अन्वयार्थ : पवारांचा अजेंडा Print

 

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात पार पडलेले राज्यव्यापी अधिवेशन ही आगामी निवडणुकांची तयारी होती, हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणावरून पुरेसे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे कारभारी आपणच आहोत आणि असू हे त्यांचे विधान जसे एकाच दगडात अनेक पक्षी मारणारे होते, तसेच अजित पवारांना या वेळी देण्यात आलेल्या विशेष स्थानामुळे नक्की काय होणार, असाही संभ्रम त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करून टाकला. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी येत्या काही काळात समाजातल्या कोणत्या घटकांना जवळ करायचे आहे, याचे सुस्पष्ट निवेदन अधिवेशनाच्या निमित्ताने करून टाकले आहे.

पवार जेव्हा कोणाची भलामण करतात, तेव्हा त्यांना आपल्या भात्यात नव्या बाणांची भर घालायची असते. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याच्या प्रश्नावर खुद्द पवार यांना यापूर्वीच पुढाकार घेता आला असता. पण तसे करण्याऐवजी आपल्या शैलीत त्यांनी त्यांचेच सहकारी लक्ष्मण ढोबळे यांची फिरकी घेत आपला अजेंडा जाहीर करून टाकला. या प्रश्नी सर्व दलित आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा उल्लेख ढोबळे यांनी भाषणात केला ; त्यावर पवारांनी ‘फक्त दलित आमदारच का,’ असा प्रतिप्रश्न करून डॉ. आंबेडकर हे साऱ्या देशाचे आहेत, अशी टिप्पणी केली. देशातील मुस्लिमांचा होणारा छळही त्यांच्या भाषणाचा बराच भाग व्यापणारा होता. मुळात पवार यांची प्रतिमा पुरोगामी अशीच असताना, मुस्लिमांना समाजात सामावून घेऊन त्यांची दु:खे दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्याचे तरी काय कारण होते?  महाराष्ट्र हे सर्व भाषकांचे आहे, अशीही एक भूमिका जाहीर करून त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या धोरणाशी असलेला आपला विरोध स्पष्ट करून टाकला. या राज्यात सगळ्याच प्रांतातील नागरिकांना सुखाने राहता यायला हवे, असे सांगून त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा रोखच स्पष्ट केला. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी झाल्याच्या सततच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी ७३ टक्के बहुभाषक असलेल्या समाजाचाही मुंबईच्या आणि पर्यायाने राज्याच्या विकासात वाटा असल्याचे मत त्यांनी जाहीर करून ज्या ८८ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या विजयावर हिंदी भाषकांचा वरचष्मा असतो, तेथील निवडणुकांची एक प्रकारे तयारीच करून टाकली. नागरी आणि ग्रामीण प्रश्नांचा आढावा घेत, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात या साऱ्या प्रश्नांचा सविस्तरपणे ऊहापोह करण्यामागे काही हेतू निश्चितच असला पाहिजे. पिण्याचे पाणी उसासाठी पळवू नका, असा सल्ला देणारे शरद पवार आणि साखर कारखान्यांसाठी हजारो कोटींची पॅकेजेस देणारे शरद पवार एकच आहेत का, असा संभ्रम पडावा, असे त्यांचे वक्तव्य होते. राज्याचे समग्र चित्र सादर करताना गेली पंधरा वर्षे आपलीच सत्ता राज्यात होती आणि किमान काही महत्त्वाच्या खात्यांच्या मार्फत यातील काही प्रश्न नक्कीच धसाला लावता आले असते, हे त्यांच्या लक्षात नसेल, असे तरी कसे म्हणावे? निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी ‘स्वबळ’ वाढवत  असल्याचे भाकीत करण्यासाठी शरद पवारांचे हे भाषण पुरेसे म्हटले पाहिजे.