अन्वयार्थ :विवादी सूर Print

शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

लता मंगेशकर यांना त्यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवशी अनेक आठवणी येणे अगदीच स्वाभाविक आहे. सुमारे सहा दशके भारतीय चित्रपट संगीतावर अधिराज्य गाजवणाऱ्या या गानसम्राज्ञीला जीवनातील सारे श्रेयस आणि प्रेयस अगदी भरभरून मिळाले. संगीतकारांची गायिका होण्याचे भाग्य लाभलेल्या या कलावतीला याच क्षेत्रात अस्सल मराठमोळय़ा चालींभोवती पिंगा घालण्याचीही इच्छा झाली आणि संगीतरचनेच्या क्षेत्रातही त्यांनी एक अमीट ठसा उमटवला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय चित्रपट संगीतात लताबाई आणि महंमद रफी या दोन्ही नावांचा अक्षरश: दबदबा होता.

दोघेही अतिशय उंचीचे कलाकार असले तरी अखेरीस ती दोन माणसेही होती. त्यांच्यातही राग, लोभ यांसारख्या रिपुंनी वास करणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. लताबाईंनी रफी यांनी लेखी माफी मागितल्याने आपण पुन्हा त्यांच्याबरोबर गाण्यास तयार झालो, तरीही त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत दोघांमधील दुरावलेपण सतत जाणवतच राहिले, असे सांगितल्याने रफी यांच्या चिरंजीवांना राग आला असून त्यांनी आता लताबाईंना पुरावा द्या, नाहीतर न्यायालयात जातो, असे सांगितले आहे. लताबाई आणि महंमद रफी या जोडीने जी अप्रतिम द्वंद्वगीते गायली आहेत, त्याने रुपेरी पडदा नेहमीच सुरेल झाला. कथानक, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यांसारख्या चित्रपटाशी संबंधित गोष्टींवर ज्या काळात चित्रपटांचे महोत्सव साजरे होत असत, त्या काळात अनेक चित्रपट केवळ या जोडीने गायलेल्या सुरेख गीतांमुळे तारले गेले आहेत. लताबाईंनी रफीसाहेबांची जी आठवण दिली, ती अस्थानी आणि अवेळी होती की नाही, या वादापेक्षा आपण इतिहासाकडे कसे पाहतो हे अधिक महत्त्वाचे मानायला हवे. शेवटी उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनाही माणूसपणाचे सारे गुणधर्म चिकटलेले असणारच. आयुष्याच्या अनेक वाटावळणांवर अनेक प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांनी व्यथित झाल्यानंतर त्यांचे प्रगटीकरण करायचे की नाही, हा ज्याच्या त्याच्या प्रकृतिधर्माचा प्रश्न असतो. लताबाईंनी रॉयल्टीच्या प्रश्नावरून रफीसाहेबांबरोबर झालेल्या वादाची आठवण आत्ता सांगितली नसती तर बरे झाले असते, हे जसे खरे; तसेच त्यांना आता या वयात रफीसाहेबांचा पाणउतारा करायचा असेल, असेही समजण्याचे कारण नाही. घटना केवळ इतिहासातच राहणारी आहे. तिचा संगीतावर काही परिणाम झाला नाही; पण त्या दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या जिव्हाळय़ावर मात्र निश्चितच झाला होता. लताबाईंनी तीच तर कबुली देऊन टाकली आहे. इतिहास घडवला तो स्वरांनी. सुदैवाने त्या काळात ध्वनिमुद्रणाचे तंत्र असल्याने तो जपून ठेवणे शक्य झाले. नवनव्या तंत्रज्ञानाने संगीतावर परिणाम झाला आणि माध्यमांच्या जागतिकीकरणाने त्यात मोठे बदल झाले, तरीही लता आणि रफी यांच्या गीतांनी आजही अनेकांच्या मनांत स्वरमहाल बांधून ठेवले आहेत. लताबाईंनी जरी विवादी स्वर लावला असला, तरी त्याला इतिहासातील एक अनुल्लेखित घटना एवढेच महत्त्व मिळायला हवे. चित्रपट संगीताने भारतातीलच नव्हे, तर जगातील अनेक रसिकांना जी समृद्धी दिली आहे, तिच्यापुढे या असल्या घटनांना फारसे महत्त्व असता कामा नये. रफी यांचे चिरंजीव शाहीद यांनी हे लक्षात घ्यायला हवे आणि लताबाईंनीही आपल्या सुरेल जीवनातल्या विवादी स्वरांना दूर ठेवले पाहिजे.