अन्वयार्थ : प्रश्न हॉकीच्या संजीवनीचा Print

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२

आयपीएल क्रिकेट स्पर्धेला मिळालेल्या यशानंतर भारतात अनेक खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यासारख्याच स्पर्धा आयोजित करण्याचे पेव फुटले. बॉक्सिंगच्या जागतिक सीरिजला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर गतवर्षी हॉकीमधील बंडखोर संघटना असलेल्या भारतीय हॉकी महासंघाने (आयएचएफ) जागतिक हॉकी सीरिजचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अनेक अव्वल दर्जाचे परदेशी खेळाडू सहभागी झाल्यामुळे स्पर्धेतील सामने चुरशीने खेळले गेले व त्यास प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद मिळाला.

त्यांचे हे यश पाहून भारतामधील हॉकीची अधिकृत संघटना असलेल्या हॉकी इंडियानेही त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडियन लीग स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत ८० परदेशी खेळाडू व ९६ भारतीय खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सहा शहरांचे संघ असतील. पंजाब (चंडीगढ किंवा अमृतसर), लखनौ, रांची व नवी दिल्ली या चार संघांचे मालक यापूर्वीच निश्चित झाले आहेत. त्याकरिता सहारा समूह, वेव्ह समूह, जेपी समूह व पटेल युनीएक्सेल या कॉपरेरेट्सनी प्रायोजकत्व दिले आहे. उर्वरित दोन संघांकरिता मुंबई, बंगळुरू व चेन्नई या तीन शहरांमध्ये चुरस आहे. लवकरच दोन संघांचे मालक कोण होणार हे निश्चित होईल. बॉलीवूडमधील सलमान खान, शाहरूख खान तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या हॉकी लीगमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली आहे. आनंदाची बाब ही की, येत्या जानेवारीत होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला भरपूर आर्थिक मोबदला मिळणार आहे. स्पर्धेतील ९६ भारतीय खेळाडूंपैकी निम्मे खेळाडू वरिष्ठ व निम्मे कनिष्ठ गटातील असणार आहेत. प्रत्येक सामन्यात किमान दोन कनिष्ठ खेळाडूंना किमान वीस मिनिटे खेळण्याची संधी देणे बंधनकारक असणार आहे. कनिष्ठ गटातील खेळाडूंना वरिष्ठ खेळाडूंसह खेळण्याची सवय  राहावी हाच त्यामागील हेतू आहे. जागतिक हॉकी सीरिजप्रमाणेच या स्पर्धेतही वीस मिनिटांचे चार डाव राहतील. प्रत्येक डावानंतर पाच मिनिटांची विश्रांती राहणार आहे. अशा स्वरूपाच्या सामन्यांमध्ये अधिक गतिमान खेळ पाहावयास मिळतो, हे जागतिक सीरिजमध्ये दिसले होतेच. आता इंडियन लीगमध्येही त्याची पुनरावृत्ती होणार आहे. आंतरराष्ट्रीय महासंघाची मान्यता या स्पर्धेला असल्यामुळे स्पर्धेसाठी पुरस्कर्ते मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. खेळाडूंना स्थैर्याची हमी मिळाली तर ते ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकतात हे यंदा भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या पदकांवरून निश्चित झाले आहे. हॉकी क्षेत्रात कारकीर्द करू इच्छिणाऱ्यांना जर भविष्यातील आर्थिक मोबदल्याची हमी मिळाली तर ते कोणतेही दडपण न घेता खेळू शकतील. नेमका हाच उद्देश डोळय़ांसमोर ठेवत हॉकी इंडियाने हॉकी लीग सुरू करण्याचे ठरविले. अर्थात लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना बऱ्यापैकी आर्थिक मोबदला मिळाला असूनही लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा फज्जा उडाला होता. हॉकी लीग आयोजित करून भारतीय हॉकी क्षेत्रास खरोखरीच संजीवनी मिळाली, तर स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश साध्य होईल.