अन्वयार्थ : किनारपट्टय़ांवर आघात Print

गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२

देशाच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील तब्बल २३ टक्क्यांहून अधिक किनारपट्टीची कोणत्या ना कोणत्या प्रकारे गंभीर झीज होत असल्याचा अभ्यास नुकताच जाहीर झाला. मुंबईमधील टाटा सामाजिक शास्त्र संस्था, पुडुचेरी (पाँडिचेरी)मधील नागरिकांचा गट असलेला ‘पाँडीकॅन’ आणि मुंबईची बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थांनी मिळून हा अभ्यास जाहीर केला.

त्याद्वारे विकासाच्या प्रक्रियेत आपण नैसर्गिक स्रोतांची किती हानी करत आहोत, हे स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची ४० टक्के, कर्नाटक किनाऱ्याची ८९ टक्के, केरळ किनाऱ्याची सुमारे ८४ टक्के, तर लक्षद्वीप बेटांची पूर्णच्या पूर्ण किनारपट्टीची अशा प्रकारे झीज होत असल्याचे या अभ्यासाद्वारे उघडकीस आले आहे. वास्तविक देशाला लाभलेला ७५०० किलोमीटरचा किनारा ही देशासाठी नैसर्गिक देणगी मानली जाते. त्यावर देशातील ३० टक्के लोक अवलंबून असल्याने ते स्वाभाविकही आहे. पण आता वेगवेगळ्या कारणांमुळे हे किनारेच धोक्यात आले आहेत. या संस्थांचा अभ्यास असे सांगतो की, किनारी भागात वेगाने व अनियोजित पद्धतीने होत असलेले नागरीकरण, किनारी भागात अपुऱ्या नियोजनाच्या आधारे उभारले जाणारे ऊर्जाप्रकल्प, बंदरे यांच्यामुळे तर किनारपट्टय़ांची झीज होण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. हा भाग समृद्ध जैवविविधतेसाठी आणि त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या अन्ननिर्मितीसाठी महत्त्वाचा असतो. पण आता त्यांच्यावरच घाला आल्याने त्यांच्यातील स्रोतांवर अवलंबून असलेल्या लोकांचे काय होणार हा मोठाच प्रश्न आहे. या गोष्टीकडे केवळ किनारपट्टय़ांचे होणारे नुकसान एवढय़ाच मर्यादित दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, कारण हे सर्व अशाश्वत व अनियोजित पद्धतीने सुरू असलेल्या विकासाचे परिणाम आहेत. कारण झीज होण्यापासून रोखण्यासाठी किनारपट्टय़ांना नैसर्गिक संरक्षण लाभलेले असते. त्यापैकी एक म्हणजे खारफुटीच्या जंगलांचे. एकूण जगातूनच गेल्या शतकात असे तब्बल निम्मे जंगल नष्ट झाले आहे. त्याला भारतही अपवाद नाही. हीच स्थिती प्रवाळांच्या वसाहतींची आहे. या दोन्ही प्रकारच्या परिसंस्थांमध्ये सागरी जिवांच्या जातींचे प्रमाण मोठे असते, हेच प्रदेश या जिवांच्या पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचे ठरतात. पण आता विविध कारणांमुळे प्रवाळाच्या वसाहती व खारफुटी न राहिल्याने किनाऱ्यांची झीज होणे स्वाभाविक आहे, त्याचबरोबर जैवविविधतेचे नुकसानही अपेक्षित आहे. या कारणांबरोबरच नद्यांचे दूषित पाणी मिसळून समुद्रांचे प्रदूषण आणि त्यांचे आम्लीकरणाची प्रक्रियाही सुरूच आहे. या सर्वच गोष्टी समुद्रांचे स्वास्थ्य बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. या प्रश्नाकडे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न म्हणून पाहायला हवेच, त्याचबरोबर यावर देशातील काही कोटी लोकांचे जीवन थेट अवलंबून असल्याने त्याच्याकडे आर्थिक प्रश्न म्हणूनसुद्धा पाहायला हवे. अर्थात, या ताज्या अभ्यासाआधीच्याही  विविध अभ्यासांनी किनाऱ्यांची सद्यस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आता त्यावर किती गांभीर्याने उपाययोजना करायची, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.