अन्वयार्थ : आक्रमक समर्थन Print

 

शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना सोनिया गांधींनी आर्थिक सुधारणांचे केलेले समर्थन आक्रमक शैलीचे होते. किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक किती फायदेशीर आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न राजकोटमधील मेळाव्यात त्यांच्या परीने त्यांनी केला. शेतमालाला चांगला भाव मिळेल व दलालांची साडेसाती संपेल हा सर्वत्र केला जाणारा युक्तिवादच मेळाव्यात झाला असला तरी सोनिया गांधींनी तो जाहीरपणे करण्यास महत्त्व आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग, माँटेकसिंग अहलुवालिया व अन्य नेत्यांनी जनतेला हे पटवून देणे व सोनिया गांधींनी या निर्णयाची जाहीर पाठराखण करणे यात फरक पडतो.

आर्थिक सुधारणांच्या निर्णयामागे काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे असा संदेश यातून जातो. तसा तो जाणे सध्या आवश्यक आहे, कारण निवडणुकीचे आव्हान उभे राहिले की सरकार धोरणलकव्यामध्ये सापडते अशी धास्ती गुंतवणूकदारांना वाटते. याआधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी आर्थिक सुधारणांचे समर्थन केले होते. कार्यकारिणीपेक्षा जाहीर समर्थन हे केव्हाही अधिक परिणामकारक ठरते. जनमत बदलण्याचा तो एक मार्ग असतो. नेत्यांचा युक्तिवाद जनतेला पटतोच असे नव्हे, पण आपल्याला विश्वासात घेतले जात आहे, ही भावना जनतेत निर्माण होते व त्याचा राजकीय फायदा होतो. काँग्रेस नेत्यांकडून आर्थिक सुधारणांचे असे समर्थन झाले तरच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी गुंतवणूकदार पुढे सरसावतील. तरीही, निवडणूक प्रचारात आर्थिक सुधारणांचे समर्थन करण्याचा धोका सहसा कोणी स्वीकारीत नाही. ‘शायनिंग इंडिया’चा भाजपला बसलेला झटका अन्य पक्षांना आठवतो. या झटक्यानंतर भाजपने इतके घूमजाव केले की, हा पक्ष डाव्यांपेक्षाही डावा झाला. ‘शायनिंग इंडिया’पेक्षा ‘आम आदमी’ने आपल्याला हात दिला या भावनेमुळे मनमोहन सिंग पंतप्रधानपदी येऊनही गेली सात वर्षे गांधी घराणे वा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून आर्थिक सुधारणांचे जाहीर समर्थन झाले नव्हते. ते गुजरातमध्ये झाले. गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने हा धोका पत्करण्यास सोनिया गांधी तयार झाल्या, असेही कारण यामागे असू शकते. काँग्रेस सत्तेवर असलेल्या राज्यांत निवडणुका असत्या तर प्रचारात सोनिया असे बोलल्या असत्या का, हा विचारात घेण्याजोगा प्रश्न आहे. गुजरातमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या घटली तर आर्थिक सुधारणांना जनतेचे पाठबळ मिळाल्याचा प्रचार काँग्रेसला करता येईल. भाजपच्या काही मंत्र्यांच्या विरोधात सौराष्ट्रात स्वयंस्फूर्त निदर्शने सुरू झाल्याने असे होण्याची दाट शक्यता आहे. त्या वेळी भाजपची पंचाईत होईल. नरेंद्र मोदींच्या अपप्रचाराची दखल न घेता थेट आर्थिक सुधारणांवर बोलून सोनिया गांधींनी भाजपची अडचण केलीच आहे. सोनिया गांधींच्या परदेश प्रवासावरील खर्चासारखे  मुद्दे मोदींनी पुढे आणले. त्यांचे आरोप सिद्धही झाले नाहीत. असल्या आरोपांवर मिटक्या मारीत चर्चा करणारा मोठा वर्ग संघ परिवारात आहे. मोदींच्या वक्तव्याने तो खूश होत असला तरी असल्या प्रचाराने नवे मतदार जोडता येत नाहीत हे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या मोदींनी समजून घेतलेले बरे. यापेक्षा गुजरातमधील कामाची उजळणी त्यांना तारून नेईल.