अन्वयार्थ : ‘सज्जता’ रेंगाळते आहे.. Print

 

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२

सागरी क्षेत्रावर भारतीय नौदलाचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी दोन विमानवाहू नौका २०१५पूर्वी समाविष्ट करण्याचा जो आराखडा यापूर्वीच मांडण्यात आला होता, तो ‘अॅडमिरल गोश्करेव्ह’ अर्थात ‘विक्रमादित्य’ या रशियाकडून मिळू शकणाऱ्या विमानवाहू नौकेचे आगमन पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने आता बदलावा लागणार आहे. हिंदी महासागरात चीनचा हस्तक्षेप होऊ लागला असताना आणि पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या माध्यमातून अरबी समुद्रातील भारतीय नौदलाच्या हालचालींवर तो नजर ठेवून असताना ही प्रक्रिया रेंगाळणे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खचितच योग्य नाही.

लष्करी आयुधांची खरेदी आधीच प्रदीर्घ काळ रखडत असताना दुसरीकडे ज्या साधनांची आगाऊ मागणी नोंदविली, त्या मिळण्यात वेगवेगळ्या अडचणी उद्भवत असल्याने खरे तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी धोरण निश्चित करण्याची वेळ आली आहे. कारण, ‘बोफोर्स’च्या प्रकरणानंतर ताकही फुंकून पिण्याची प्रवृत्ती बळावल्याने भारतीय संरक्षण सज्जतेसाठी अत्यावश्यक ठरलेल्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. गेल्या २० वर्षांत अत्याधुनिक तोफांची खरेदी न करणे, हे त्याचेच उदाहरण. भारतीय नौदलाने २०१५पूर्वी दोन विमानवाहू नौका ताफ्यात समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले; यापैकी एक विक्रमादित्य, तर दुसरी स्वदेशी बनावटीची असून तिची बांधणी कोचिनमध्ये सुरू आहे. रशियन बनावटीची गोश्करेव्ह अर्थात विक्रमादित्य विमानवाहू नौका २००८ मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट होणार होती. त्याकरिता २००४ मध्ये रशियाशी करार करण्यात आला होता. त्यानुसार विक्रमादित्यची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी चार वर्षांचा कालावधी अपेक्षित होता. परंतु, हाच कालावधी दुप्पट होऊन आता तो नऊ वर्षांवर जाण्याच्या मार्गावर आहे. पाच वर्षांच्या विलंबाने म्हणजे ऑक्टोबर २०१३ मध्ये विक्रमादित्य नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होऊ शकेल. रशियात विक्रमादित्यची चाचणी सुरू असताना उद्भवलेल्या तांत्रिक दोषांमुळे हा विलंब अटळ ठरला. बॉयलरशी संबंधित असणारा दोष दूर करण्यासाठी किमान आणखी सहा महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. भारतीय नौदलाकडे सद्यस्थितीत ‘आयएनएस विराट’ ही एकमेव विमानवाहू नौका आहे. तिचे आयुर्मान संपुष्टात आले असले तरी दुसरा पर्यायच नसल्याने ती दुरुस्तीद्वारे कार्यरत ठेवणे भाग पडले आहे. साडेसात हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेल्या देशाची सुरक्षा राखण्याबरोबर खोल समुद्रात कार्यवाहीसाठी विमानवाहू नौका ताफ्यात  असणे आवश्यक आहे. विक्रमादित्यचे आगमन लांबल्याने त्याचा फटका तिच्यासमवेत समाविष्ट होणाऱ्या युद्धनौका आणि विनाशिकांच्या समूह योजनेला बसेल. भारतीय बनावटीच्या विमानवाहू नौकेची बांधणी पूर्ण होण्यास अजून तीन ते चार वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. ‘आयएनएस विराट’चे आयुर्मान संपुष्टात आले असताना विक्रमादित्यचे आगमन महत्त्वपूर्ण होते. मात्र, त्यातही आता अवरोध आला आहे. दुसरीकडे लष्करी क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करणाऱ्या चीनने प्रदीर्घ काळापासूनचे स्वप्न गेल्या वर्षी पूर्णत्वास नेले, ते कुजेनोत्सोवर्गीय विमानवाहू नौकेच्या जलावतरणाच्या माध्यमातून. जहाज बांधणी उद्योगात दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या चीनने त्याचा लष्करी उपक्रमांना लाभ करवून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर विक्रमादित्यच्या विलंबाकडे पाहावे लागेल.