अन्वयार्थ : मोदींची धावाधाव Print

 

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

सत्तेच्या मिजाशीत मश्गूल असताना माणसांची किंमत बहुधा कळत नाही. ती कळते निवडणूक जवळ आल्यावर. माणसे आपलीशी करण्यासाठी सत्ता वापरायची की सत्तेच्या दर्पाने माणसांना दूर लोटायचे हे ज्याच्या त्याच्या स्वभावधर्मावर अवलंबून असते. वसंतदादा पाटील वा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा माणूस सत्तेतून अनेकांना जवळ करतो. आपलेपणाने बांधून घेतो. पण अशा व्यक्ती विरळा. सत्तेवर असताना अन्य माणसांची किंमत न करणारेच अधिक. नरेंद्र मोदी हे किंमत न करणाऱ्यांतील आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर फिदा असणारा मोठा वर्ग या देशात आहे.

गुजरातमध्ये लक्षणीय काम करून मोदींनी केवळ गुजरातमध्ये नव्हे, तर देशात अफाट लोकप्रियता मिळवली. तथापि असे काम एकटय़ाच्या जीवावर होत नाही. यशाला अनेकांचा हातभार असतो. मोदींना हे कधीच मान्य नव्हते. एकहाती कारभारामुळे माणसे जोडण्यापेक्षा तोडण्याकडे त्यांचा कल अधिक. मोदींचे कर्तृत्व लांबून पाहताना छान वाटते, पण त्यांच्याबरोबर काम करणे कठीण असते, असा अनेकांचा अनुभव आहे. सहकाऱ्याला स्वातंत्र्य देणे, सहकाऱ्याच्या गरजांची दखल घेणे हे त्यांच्या स्वभावात नाही. राजकारणात विरोधक असायचेच. त्यांचा विरोध समजून घेऊन पुढे जायचे असते. त्याऐवजी विरोधकांचे उच्चाटन करण्यास मोदी प्राधान्य देतात. गुजरातविरोधात कट चालू आहे, अशी भाषा ते नेहमी करतात; पण वस्तुत: हा कट आपल्याविरुद्ध सुरू आहे अशी त्यांची मानसिकता झाली आहे. कटाची मानसिकता अंगी भिनली की कोणाबद्दलही विश्वास वाटेनासा होतो. या मानसिकतेमुळेच मोदींनी प्रथम केशुभाई पटेल, नंतर संजय जोशी अशा उपयोगी माणसांचे पंख कापले. सत्ता हाती असल्यामुळे या कामात त्यांना यशही आले. संजय जोशी यांची तर राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याचा हट्ट मोदींनी धरला. परंतु आता गुजरातमध्ये केशुभाई व संजय जोशी एकत्र आले. विश्व हिंदू परिषदेचे तोगडिया यांची त्यांना साथ मिळाली. हे समीकरण निवडणुकीत धोक्याचे ठरेल याची कल्पना येताच या तिघांना शांत करण्यासाठी मोदींनी नागपूरच्या ‘श्रद्धास्थाना’कडे धाव घेतली. बऱ्याच दिवसांत सरसंघचालकांची भेट झाली नव्हती म्हणून नागपूरला आलो, असे मोदी म्हणाले. गेल्याच महिन्यात संघाचे सर्व नेते बडोद्यात होते. तेथे मोदींनी का भेट घेतली नाही? त्या वेळी मोदी सत्तेच्या मस्तीत होते. मात्र केशुभाई, संजय जोशी यांच्यामागे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे व संघाचे कार्यकर्तेही नाराज आहेत याचा वास येताच धूर्त मोदींना भागवतांचे पाय धरावेसे वाटले. आम्हाला गृहीत धरू नका, असा संदेशही कदाचित संघाकडून गेला असेल. अशा प्रकारे हात पिरगळण्याची परंपरा संघात आहे. संघ नाराज झाला म्हणून मोदींचा गुजरातमध्ये पराभव होईल असे नाही. पण त्यांना हवे तसे उल्लेखनीय यश नक्कीच मिळणार नाही. गुजरातमध्ये कामचलाऊ यश मिळाल्यास मोदींना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतील. मोदींना उल्लेखनीय यश हवे आहे व त्यासाठी सर्व थरांतून पाठिंबा हवा आहे. म्हणून त्यांना नागपूरला धावावे लागले. विरोधकांची मने वळविण्याची आर्जवे श्रद्धास्थानावर तीन तास करावी लागली. मोदींची विनवणी संघाने मान्य केली काय हे लवकरच समजेल. पण मोदींचा स्वभाव पाहता तुटलेली मने सांधली जातीलच असा भरवसा नाही. मोदींचा पराभव होणार नाही, पण विजय निर्भेळ असण्याचीही शक्यता नाही हे आत्ताच जाणवू लागले आहे.