व्यक्तिवेध : सुनील गंगोपाध्याय Print

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

स्वातंत्र्योत्तर काळात देशातील सर्वच प्रांतांत व सर्वच क्षेत्रांत परिवर्तनाची एक लाट आली होती. बंगालच्या साहित्यातील साचलेपण, कवितेची चौकट मोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांत सुनील गंगोपाध्याय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नवकवितांची केवळ निर्मितीच करून ते थांबले नाहीत तर आपल्यासारख्या कवींना मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी ‘क्रितीबास’ नावाचे मासिक त्यांनी सुरू केले. नवोदित कवींनी नवनवीन काव्यप्रकार हाताळावेत, बंगाली कवितेला नवा आयाम द्यावा, या हेतूने सुरू केलेल्या या मासिकाचे संपादकही तेच होते आणि त्या वेळी त्यांचे वय होते अवघे १९!  सात सप्टेंबर १९३४ या दिवशी जन्मलेल्या गंगोपाध्याय यांना प्रतिभेचे जन्मजात देणे लाभलेले.

मुळातच बंडखोर वृत्तीच्या गंगोपाध्याय यांच्या ‘आत्मप्रकाश’ या पहिल्याच कादंबरीने खळबळ उडवली. १९६५मध्ये आलेल्या या कादंबरीतील आक्रमक व आक्षेपार्ह भाषेमुळे ते चांगलेच अडचणीत आले. कोलकात्यातील आनंद बाजार पत्रिका या प्रकाशन संस्थेसाठी त्यांनी सातत्याने लेखन केले. यात कवितांसह नाटके, लघुकथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, बालसाहित्य आदी सर्व प्रकारांचा समावेश होता. यातील अनेक प्रमुख पुस्तके भारतातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आणि गंगोपाध्याय यांचे नाव देशभरात आदराने घेतले जाऊ लागले. त्यांच्या साहित्यात एकप्रकारची दृश्यमानता असल्याने चित्रपटसृष्टीलाही त्यांच्या लेखनाची भुरळ पडली. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांनी गंगोपाध्याय यांच्या ‘अरण्येर दिन रात्री’, ‘प्रतिध्वनी’, ‘अर्जुन’ या कादंबऱ्यांवरून चित्रपट निर्माण केले तर गौतम घोष यांनीदेखील त्यांच्या ‘अबर अरण्य’ या कादंबरीवरून त्याच नावाचा चित्रपट तयार केला. चाहत्यांच्या प्रेमासोबत त्यांना राजमान्यताही लाभली. साहित्य अकादमी, आनंद पुरस्कार, शेरीफ ऑफ कोलकाता, सरस्वती सम्मान, हिंदू साहित्य पुरस्कार, सेरा बंगाली लाइफटाइम अ‍ॅचीव्हमेंट पुरस्कार आदी सन्मान त्यांना लाभले. २००८ मध्ये साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी झालेली निवड हा त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च आनंदाचा क्षण ठरला. दुर्गापूजा मोठय़ा प्रमाणात साजरी होत असताना चतुरस्र साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांच्या निधनाची वार्ता मंगळवारी आली आणि बंगालसह साहित्यवर्तुळावर शोककळा पसरली.