू असावी. संस्कार, नैतिकता, अभिरुची, कला, साहित्यविषयक आवडी-निवडीतील तफावतींमुळे या बुजुर्गाचा त्यांच्या वारसांशी असलेला संवाद दीर्घकाळ टिकण्यात अडचणी आल्यामुळे २०१४ दृष्टिपथात येत असतानाच त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात वादळे उभी राहिली आहेत.
अडवाणी यांच्यापुढे वैयक्तिक राजकीय अस्तित्वाचे संकट शरद पवारांपेक्षाही गंभीर असले तरी सहा दशकांच्या दीर्घ वाटचालीत संघ, जनसंघ आणि भाजपच्या संस्थात्मक विचारधारेच्या संस्कारांची चौकट (सहसा) न मोडता समाजकारण व राजकारण केल्यामुळे उतारवयात उद्भवलेल्या आव्हानांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन संयत आणि परिपक्व ठरला आहे. तीन वर्षांपूर्वी दिल्लीची मक्तेदारी मोडीत काढून नागपुरातून नितीन गडकरी यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनपेक्षितपणे निवड करण्यात आली तेव्हा या निर्णयाला अडवाणी यांनी सर्वशक्तीनिशी विरोध करून पाहिला. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरींनी ‘सर्वसंमती’ने घेतलेल्या निर्णयांवर त्यांनी कधीच जाहीरपणे पसंतीची मोहोरही उमटविली नाही. पण गडकरींना दुसरी टर्म देण्यासाठी उत्सुक असलेला संघ आणि राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पर्यायी नेतृत्वाचा दिसणारा अभाव याचा सारासार विचार करून त्यांनी संघ परिवाराची भावना आणि व्यापक पक्षहितालाच प्राधान्य दिले. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अरुण जेटली यांच्या प्रबळ दावेदारीकडे दुर्लक्ष करून त्यांनी गडकरींच्या समर्थनाची भूमिका घेतली. गडकरी आणि अडवाणी यांच्या वयातील फरक तीस वर्षांचा आहे. राजकारण आणि समाजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वस्वी भिन्न आहे. ऑल्विन टॉफलरचे ‘फ्युचर शॉक’ आणि लता मंगेशकरांच्या ‘ज्योती कलश छलके’चे अडवाणींना अप्रूप वाटते, तर मराठी कथा-कादंबऱ्यांची आवड असणाऱ्या गडकरींना ‘तेरी मेरी प्रेमकहानी’ या गीताचे विशेष आकर्षण आहे. अडवाणी ठराविक अंतराने मोजकेच खातात, तर गडकरींचे खाद्यप्रेम सर्वश्रुत आहे. राजकारणात अडवाणींच्या रेकॉर्डची सुई आणीबाणीच्या कालखंडातच अडकून पडली असली तरी मोबाइल, आयपॅड, आयपॉडसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करणारे आणि आमीर खानच्या चित्रपटांचे शौकीन असलेले अडवाणी वैयक्तिक जीवनात पुरोगामी आणि आधुनिकतेचा पुरस्कार करणारे आहेत. कदाचित त्यामुळेच राजकीय दृष्टिकोनही सातत्याने बदलत राहिला आहे. ८५ वर्षांचे अडवाणी आज प्रकृतीने ठणठणीत आहेत. तरीही दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता वयाच्या ९२ व्या वर्षांपर्यंत पंतप्रधानपदी राहण्यासाठी त्यांच्या हाती सत्तेची सूत्रे देईल, याची शक्यता धूसरच आहे. तसे असते तर २००९ साली वयाच्या ८२ व्या वर्षीच अडवाणींना ही संधी मिळाली असती. पण अडवाणींनी हार मानलेली नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची टर्म आणि तिचे ‘टर्मिनेशन’ यातील लक्ष्मणरेषा धूसर असते हे त्यांना स्वानुभवातून ठाऊक आहे. मावळलेला गडकरीविरोध हे अडवाणींच्या बदललेल्या रणनीतीचे आणि परिस्थितीनुरूप लवचिकतेचे द्योतक ठरावे.
पंचाहत्तरी पार केलेले अण्णा हजारे आणि त्यांचे ४४ वर्षीय ‘शिष्योत्तम’ अरविंद केजरीवाल यांच्या वयातील तफावत ३१ वर्षांची असली आणि अडवाणींपेक्षा अण्णा दहा वर्षांनी लहान असले तरी सार्वजनिक जीवनात उठलेल्या वादळाचा सामना करताना अण्णा अडवाणींप्रमाणे प्रगल्भता दाखवू शकलेले नाहीत. अडवाणी आणि गडकरी पक्ष आणि परिवाराच्या संस्थात्मक अपरिहार्यतेतून दिल्लीत एकत्र आले, तर भावी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू होण्यासाठी अण्णा आणि केजरीवाल यांचा ‘नियतीने करार’ करून दिला होता. पण हा करार अवघे अठरा महिनेच टिकला. प्रसिद्धिमाध्यमांच्या मदतीने देशाचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणाऱ्या अण्णा आणि केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करणे हे कालपरवापर्यंत देशद्रोहासम मानले जात होते. पण आता खुद्द अण्णांनीच केजरीवालांविरुद्ध गंभीर आरोपांच्या तोफा डागल्यामुळे तमाम अण्णा-केजरीवाल निष्ठांवर तोंड दाबूून इमोशनल अत्याचार सहन करण्याची वेळ आली आहे. ‘आय गॉट द ब्रेन्स, यू गॉट द लूक्स, लेटस मेक लॉट्स ऑफ मनी’ हे ऐंशीच्या दशकात गाजलेले पेट शॉप बॉइजचे गीत विद्यार्थिदशेत केजरीवाल यांच्या कानावर निश्चितच पडले असेल. जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनात असेच घडले असे म्हटले तर ते ‘देशद्रोही’ विधान ठरू नये. गांधीटोपी घातलेल्या अण्णांचा चेहरा देत आंदोलनाचे मार्केटिंग करणाऱ्या केजरीवाल यांनी प्रचंड प्रमाणावर पैसा उभा केल्याचे आरोप आता नवे राहिलेले नाहीत. केजरीवाल यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालण्यासाठी हा पैसा पुरेसा ठरला असावा, त्यातील काही पैसा देऊ करून स्वत:च्या राजकीय पक्षासाठी अण्णांची मूकसंमती मिळविण्याचेही केजरीवालांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना हाताशी धरून तयार करण्यात आलेला जनलोकपाल आंदोलनाचा बुडबुडा अमेरिकेतील सबप्राइम क्रायसिससारखा फुटला आणि आता दोन शकले झालेल्या टीम अण्णामध्ये उरली आहे ती केवळ वैचारिक दिवाळखोरी. देशाच्या राजकारणावर अनौपचारिकपणे वर्चस्व गाजविणारे अण्णा अत्यल्प काळात दिल्लीवर बसविलेली पकड शाबूत राखून आपल्या समाजकारणाचा कळसाध्याय गाठण्यासाठी आता धडपडत आहेत. जुन्या सहकाऱ्यांना सोडून नव्या साथीदारांच्या मदतीने भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पुन्हा उभे करण्याची आजवर ‘यशस्वी’ ठरलेली क्लृप्ती या वेळी त्यांना कितपत साथ देते हे दिसणार आहे.
दिल्लीच्या राजकारणावर वर्चस्व गाजविताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व घरातील व्यक्तीच्या हातीच राहावे, या उद्देशातून शरद पवार यांच्या आशीर्वादाने अजित पवार यांचे नेतृत्व उदयाला आले आणि ते अल्पावधीतच नियंत्रणाबाहेर जाण्याची लक्षणे दिसू लागली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वर्चस्वासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीचे पडसाद आता दिल्लीत शरद पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. वीस वर्षांपूर्वी दिल्लीत जम बसण्यापूर्वीच मुंबईत ‘परतलेले’ शरद पवार आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेससाठी आव्हान ठरले होते. आज दिल्लीत जम बसविलेल्या शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील स्लॉग ओव्हर्स उरल्या असताना महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी त्यांच्यापुढे संकट उभे केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल क्रमांकाचा पक्ष बनल्यास शरद पवार यांना दिल्लीच्या अनिश्चित राजकारणाचा लाभ घेऊन पंतप्रधानपदाचे स्वप्न साकारता येईल. पण त्यांच्या या मनसुब्यांना घरातूनच सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी यापुढे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी ‘वित्त’ आणि ‘ऊर्जा’ वापरण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी पक्षाची वाढ आणि विस्ताराच्या पद्धतींवरून बारामतीमध्ये नवा कलह उद्भवू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याचे ‘प्रयत्न’ दिल्लीतील शरद पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला पोषक ठरणार नसतील तर ते तत्परतेने मोडीत काढण्यासाठी शरद पवार यांना पुढचे दीड वर्ष सदैव जागरूक राहावे लागेल. स्वत:च उपजत बंडखोर असलेल्या शरद पवारांपुढे साडेचार दशकांचा राजकीय अनुभव आणि पंख कापण्याचे असामान्य कौशल्य पणाला लावून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचे आव्हान असेल. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीत वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे १२/१२/१२ हा दिवस कसा साजरा होतो, यावरही अवलंबून असेल.
राष्ट्रीय राजकारणात भाजपला काँग्रेसचा एकमेव पर्याय बनविण्यासाठी अडवाणींनी सारी मेहनत घेतली. महाराष्ट्रात आणि शक्य झाल्यास केंद्रात काँग्रेसला शह देण्यासाठी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी केली. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधाच्या दीर्घ अनुभवाच्या जोरावर अण्णा हजारेंनी दिल्लीवर चाल केली. ऐन उमेदीची दशके या संघर्षांत खर्ची घातल्यानंतर आता या बुजुर्गाच्या अस्तित्वाला विरोधकांनी वा प्रतिस्पध्र्यानी नव्हे तर वारसांनीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आव्हाने उभी केली आहेत. या संकटांवर मात करण्यासाठी ‘पुनश्च हरी ओम’ करण्याची त्यांच्यात कितपत क्षमता उरली आहे हे वर्षभरातच दिसणार आहे.