अन्वयार्थ : काळानुरूप बदल हवा! Print

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

चालू शतकाच्या आरंभी मॅनेजमेंट आणि  कम्प्युटर इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या देशातील लाखो विद्यार्थ्यांना तेव्हा स्वप्नपूर्तीचा आनंद होत होता. आता दहा वर्षांनतर मात्र परिस्थिती पालटल्याचे दिसून आले आहे. हा बदल स्पष्ट होतो, तो बिझनेस स्कूल्स व इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या संस्थांची संख्या रोडावल्यामुळे. यंदाच्या वर्षी देशभरात एमबीए आणि एमसीएचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या १०९ नव्या संस्था सुरू झाल्या, त्यापेक्षा अधिक म्हणजे १८५ संस्था बंद पडल्या.

मागील वर्षी हेच प्रमाण १६७ होते. बिझनेस स्कूलचा देशातील एकूणच कारभार अधोगती दर्शवत असल्याचे मत ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या राष्ट्रीय पातळीवरील नियामक संस्थेने व्यक्त केले आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी अशा नव्या शैक्षणिक संस्था वेगाने स्थापन होऊ लागल्या. मात्र उद्योगांची गरज ओळखून पावले टाकण्याऐवजी बाजारात जे खपते, ते देण्याकडे या संस्थांचा कल राहिला. व्यावसायिक अभ्यासक्रमांत ज्या त्वरेने बदल होणे अपेक्षित असते, तो वेग न राखल्यामुळे किंवा उद्योगांना उपयोगी ठरेल अशा कार्यक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे असेल, या अभ्यासक्रमांची मागणी कमी होत गेली. आता एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना कोणतेही काम करावे लागत असल्याचे दिसते, याचे कारण शिक्षणाचा दर्जा व गरजेपेक्षा अधिक उपलब्धता हे आहे. नव्या संस्था सुरू करताना आवश्यक असलेल्या प्रशिक्षित अध्यापकांची गरज कधीच लक्षात घेतली गेली नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावरही विपरीत परिणाम होत राहिला. अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणेच वैद्यकीय महाविद्यालयांनाही उत्तम अध्यापक मिळणे अवघड बनत चालले आहे. व्यवसाय की अध्यापन या पर्यायांपैकी व्यवसायाकडे अधिक कल असल्याने अनेक जण अध्यापनाकडे पाठ वळवतात. अध्यापकांना मिळणारे वेतन आणि व्यवसायातील धनप्राप्ती यांतील तफावत हे त्याचे कारण असते. वैद्यकीय महाविद्यालयांत अध्यापन करणाऱ्यांना खासगी व्यवसाय करण्यास सरकारने परवानगी दिली होती. शिक्षणक्षेत्रात खासगीकरणाला मान्यता दिल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात विविध संस्था सुरू करण्यात येऊ लागल्या. राजकारण्यांसाठी ते अधिक महत्त्वाचे आकर्षण ठरू लागले. उत्तम इमारत, भरपूर शुल्क आणि चांगल्या सुविधा याच्या जोरावर विद्यार्थी मिळवण्याचे प्रयत्न गेल्या दशकभरात उपयोगी पडेनासे झाले आहेत. उत्तम अध्यापक, ही संस्थेची खरी ओळख ठरते, हे लक्षात घेऊन संस्थाचालकांनी आखणी केली, तरच त्यांना विद्यार्थी मिळण्याची शक्यता अधिक असते. दहा वर्षांत एमबीए अभ्यासक्रमाचा दर्जा इतका घसरला, की त्याचा कोणत्याच उद्योगांना फारसा फायदा होईना. याचा परिणाम नोकऱ्यांच्या उपलब्धतेवर झाला आणि त्यामुळेच, सुरू झालेल्या संस्थांपेक्षा बंद पडलेल्या संस्थांचा आकडा अधिक झाला. हे चित्र बदलण्यासाठी उद्योगांच्या गरजा ओळखून प्रशिक्षित विद्यार्थी निर्माण केले, तरच त्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षण संस्थांचेही भले होऊ शकेल.