अन्वयार्थ :‘ब्रॅण्ड’ ढोबळे.. Print

 

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२
alt

पोलीस खात्यात बदल्या नित्याच्याच मानल्या जातात. पण काही बदल्या नित्याच्या नाहीत, हे लोकांना माहीत असते. सत्यपाल सिंह यांची मुंबईच्या पोलीसप्रमुखपदी गेल्याच महिन्यात झालेली नियुक्ती असो की समाजकल्याण शाखेचे पोलीस उपायुक्त वसंत ढोबळे यांची वाकोला येथे झालेली ताजी बदली, या बदल्या अर्थातच चर्चेचा विषय होतात, या बदल्यांमागचा घटनाक्रम लोकांच्या स्मरणात असतो म्हणूनच चर्चा होते.

ढोबळे यांच्या बाबतीत तर, ‘गेल्या एप्रिलमध्ये एका ज्यूस सेंटरवर कारवाई करताना त्यांनी हॉकी स्टिक वापरून तेथील नोकरांना बदडले’ ही एकच घटना भरपूर वेळा उगाळली गेली असल्याने मुंबईत अनेकांना ढोबळे या नावासोबत हॉकी स्टिक आठवत असेल. ढोबळे यांनी आम्हाला अगदी गुन्हेगाराप्रमाणे वागवले हो, मी रात्री दोन वाजता मित्रासोबत सहज कॉफी प्यायला गेले काय नि ढोबळे यांच्या पथकाने छापा की हो टाकला, अशी रडगाणी मुंबईच्या स्थानिक इंग्रजी दैनिकांनी फारच गांभीर्याने लोकांपर्यंत पोहोचवली होती. पोलिसांचा जाच निरपराध भोळय़ाभाबडय़ा जनतेला इतका होतो आहे की एखाद्या चांगल्याशा पबमध्ये जाऊन धड रात्रभर पार्टीही करता येत नाही, अशा समजुती घट्ट करण्यात अनेक राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांच्या स्थानिक आवृत्त्यांचा मोठाच वाटा आहे. संबंधित पब वा क्लबमालकाने कधीतरी ढोबळे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध काही तक्रार केली का, याचा तपशील कधीही या दैनिकांतून आला नाही किंवा इंग्रजी वृत्त-वाहिन्यांनीही ढोबळेंविरुद्ध त्यांचा ‘बूम’ कधी पब वा क्लबचालकांपुढे धरला नाही. रात्री किती वाजेपर्यंत हे व्यवसाय सुरू ठेवायचे, यावर र्निबध आहेत आणि ते न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना अगदी १८६७ पासून आहेत. हा कायदा कालबाह्य आहे का, याची चर्चा ढोबळे यांच्यावर व्यक्त होत असलेल्या रागामुळे पुन्हा सुरू झाली, हे बरे झाले. मात्र हा राग एकटय़ा ढोबळे यांच्यावर आहे की खरोखरच कायदा कालबाह्य आहे, हे पुरेसे स्पष्ट झाले नाही. ढोबळेंविरुद्ध एखाद्या वीकेण्डला निदर्शने करणारे वांद्रे-पाली हिल आदी भागांचे रहिवासी, आम्हाला पार्टी करू द्या, एवढेच म्हणत राहिले आणि ट्विटरसारख्या जालमाध्यमातून याचे पडसाद उमटत राहिले. ढोबळे यांचा बागुलबुवा उभा करणारी प्रतिमा तयार होऊ लागली, त्यात या ‘सोशल मीडिया’चा वाटा अधिक होता. एखाद्याची अशी प्रतिमा कामे होण्यासाठी किती फायद्याची ठरेल आणि किती तोटय़ाची, याचा विचार यंत्रणेला करावा लागतो. मात्र, ढोबळे यांच्यामुळे पोलिसांची जरब उच्चभ्रू पार्टीबाजांवरही बसू शकते याचा पुरावाच मिळाला, हे तर त्यांचे निंदकही कबूल करत आहेत. मुंबईतील एका स्थानिक इंग्रजी लघुपत्राने यापुढेही ढोबळेंमुळे तुमची पार्टी खराब होऊ शकते, असे दुस्वप्न दाखवणारा मजकूर लिहिताना - ‘‘ब्रॅण्ड ढोबळे’चा वापर पोलिस यापुढेही करतील,’ असे म्हटले आहे! निवासी अभारतीयांना पोलीस यंत्रणा कार्यरत असल्याची जाणीव अशा एखाद्या ‘ब्रॅण्ड’मुळे झाली हे ठीक, पण यंत्रणेत ब्रॅण्ड मोठे होऊन चालत नाही. तिला एक चेहरा नसणे आवश्यक असते. ती संधी ढोबळे व यंत्रणेलाही बदलीने दिली आहे.