अन्वयार्थ : ‘चरखा’, ‘खादी’ आणि ‘चरबी’.. Print

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

जवळपास पाऊणशे वर्षांपूर्वी देशाच्या राजकारणाला ‘चरखा’ या एका सामान्य शब्दाने एक निर्मळ दिशा दिली. महात्माजींचा अहिंसात्मक स्वातंत्र्यलढा, देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरची पासष्ट वर्षे अशा प्रदीर्घ प्रवासात चरखा या शब्दाच्या अर्थाला नवनवे पैलू पडत गेले आणि त्या प्रत्येक पैलूतून राजकारणाचे नवनवे रंगदेखील परावर्तित होऊ लागले. ‘चरखा’ आणि ‘खादी’ यांचे नाते स्पष्ट करण्यासाठी शब्दांची गरज नाही. खादी ही चरख्याची देणगी आहे.

पण अलीकडच्या काळात राजकारण जसजसे बदलत गेले, ‘संधी’चे महत्त्व वाढत गेले, तसतशी या दोन शब्दांना नव्या राजकारणात उपेक्षेची झालर चढविली जाऊ लागली. तरीही, हे शब्द राजकारणात दिमाखानेच वावरतात, असे दिसून येते. आजकाल एखाद्या नेता-कार्यकर्त्यांचे राजकीय वजन मोजण्याची जी काही मोजकी साधने सामान्य माणसाकडून वापरली जातात, त्यामध्ये झालर लावलेल्या या दोन शब्दांचा वारंवार उच्चार होतो. खरे म्हणजे, एखाद्या नेता-कार्यकर्त्यांचे राजकीय वजन हे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, असे मानले जात असे. म्हणजे, शारीरिक वजन वाढल्याने राजकीय वजन वाढतेच असे नाही. उलट, शारीरिक वजन वाढविणारी ‘चरबी’ काढून टाकल्यानंतरच राजकीय वजन वाढते, याचे भाजपाध्यक्ष नितीन गडकरी हे स्पष्ट उदाहरण आहे. म्हणजे, ‘चरबी’ हा राजकीय ‘वजनवाढी’तील अडथळा असावा, असे गडकरी यांना वाटत असावे. असे असतानाही, ‘चरखा’, ‘खादी’ यांच्याच रांगेत आता ‘चरबी’चाही समावेश होऊ पाहत आहे. राजकीय वजन आणि चरबी यांचा परस्परांशी संबंध नाही, असे गडकरींसारखा एखादा नेता मानत असला, तरी दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षात ‘चरबीयुक्त राजकीय वजन’देखील महत्त्वाचे ठरू शकते, असे अलीकडच्या काही उदाहरणांमुळे मान्य करावे लागेल. ‘चरणे’ आणि ‘खाणे’ या दोन शब्दांच्या चपखल ‘संधी’तूनच, ‘चरखा’ या शब्दाला नवा राजकीय अर्थ मिळाला. खादीलादेखील नव्या राजकारणात वेगळ्याच अर्थाने महत्त्व प्राप्त झाले. चरबी या शब्दाचे ‘चरणे’ या शब्दाशी असेच जवळचे राजकीय नाते जुळू लागले आहे. म्हणजे, ‘चरखा ते चरबी’ असे आपल्या आसपासच्या राजकारणाच्या प्रवासाचे वर्णन करता येऊ शकेल. आपल्याकडे, ‘आबा’ आणि ‘बाबा’ अशा दोन भारदस्त व्यक्तिमत्त्वांभोवती राजकारण फिरताना दिसते. त्यामध्ये ‘बा’ हे अक्षर सामायिक असल्याने, राजकारणात ‘बा’चे महत्त्वही वाढू लागले आहे. परवा पुण्यात भरलेल्या एका राजकीय मेळाव्यात आबांच्या उपस्थितीत बाबांना कोपरखळ्या मारताना, ‘कुणाच्या ‘बा’ला घाबरण्याचे कारण नाही,’ असा संदेशही दिला गेला. अशी धमक अंगात येण्यासाठी तेवढी चरबी अंगात असावी लागते, याचे भान राजकारण्यांशिवाय अन्य कुणाला असणे गरजेचे नाही. त्यामुळे राजकारणाच्या वाटचालीत चरखा, खादी संस्कृतीबरोबर आता चरबी संस्कृतीचा प्रसारही जोमाने सुरू झालेला दिसतो. मात्र कुणाच्याही ‘बा’ला घाबरायचे नाही, अशी शिकवण देण्यासाठी अंगात ‘टगेगिरी’ भिनलेली असली पाहिजे. ढोपरापासून कोपरापर्यंत चामडी सोलून काढणे, चाबकाने फोडणे, कुणाच्या ‘बा’ला न घाबरणे, अशी या नव्या राजकीय संस्कृतीची शिकवण असेल, असे मानावयास हरकत नाही.