अन्वयार्थ : ज्येष्ठांचा कौटुंबिक छळ Print

मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
alt

कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा अमलात आला; तरी त्याचे म्हणावे तसे परिणाम अद्याप दिसून येत नाहीत. भारतीय घरातील महिला जशा असुरक्षित असतात, तसेच वृद्धही. ‘हेल्प एज इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीचे धक्कादायक निष्कर्ष पाहिले, की शिक्षणानेही समाजातील मूल्यव्यवस्था टिकवून धरता येत नाही, असे लक्षात येते. भारतातील दर तीनपैकी एक वृद्ध अशा हिंसाचाराचा बळी ठरतो. धक्कादायक बाब अशी, की सर्वाधिक म्हणजे ५३.६ टक्के िहसाचार पोटच्या मुलांकडूनच (मुलग्यांकडून) होतो. सुनांकडून छळ होण्याचे प्रमाण त्यापेक्षा कमी म्हणजे ४३.३ टक्के एवढे आहे.

जन्मदात्यांबद्दलची ही घृणास्पद वर्तणूक पाहता, सांस्कृतिकदृष्टय़ा आपण किती मागे चाललो आहोत, हे लक्षात येते. सुशिक्षित समाजात होणाऱ्या अशा छळापेक्षा अशिक्षित आणि गरीब समाजात सुनांकडून होणाऱ्या छळाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. घरातली भांडणे चव्हाटय़ावर येऊ नयेत, म्हणून वृद्ध असा छळ सहन करत राहतात, असाही निष्कर्ष या पाहणीतून पुढे आला आहे. हे प्रमाण ८० टक्के आहे. घरातल्यांचाच छळ पाच वर्षांहून अधिक काळ सहन करणाऱ्यांचे प्रमाण ५५ टक्के असेल, तर याचा अर्थ नीतिमूल्ये आणि संस्कृती यांचा ऱ्हास होतो आहे. वडिलांनी कष्टाने मिळवलेल्या संपत्तीसाठी त्यांचाच छळ अकर्तृत्ववान मुले करतात, हे प्रमाण भारतात जास्त आहे. याचे कारण येथे त्याबाबत वृद्धांना कायदेशीर संरक्षण मिळण्यात खूपच अडचणी आहेत. वडिलांचा छळ करून त्यांची मालमत्ता पळवणारी मुले त्यांना वाऱ्यावर सोडू शकतात, कारण त्यांना कायद्याची वेसण नाही आणि पोलिसांचाही धाक नाही. वृद्धांनी मूकपणे छळ सहन करण्याऐवजी पोलिसांकडे धाव घेतली, तर त्यांना नंतरच्या काळात संरक्षण मिळण्याची हमी नाही. एकटय़ाने आयुष्य कंठताना येणाऱ्या अडचणींवर वृद्धाश्रम हा उत्तम पर्याय असला, तरी त्याबाबत समाजाचा दृष्टिकोन अद्यापही निकोप नाही. वडिलांच्या पैशांवर चैनबाजी करणाऱ्या मुलांना स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज वाटत नाही आणि त्याबाबतचे संस्कार करण्यासाठी पालकही मनावर घेत नाहीत. जगातल्या सगळ्या भागांत वृद्धांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिकही आधार हवा असतो. आयुष्यभर खस्ता खाऊन संसार उभा केल्यानंतर वृद्धापकाळी असा छळ सहन करावा लागणे हाच समाज मनोरुग्ण असल्याचे निदर्शक आहे. २०२० मध्ये भारत हा जगातील सर्वात तरुण देश असणार आहे, असे भाकीत करत असतानाच २०५० मध्ये आजच्या दहा कोटी वृद्धांची संख्या तिप्पट होणार आहे, याकडे कानाडोळा करून चालणार नाही. तेव्हाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी, परंतु त्यासाठी सध्याची स्थिती त्वरेने सुधारणे फारच आवश्यक आहे. एकेकटय़ा वृद्धांना मदत करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांचे पथक स्थापन करण्याची योजना पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मांडली आहे. अशी योजना राज्यभर कार्यरत झाली, तर तरुण वयात मुलांना या प्रश्नाचे गांभीर्य समजू शकेल आणि वृद्धांना किमान आधार मिळू शकेल. जागतिक वृद्ध दिनी प्रत्येकाने हा संकल्प आपल्याच घरापासून अमलात आणणे अधिक उचित ठरणारे आहे.