अन्वयार्थ : खलिस्तानी धोका Print

 

बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२

पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळ संपली या भ्रमात सरकारने राहू नये, हेच लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर लंडन येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून सिद्ध झाले आहे. अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लपलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या सहकाऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम राबविण्यात आली. त्या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये ब्रार होते. भिंद्रनवाले मारले गेले तरी पंजाबमधील दहशतवाद संपला नव्हता. सुवर्णमंदिरात लष्कर शिरले याचा सूड दोनच वर्षांत लष्करप्रमुख जनरल वैद्य यांची पुण्यात हत्या करून घेण्यात आला.

मात्र त्यानंतर के. पी. एस. गिल यांनी सातत्याने व हिकमतीने आक्रमक पोलिसी कारवाया करीत खलिस्तानी दहशतवाद मोडून काढला. त्या वेळी काँग्रेस सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले. बियांतसिंग यांची त्यांना मदत झाली, पण पाठोपाठ मुख्यमंत्रिपदी असतानाच बियांतसिंग यांची हत्या करण्यात आली. मात्र त्यानंतर गेली १५ वर्षे पंजाबमध्ये शांतता होती. काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळ याच काळात फोफावली असली तरी पंजाबमधील तरुण पुन्हा शेती व उद्योग क्षेत्राकडे वळले व राज्याची भरभराटही झाली. राज्यात मुबलक पैसा खेळू लागला. फुटीरतावाद व दहशतवाद यांचा मुकाबला कसा करायचा याचे उदाहरण म्हणून पंजाबकडे बोट दाखविले जाऊ लागले. परंतु खलिस्तानी चळवळ दबली असली तरी संपलेली नाही हे अधूनमधून लक्षात येत होते. पंजाबमध्ये या चळवळीला स्थान मिळत नसले तरी परदेशात या चळवळीचे जाळे विस्तारत होते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व न्यूझीलंड येथे खलिस्तानी प्रचारक कार्यरत झाले होते. त्यांना पैशाची कमी नव्हती. भारतात त्यांच्या कारवाया सुरू नसल्या तरी पंजाबमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये भिंद्रनवाले ६ जून रोजी ठार झाले. तो दिवस हुतात्मा दिवस म्हणून अनेक देशांतील शीख पाळीत होते. याच वर्षी जून महिन्यात भिंद्रनवाले यांच्या स्मारकाची कोनशिला सुवर्णमंदिरात बसविण्यात आली. त्याला कोणीही विरोध केला नाही. एका देशद्रोह्य़ाचे स्मारक होत असूनही सरकारही मूग गिळून बसले. या स्मारकास ब्रार यांनी उघड विरोध केला होता व त्यामुळे खलिस्तानी खवळले होते. ऑपरेशन ब्लू स्टार झाल्यापासून ब्रार खलिस्तान्यांच्या हिट लिस्टवर होते. गेली अनेक वर्षे त्यांना धमक्या येत होत्या, पण झेड सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला होऊ शकला नव्हता. पण लंडनमध्ये तशी संधी मिळाली. ते परदेशात असताना त्यांच्या सर्व हालचालींची इत्थंभूत माहिती खलिस्तानवाद्यांना असायची असे पोलीस तपासात कळले आहे. खलिस्तानी चळवळ किती नियोजनपूर्वक काम करीत आहे हे यावरून लक्षात येईल. मुंबई पोलिसांनीही या संदर्भात गेल्या वर्षी केंद्र सरकारला सावध केले होते. चळवळीचे नेतृत्व करणारे तीन प्रमुख खलिस्तानी मलेशियात असल्याची माहितीही पोलिसांकडे आहे; पण त्यांना पकडण्यासाठी हालचाली झालेल्या नाहीत. पाकिस्तानकडून या चळवळीला मदत होते हे खरे असले तरी परदेशातील शिखांकडूनही मुबलक पैसा मिळतो. पंजाबातील अकाली सरकारचे कचखाऊ धोरण, मतांसाठी कोणाचेही लांगूलचालन करण्याची अकाली दलाची वृत्ती आणि पंजाब व दिल्लीमधील विसंवाद अशी अनेक कारणे यामागे आहेत. खलिस्तान्यांच्या या हालचालींकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्यांना नेस्तनाबूत करावे लागेल. काश्मीरपाठोपाठ पुन्हा पंजाब पेटणे हे भारताला परवडणारे नाही.