अन्वयार्थ : पंचहो, आता तुम्हीही? Print

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२

क्रिकेट क्षेत्रात पैसा सहज खेळू लागल्यानंतर झटपट पैसा मिळविण्यासाठी खेळाडूंनी अनैतिक मार्गाचाही अवलंब सुरू केला. उत्तेजक सेवन करणे, अमली पदार्थ अवैधरीत्या बाळगणे हे प्रकार नियमित होऊ लागले होते. गेल्या काही वर्षांमध्ये यापलीकडे जाऊन खेळाडू मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग आदी गैरप्रकारांद्वारे संपत्ती मिळविण्याचा मार्ग पकडू लागले आहेत. आजपर्यंत अनेक खेळाडूंना त्याबाबत कारवाईस सामोरे जावे लागले आहे. हे सारे प्रकार आता पुन्हा होणार नाहीत, असे वातावरण असताना काही पंचही मॅच फिक्सिंग प्रकारात सहभागी झाले असल्याचे स्टिंग ऑपरेशन्सद्वारे भारतातील एका वाहिनीवर दाखविण्यात आले.

या स्टिंग ऑपरेशन्समुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली नाही तर नवलच. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल दर्जाच्या संघांमधील अनेक खेळाडूंना विविध उद्योगसमूहांचे प्रायोजकत्व लाभलेले असते. हा खेळाडू मैदानावर जास्तीत जास्त वेळ खेळत राहिला तरच या खेळाडूंच्या पुरस्कर्त्यांना फायदा मिळतो. जर हे खेळाडू फार वेळ टिकले नाहीत तर या प्रायोजकांचे खूपच नुकसान होते. हे लक्षात घेऊन क्रीडा स्पर्धाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्थापन करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीने पंचांचीच मदत घेण्याची शक्कल लढविली आहे. खेळाडूंना नाबाद ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार पंचांना असतात. ज्या निर्णयांबाबत तिसऱ्या पंचांचा अडथळा येणार नाही, असे काही निर्णय घेणे मैदानावरील पंचांच्या हातात असते. पायचीत, नोबॉल यांसारख्या निर्णयांमध्ये सहसा तिसऱ्या पंचांचा अडथळा येत नाही. हे लक्षात घेऊनच या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर काही सामन्यांमध्ये पंचांना लाच देण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्टिंग ऑपरेशन्समध्ये दाखविण्यात आले आहे. या पंचांमध्ये प्रामुख्याने पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका या देशांमधील काही पंचांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी अव्वल श्रेणी समिती तयार केली आहे. या समितीमधील पंचांचा या स्टिंग ऑपरेशन्समधील पंचांमध्ये समावेश नाही. मात्र या सहांपैकी दोन पंचांनी यापूर्वी काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे, तर काही पंचांनी आशियाई खंडातील काही खासगी लीग स्पर्धामध्ये पंच म्हणून काम केले आहे. क्रिकेटमध्ये पैशाचा भरघोस ओघ सुरू झाल्यानंतर येनकेनप्रकारेण पैसा मिळविण्याचा प्रयत्न या क्षेत्रातील अनेकांकडून केला जात आहे. आयसीसीने या स्टिंग ऑपरेशन्समध्ये कितपत तथ्य आहे याची चौकशी सुरू केली आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये दाखविण्यात आलेल्या पंचांबाबत बांगलादेश, श्रीलंका या देशांच्या क्रिकेट मंडळाने आपले कोणतेही पंच या प्रकारात अडकले नसल्याचा खुलासा केला आहे. संबंधित पंचांकडूनही हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे स्पष्टीकरण केले जात आहे. कदाचित ही स्टिंग ऑपरेशन्स हा संबंधित वाहिनीची लोकप्रियता वाढविण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकेल. मात्र क्रिकेटमध्ये असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रिकेटची न्यायदेवता मानले जाणारे पंच भ्रष्ट झाले तर खेळाडूंनीही विविध गैरप्रकारे पैसा मिळविण्याचा मार्ग अवलंबला तर आश्चर्य वाटणार नाही.