अन्वयार्थ : पीळ सुटलेला नाही Print

 

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

भारताबरोबर मैत्रीच्या गप्पा सुरू असल्या तरी काश्मीर स्वतंत्र करण्याच्या मुख्य कार्यक्रमाला पाकिस्तानने अद्याप सोडचिठ्ठी दिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत याची प्रचीती आली. काहीही कारण नसताना पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी काश्मीर प्रश्न उपस्थित केला. समस्या सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे व्यासपीठ कुचकामी ठरते हे सांगताना त्यांनी काश्मीरचे उदाहरण दिले. पण तेवढय़ावरच न थांबता, काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काला पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही जाहीर केले.

संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान बरेच वेळा, कधी उघडपणे तर कधी आडमार्गाने, काश्मीर आणून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो. त्याकडे फार लक्ष देऊ नये असे भारताने गेली काही वर्षे ठरविले होते. परंतु या वेळी झरदारी यांनी स्वयंनिर्णयाला पाठिंबा देण्याची भाषा केल्याने भारताला प्रत्युत्तर देणे भाग पडले. सुदैवाने परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी येथे तत्परता दाखविली. हा विषय झरदारी यांनी विनाकारण उपस्थित केल्याचे स्पष्ट करून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे नि:संदिग्ध प्रतिपादन कृष्णा यांनी केले. सवाल-जबाबांचे हे नेहमीचे नाटक इथेच थांबणे अपेक्षित होते, परंतु झगडा वाढवायचाच या ईर्षेने पाकिस्तानने परिषदेत सहभाग घेतला असावा. प्रत्येक देशाला दोन वेळा प्रत्युत्तर देण्याचा हक्क संयुक्त राष्ट्रांत दिला गेला आहे. त्यानुसार पाकिस्तानचे प्रतिनिधी बशीर तरार यांनी झरदारींच्या उद्गारांचे पूर्ण समर्थन केले. इतकेच नव्हे तर काश्मीर हा भारताचा कधीही अविभाज्य भाग नव्हता व आजही नाही, असे प्रतिपादन केले. ही आक्रमकता भारताला अनपेक्षित होती. काश्मीरचाच काही भाग बळकाविणाऱ्या देशाने हे बोलावे याचे आश्चर्य वाटते, असा टोमणा मारून, काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने पुन्हा सांगितले. तरीही तरार स्वस्थ बसले नाहीत. काश्मीर हा वादग्रस्त भाग असून तो भारताचा आहे असे म्हणणे पुराव्यावर टिकणारे नाही, असे सांगत, स्वयंनिर्णयाचे तुणतुणे त्यांनी पुन्हा वाजविले. शेवटी काश्मीरमध्ये नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका होतात व तेथील लोक स्वत:चे सरकार निवडतात याची आठवण भारताला करून द्यावी लागली. यानंतर नियमानुसार हा वाद थांबविण्यात आला. काश्मीरच्या समस्येत तेल ओतण्याचा उद्योग पाकिस्तानकडून अजूनही चालू आहे हे इथे दिसून येते. पाकिस्तानबरोबरच्या वाटाघाटी तसेच मित्रमंडळांचे दौरे हे केवळ देखावे आहेत. काश्मीर भारतापासून तोडणे हाच पाकिस्तानचा मुख्य उद्देश आहे. दुर्दैवाने आपल्याकडील अनेक पाकप्रेमींना हे वास्तव कळत नाही आणि परस्परसंबंधात सुधारणा होत असल्याचे भ्रामक चित्र निर्माण केले जाते. पाकिस्तानबरोबर वाटाघाटी करू नयेत असे नाही, पण त्या करताना कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल. व्यापारसंबंध वाढविण्यासाठी व्हिसा नियंत्रणे कमी करण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. व्यापारवृद्धीसाठी तो कदाचित चांगला असेल, पण दळणवळणावरील नियंत्रण शिथिल करणे हा आत्मघात ठरेल असे संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या वक्तव्यांवरून वाटते. सध्या सर्व जगाकडून थपडा मिळत असल्यामुळे पाकिस्तान बचावात्मक पवित्रा घेत असला आणि मैत्रीची भाषा करीत असला तरी लपविलेले त्याचे खरे रूप वारंवार उघड होते. यामुळेच त्या देशावर विश्वास ठेवता येत नाही.