अन्वयार्थ : अभिजात अभिनेता Print

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

गेली चार दशके भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन या अभिनेत्याला जगावे कसे याचे जे उत्तर सापडले आहे, तेच त्यांच्या सत्तरीतील आनंदाचे रहस्य आहे. प्रतिभा आणि अभिजातता यांचा संगम झालेल्या या अभिनेत्याला प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर गेल्यानंतरही जमिनीवर राहण्याचे जे तंत्र अवगत झाले आहे, ते खरोखरीच अनुकरणीय आहे. अमिताभला लोकप्रियता मिळेपर्यंतच्या काळातील हिंदी चित्रपट प्रेमाच्या त्रिकोणात अडकला होता. त्याचे विषय ठरलेले असत आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा दर्प जडलेला असे.

सामान्य माणसाची कैफियत तेव्हाही क्वचित मांडली जाई, परंतु तिला चित्रसृष्टीत अग्रस्थान मिळत नसे. ‘अँग्री यंग मॅन’ अशा प्रतिमेत जाण्याचे धाडस तेव्हा सहसा कुणी करत नसे. अमिताभला ते करता आले, कारण तो काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करीत राहिला. या प्रतिमेच्या प्रेमात न पडता, सतत वेगळे काही करण्याचा त्याचा हट्ट त्याला नट ते अभिनेता या प्रवासात निश्चितच उपयोगी पडला. केवळ स्टारडमच्या लाटेवर स्वार होऊन तरंगत राहण्यापेक्षा चित्रपट हा एक उद्योगही आहे, याचे भान येणारा अमिताभ हा हिंदी चित्रपट सृष्टीतला बहुधा पहिला अभिनेता असावा. चित्रीकरणासाठी वेळेत पोहोचणे, ही त्या उद्योगाची प्राथमिक गरज असते, याची जाणीव त्याला होती. त्यामुळेच चित्रपटाला देशात उद्योगाचा दर्जा मिळण्यात त्याचा नि:संशय वाटा आहे. घरात साहित्य, कला आणि संस्कृती याबाबतची उच्च अभिरुचीचे संवर्धन होत असल्यामुळे असेल कदाचित अमिताभ बच्चन यांना आपण नेमके काय करीत आहोत, याचे भान सतत राहिले आहे. उत्कृष्ट कविता कळणे हे अभिजाततेचे लक्षण असते. ही अभिजातता अभिनयातही ओतप्रोत भरण्यासाठी प्रतिभेची साथ लागते. त्यांच्या यशात या दोन्ही गुणांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे ‘स्टारडम’च्या तकलादू दुनियेत पाय घट्ट रोवून उभे राहण्याचे सामथ्र्य त्यांच्याकडे आले असावे. वय सरू लागले की ही रंगीत दुनिया भल्याभल्यांना वाटाण्याच्या अक्षता लावते, असा आजवरचा अनुभव आहे. पण वयानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यासाठी जिद्द असली की काळावरही स्वार होता येते, हे अमिताभसारख्या अभिनेत्यामुळे लक्षात येते. ज्या प्रकारचे चित्रपट गेल्या पंधरावीस वर्षांत त्यांनी केले, ते करण्याची हिंमत त्यांच्या आधीच्या पिढीतील कुणा नटाने केली असती का अशी शंका येते. मग तो ‘चीनी कम’ असो की ‘पा’. जीवनातल्या उतार चढावांमुळे बहकून न जाण्यासाठी अमिताभकडे स्थितप्रज्ञता आहे. त्यामुळे आपण एक ‘ब्रँड’ आहोत, याचे भान ठेवूनही सतत आपली अभिजातता जपून ठेवणे त्याला शक्य होते. अलीकडेच प्रकाशित झालेले त्यांचे रवींद्र संगीतातील ‘एकला चलो एकला चलो रे’ हे गाणे ऐकले की हे सजह लक्षात येते. राजकारण असो की व्यक्तिगत जीवनातील शिंतोडे अमिताभने प्रत्येकवेळी आत्मभान जपले आणि त्यामुळे प्रत्येक चित्रपट ‘बॉक्स ऑफिस’वर यशस्वी झाला नाही, तरी त्याने आपल्या प्रतिमेला जराही धक्का पोहोचू दिला नाही. सत्तराव्या वाढदिवशी रसिकांचे ऋण मान्य करत असतानाच पुढील योजना आखू शकणाऱ्या या अभिनेत्याला त्यामुळेच सलाम करायला हवा!