अन्वयार्थ : निवडीमागचे राजकारण Print

 

मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
alt

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीवर योग्य व्यक्तींची नेमणूक करूनही त्यामागील राजकारणामुळे या नेमणुका अधिक गाजल्या. संदीप पाटील यांची कारकीर्द पाहता निवड समितीच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली नेमणूक अत्यंत योग्य असली तरी क्रिकेट विश्वातील अनेक गटांना हा धक्का होता. पश्चिम विभागातून कुरुविलाचे नाव पुढे केले होते. पण नियामक मंडळाने संदीपच्या बाजूने कौल दिला. नियामक मंडळात राजकारण खूप चालते. प्रत्येक विभागातील बडे नेते आपल्या माणसाची वर्णी लावण्यासाठी कंबर कसत असतात. मोहिंदर अमरनाथ याला बढती मिळून त्याची अथवा रॉजर बिन्नीची अध्यक्षपदी निवड होईल असा होरा होता.

पण मंडळाने मोहिंदरला घरचा रस्ता दाखविला. निवड समितीवर त्याने एकच वर्ष काम केले होते. तरीही त्याला कायम ठेवण्यात आले नाही. मंडळाच्या नियमानुसार निवड समितीवरील नेमणूक ही एकच वर्षांची असते आणि ती फक्त चार वेळा होऊ शकते. हाच नियम मोहिंदरसाठी पहिल्याच वर्षी लागू करण्यात आला. त्यामागे दोन महत्त्वाची कारणे सांगण्यात येतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहिंदरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबाबत शेरेबाजी केली होती. ती त्याला भोवली. आपल्या वडिलांची बॅट ऑस्ट्रेलियातील संग्रहालयाला त्याने भेट दिली व भारतापेक्षा ऑस्ट्रेलियातच ती अधिक चांगली जतन केली जाईल असा शेरा मारला. संग्रहालये उभारण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची संस्कृती भारतात नाही हे खरे असले तरी क्रिकेट नियामक मंडळ असे संग्रहालय उभारीत आहे व त्यासाठी बराच मोठा निधीही मंजूर केला आहे ही माहिती मोहिंदर अमरनाथ यांना नसावी याची आश्चर्य वाटते. धोणीला कप्तानपद देऊ नये असाही आग्रह मोहिंदरने गेल्या बैठकीत धरला होता. नियामक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन त्यामुळे नाराज झाले कारण आयपीएलमधील त्यांच्या संघाचे नेतृत्व धोणीकडेच आहे. मोहिंदरने पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीने हा सल्ला कदाचित दिला असेल. पण भारतात व्यावसायिकता ही बोलण्यापुरतीच असते, नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वाकडय़ात जाऊन चालत नाही. कपिल देवपासून याची अनेक उदाहरणे सांगता येतील. तरीही मोहिंदरने ती चूक केली व त्याची किंमत त्याला मोजावी लागली. वार्षिक घसघशीत साठ लाख रुपये मानधन असणाऱ्या निवड समितीवरील नेमणुकीसाठी खेळाडूंपासून अनेकांनी लॉबिंग केले होते. परंतु, सक्तवसुली संचालनालयातूनही विशिष्ट व्यक्तीच्या नेमणुकीसाठी दबाव आला. सरकारचा हाच विभाग आयपीएलमधील कथित गैरव्यवहारांचीही चौकशी करीत आहे. एकीकडे चौकशी आणि दुसरीकडून नेमणुकीसाठी दबाव अशी ही दुहेरी नीती आहे. क्रिकेट नियामक मंडळाने या दबावाला भीक घातली नाही हे चांगले झाले. अन्यथा संदीप पाटीलसारखा खेळाडू पुन्हा मागे राहिला असता. संदीपच्या खेळाबद्दल वेगळे सांगायला नको, पण प्रशिक्षक म्हणून वेगवेगळ्या स्तरावर त्याने बजावलेली कामगिरीही उल्लेखनीय आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली केनियाने विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. निवड समितीच्या अन्य सदस्यांनीही अशा कामगिरीतील कौशल्य सिद्ध केले आहे. साबा करीम यांनी बिहार तर राजेंद्रसिंग हान्स यांनी उत्तर प्रदेशचा रणजी संघ घडविला. तरुण खेळाडूंशी त्यांचा उत्तम संपर्क असल्याने त्याचाही खेळाडूंची निवड करताना फायदा होईल. त्यामानाने श्रीकांतच्या अध्यक्षतेखालील समितीत तज्ज्ञांची वानवा होती. संदीप पाटील हा धडाकेबाज, मुक्त खेळासाठी प्रसिद्ध होता. क्रिकेटच्या नव्या अवतारात अशाच तंत्राची अधिक गरज असते. यामुळेच त्याची नेमणूक देशाला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.