अन्वयार्थ : रिपब्लिकन गर्दीचे हात रिकामेच Print

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपशी युती करून मोठे राजकीय धाडस दाखविले. दलित जनता बरोबर आली की सत्ता हमखास मिळते, याची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पक्की जाणीव आहे. त्यासाठी त्यांना एखादा नेता बरोबर हवा असतो. काँग्रेसची ती गरज पूर्ण करण्याची जबाबदारी गेल्या तीन दशकांत रा.सू.गवई व रामदास आठवले यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. त्या बदल्यात त्यांना सत्तेची पदे उपभोगायला मिळाली. राज्यातील शिवसेना व भाजप या प्रमुख विरोधी पक्षांना सातत्याने सत्ता हुलकावणी दाखवत आहे,

याचे कारणही त्यांना कळले आहे. त्यामुळेच आठवले यांचे शिवसेना-भाजपने विशेषत: सेनानेतृत्वाने जोरदार स्वागत केले. परंतु सत्तेच्या जवळ जाण्यासाठी जी राजकीय बेरीज-वजाबाकी करावी लागते, त्याबाबत मात्र शिवसेनेने फारसा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. त्याचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीत दिसला. शिवसेना-भाजप-आरपीआय या महायुतीने एकत्रित निवडणुका लढविल्या, सत्ता मिळाली, परंतु त्यात आरपीआयच्या पदरात काहीच पडले नाही. आरपीआयची कामगिरी निराशाजनक ठरली. शिवशक्ती- भीमशक्तीची ती पहिली राजकीय कसोटी होती, त्यातच आरपीआयने मार खाल्ल्याने रामदास आठवले फारच अस्वस्थ होते. त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. ते अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधला. ३ ऑक्टोबर या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून त्यांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले. आता वर्षां-दीड वर्षांत लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या नेत्यांना आपली ताकद दाखविणे आठवले यांना आवश्यक वाटले असावे. त्यासाठी महिनाभर ते स्वत: महाराष्ट्रभर फिरले. ‘महायुती’ करण्यास अनेक कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही त्यांनी आपला निर्णय पुढे रेटला. मुंबईत वीस-पंचवीस हजारांची गर्दी जमवून त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर विराट शक्तिप्रदर्शन केले. गाडय़ांचे ताफेच्या ताफे मुंबईत आणून सत्तेच्या वलयातील थोडेबहुत संपत्तीचे दर्शनही रिपब्लिकन जनतेला घडले. आठवले यांची आणखी एक राजकीय खासियत म्हणजे ते ज्या पक्षाशी युती करतात, त्या पक्षाचे नेते आरपीआयच्या व्यासपीठावर कायम दिसतील याची खबरदारी घेतात. पूर्वी काँग्रेसबरोबर असताना शरद पवार यांच्याशिवाय त्यांचे पान हलत नव्हते, नंतर राष्ट्रवादीशी सोबत केल्यानंतर पवार नसतील तर छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील हे नेते आरपीआयच्या व्यासपीठावर हमखास असायचे. आता त्यांना सेना-भाजपचे नेते हवे असतात. त्यानुसार वर्धापन दिनाच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांनी आवर्जून हजेरी लावली. तोफा धडधडाव्यात तशी त्यांची भाषणे झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेचे तोफगोळे टाकले गेले. भ्रष्ट आघाडी सरकारला गाडून महायुतीची सत्ता आणायची असा निर्धार केला. सत्ताधारी जमात बना, हे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे, याची रिपब्लिकन गर्दीला खुद्द उद्धव ठाकरे यांनी आठवण करून दिली, हे विशेष. परंतु त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीचा कार्यक्रम देण्यास आठवले, ठाकरे, मुंडे यांना अर्थात एटीएमला विसर पडला. दलित जनतेचा आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय, परंतु शिवसेनेच्या दडपणामुळे त्याचाही उच्चार करायचे आठवले यांनी टाळले. आठवले यांनी ठरविल्याप्रमाणे शक्तिप्रदर्शन केले, परंतु कोणताही कार्यक्रम न मिळाल्याने रिपब्लिकन गर्दी रिकाम्या हातानेच परतली.