अन्वयार्थ : उशिरा सुचलेले शहाणपण Print

शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२

अखेर ‘टीम अण्णा’मध्ये उभी फूट पडली. एक गट भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन चालू ठेवणार आहे आणि दुसरा गट राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या मार्गाने जाणार आहे. दिल्लीतल्या उपोषणाच्या वेळी अण्णा हजारे यांनी राजकीय दबाव गट निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. अरविंद केजरीवाल यांनी तेवढा मुद्दा उचलून नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची जी घाई केली, ती पाहता अण्णा हजारे यांनी सावध होऊन त्यापासून फारकत घेण्याचा निर्णय जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वास्तविक पाहता हा निर्णय पूर्वीच घेणे सयुक्तिक ठरले असते. केजरीवाल यांनी अण्णांचा हा निर्णय धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया दिली असली, तरीही त्यांनीही हे आधीच ओळखले होते. निवडणुकीच्या मार्गाने जाऊन देशातील सगळ्याच राजकीय पक्षांवर दबाव निर्माण करणे शक्य होणार नाही, असे हजारे यांना वाटते, तर लोकांच्या मनातील तीव्र भावनांच्या लाटेवर स्वार होऊन नवा पक्ष काही प्रमाणात आपले अस्तित्व दाखवू शकेल, असे केजरीवाल यांना वाटते. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालवणे म्हणजे केवळ उपोषणे करणे नव्हे, त्यासाठी समाजात विश्वास निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांचे देशभर जाळे निर्माण करणे आवश्यक असते. संघटना बांधणी करताना त्यातील प्रत्येक घटक तिच्या मूळ ध्येयापासून दूर जाणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागते. या पुढील काळात अण्णा त्यावरच लक्ष केंद्रित करणार असले, तरीही कार्यकर्त्यांसाठी निश्चित कार्यक्रम देणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. केजरीवाल यांच्या नव्या पक्षाला आपले नाव वापरता येणार नाही की प्रचारासाठी छबी उपयोगात आणता येणार नाही, असे जाहीर करून अण्णा हजारे यांनी नवी समीकरणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात राजकीय पक्ष काढण्याची कल्पना किरण बेदी आणि केजरीवाल यांनी पुढे रेटली. पण आता त्या दोघांमध्येही वाद आहेत. नव्या पक्षाला हजारे यांची साथ नसेल, तर तिथे राहून फारसे काही मिळणार नाही, असे वाटल्याने बेदीबाईंनी पक्ष निर्माण होण्यापूर्वीच त्यातून अंग काढून घेतले. वेळीच राजकारणापासून फारकत घेण्याची अण्णांची खेळी केजरीवाल यांच्या अंगलट आली आहे, एवढे मात्र खरे. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर अण्णांनी आजवर आंदोलने केली, त्यांची ठोस परिणती दिसण्यासाठी त्यांना आपल्या चळवळीचीही पुनर्रचना करावी लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे उभारावे लागेल. जनलोकपाल विधेयकाचा मुद्दा या सगळ्या गदारोळात मागे पडत असेलच, तर तोही नजरेसमोर ठेवावा लागेल. निवडणुकीचे राजकारण करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असते. त्यासाठी वैचारिक अधिष्ठानावर आधारित चळवळ उभारावी लागते. हजारे यांच्या आजवरच्या आंदोलनांना जनतेने त्यांना कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद दिला. मात्र त्यातून ठोस असे काहीच हाती लागले नाही.  व्यक्तिकेंद्रितता हा त्यांच्या चळवळीतील मोठा दुर्गुण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चळवळीत अग्रभागी असणारे अनेक नेते त्यामुळे दूर गेले. केवळ लोकप्रियतेवर आरूढ होऊन आंदोलने यशस्वी होत नाहीत, हे लक्षात घेऊनच या पुढील काळातील व्यूहरचना हजारे यांना करावी लागणार आहे.