अन्वयार्थ : खड्डेशाहीत मृत्यूचे खटारे Print

शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव पातुर्डा मार्गावरील खिरोडा पुलावरून पूर्णा नदीच्या पात्रात बस कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत गेलेले २० बळी हे मानवी बेफिकिरी, निष्काळजीपणाचा भयावह नमुना आहे.  पाच दशकांहून अधिक वयोमान असलेली, आशिया खंडातील सर्वात मोठी सार्वजनिक उपक्रम कंपनी म्हणून एस.टी.च्या नावाचा ढोल वाजवला जातो. परंतु महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणविली जाणारी एस.टी. कितीही प्रयत्न केला तरी ग्रामीण जनतेला निकोप व निर्दोष प्रवासी सेवा देऊ शकत नाही, ही दारुण शोकांतिका आहे. भंगार आणि जीर्ण झालेले एस.टी. बसेसचे सांगाडे, सदोष यांत्रिकी, निकृष्ट दर्जाचे टायर या जणू नित्याच्या बाबी झाल्या आहेत.

एस.टी. बसगाडय़ांना यांत्रिक व सुटय़ा भागांचे पुरवठा करणारे पुरवठादार उत्कृष्ट अभियांत्रिकीचा मालपुरवठा करत असते, तर या तक्रारी वाढल्या नसत्या. बसचे स्टिअरिंग जाम होणे, टायर अल्पावधीत घासून गुळगुळीत होणे, पावसात बसच्या टपातून धारा लागणे, खिडक्यांच्या काचा अलगद निघणे याला चालक-वाहक सरावलेले आहेत. जेमतेम पगारात, ढासळलेल्या मानसिक व शारिरीक प्रकृतीचे संतुलन करून चालक एस.टी. हाकत आहेत. एस.टी. महामंडळ नावाच्या ‘कंपनी सरकार’ला कमी इंधनात अधिक मायलेज व जास्तीत जास्त उत्पन्न देण्याचे बंधनदेखील चालकांवर आहे. तक्रारी करण्याची सोयसुद्धा नाही. बसेसचा जीर्णोद्धार वेळीच होत नाही. अशा यांत्रिकी राक्षस झालेल्या बसगाडय़ा मग प्रवाशांच्या जिवावर उठतात आणि प्रवाशांना जलसमाधी देणाऱ्या दुर्दैवी घटना घडतात. दुष्काळात तेरावा महिना असल्यागत महामंडळाला ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम खात्याची साथसंगत असते. ग्रामीण भागातील बांधकाम खात्याचा एकही रस्ता किंवा नदीवरील पूल सुस्थितीत असत नाही. भ्रष्टाचाराच्या वाळवीने हे रस्ते जमीनदोस्त होतात. या खड्डेशाहीत यांत्रिकदृष्टय़ा सदोष बस जेव्हा चालते तो प्रवास जीवघेणी आफत यापेक्षा दुसरे काहीच नाही. रस्तेच जेथे खाल्ले जातात, तेथे पुलांना संरक्षण कठडे व भिंतीची सोय असण्याची आवश्यकता बांधकाम विभागाला वाटत नाही. या संरक्षण व्यवस्थेचा अभाव अशा दुर्घटनांना पूरक ठरत असूनही याचे कुणाला सोयरसुतक नाही. एस.टी. किंवा कुठल्याही बसेसची यांत्रिक तपासणी परिवहन विभागासह त्या त्या मालकी व्यवस्थाकडून केवळ औपचारिक व कागदोपत्री न होता खरोखरच कसून झाली असती, तरीही प्राण वाचले असते.  सध्या मात्र यांत्रिकदृष्टय़ा अपात्र बसगाडय़ाही रस्त्यांवर बेलगाम धावत आहेत. एस.टी. महामंडळाच्या संदर्भात विदर्भातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातील दोन लाखांहून अधिक किलोमीटर चाललेल्या व तांत्रिकदृष्टय़ा सदोष असलेल्या बहुतांश एस.टी. बसेस या विदर्भाच्या माथी मारण्यात आल्या आहेत. तरीदेखील या कालबाह्य बसेसवर विदर्भातील ग्रामीण प्रवासाचा डोलारा अव्याहत सुरू आहे. विदर्भावरील हा प्रवासी सेवेचा अन्याय चालक वाहक निमूटपणे सोसत आहेत. महामंडळाचा अशा खटारा बसगाडय़ा विदर्भाला दान देण्याचा अटृहास का हादेखील अनुत्तरित प्रश्न आहे. हे सगळे वास्तव विदारक असले तरी एस.टी. महामंडळ आणि बांधकाम खाते बुलढाण्याच्या घटनेपासून बोध घेणार का, असा प्रश्न आहे.