अन्वयार्थ : अवसानघातकी निर्णय Print

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२

रॉबर्ट वढेराचा जाहीर बचाव करण्याचा उद्योग काँग्रेस पक्षाने सध्या थांबविला असला तरी गांधी घराण्याच्या बचावासाठी हरयाणातील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. हरयाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीमागे अन्य कोणतेही कारण असू शकत नाही. हरयाणा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेऊन ही बदली प्रशासकीय कारणासाठी झाल्याचा दावा सरकार आणि मुख्य सचिव करीत असले तरी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात घडलेल्या घटना पाहता वढेरांच्या व्यवहारात नाक खुपसण्याची किंमत खेमका यांना द्यावी लागली हे सहज कळून येते.

डीएलएफ कंपनी व वढेरा यांच्यातील काही व्यवहारांची चौकशी खेमका यांनी सुरू केली होती. स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी या वढेरा यांच्या कंपनीने फेब्रुवारी २००८ मध्ये शिकोहपूर येथे साडेतीन एकर जमीन घेतली. साडेसात कोटी रुपयांना घेतलेली ही जमीन चार वर्षांत डीएलएफला ५८ कोटी रुपयांना विकण्यात आली. जमीन विक्रीच्या व्यवहाराची कागदपत्रे अवघ्या काही दिवसांत पूर्ण करण्यात आली. वस्तुत: अशा व्यवहाराची सरकारी पातळीवर पूर्तता होण्यास काही महिने लागतात. हा सर्व व्यवहार खेमका यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी ८ ऑक्टोबर २०१२ रोजी याची चौकशी सुरू केली. हरयाणा सरकारला हे कळताच ११ ऑक्टोबर रोजी खेमका यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आले. त्यानंतर काही तासांतच त्यांची बदली करण्यात आली. प्रशासकीय सोय म्हणून बदली झाली असेल तर खेमका यांची निदान समान दर्जाच्या पदावर नेमणूक करायला हवी होती. तसे न करता हरयाणा सीड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक पदावर त्यांना पाठविण्यात आले. त्यांच्याहून बारा वर्षांनी कनिष्ठ असणारा सनदी अधिकारी त्याआधी हे पद सांभाळीत होता हे लक्षात घेतले म्हणजे खेमका यांची बदली हा प्रशासकीय शिक्षेचाच प्रकार ठरतो. अर्थात खेमका यांना अशा सरकारी मनमानीची सवय आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष समजले जाणारे खेमका जिथे जातात तेथील भ्रष्टाचार संपविण्यास सुरुवात करतात. यामुळे २१ वर्षांच्या त्यांच्या नोकरीत ४२ वेळा त्यांची बदली झाली आहे. सनदी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या नोकरीच्या नियमानुसार एका पदावर किमान दोन वर्षे तरी काम करणे अपेक्षित असते. पण खेमका यांना कोणत्याच पदावर सहा महिन्यांहून अधिक काळ काम करता आले नाही. खेमका यांनी बडगा उगारला की हितसंबंधींची फौज एकत्र येऊन त्यांची बदली करून टाकते.  आता वढेरांमुळे त्यांना जावे लागले. केजरीवाल यांनी वढेरा यांच्या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला तेव्हा काँग्रेसने बराच थयथयाट केला. निरपराध व्यावसायिकाला, केवळ तो गांधी घराण्याशी संबंधित आहे म्हणून लक्ष्य केले जात आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते; परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्याचे खेमका यांच्या बदलीवरून स्पष्ट होते. व्यवहार सचोटीचा असेल तर चौकशीने काहीच बिघडले नसते. वढेरा प्रकरणात अन्य कोणी लक्ष घालू नये, असा इशारा अन्य अधिकाऱ्यांना द्यावा असाही हेतू यामागे असू शकतो. काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या असल्या राजनिष्ठेमुळे संशय अधिक वाढत जातो. काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या असल्या कारभारामुळे विश्वासार्हता पुरती लयाला जात आहे.