अन्वयार्थ : ‘आयडॉल’चे अध:पतन Print

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

लार्न्‍स आर्मस्ट्राँग ही सायकलिंगची नव्हे; तर अवघ्या जगाची दंतकथा होती. टूर द फ्रान्ससारखी सर्वात अवघड स्पर्धा सलग सात वेळा जिंकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होता. हा विक्रमही त्याने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर रचला होता. कर्करोगाशी दिलेली लढत त्याने शब्दबद्ध केली तेव्हा वाचकांच्या त्याच्यावर उडय़ा पडल्या. आजही विक्रमी विक्री होणाऱ्या पुस्तकांमध्ये आर्मस्ट्राँगच्या आत्मकथेचा समावेश आहे. सायकलिंगमध्ये तो दरवर्षी जिंकत राहिला. भरघोस रकमेची बक्षिसे पटकावू लागला. नाइकीसारख्या कंपन्याशी केलेल्या करारातून अब्जावधी डॉलर्स त्याने कमावले.

मात्र हा पैसा स्वत:पाशी न ठेवता लीव्हस्ट्राँग ही संस्था निर्माण केली आणि त्यातून कर्करोगाशी लढणाऱ्यांना मदत सुरू केली. या त्याच्या कृतीमुळे कौतुकाची जागा आदराने घेतली. लार्न्‍स आर्मस्ट्राँग हा केवळ खेळाडू राहिला नाही तर जगाचा आदर्श झाला. तरुणांचा आयडॉल झाला. त्याची छबी असलेले टीशर्ट जगभरची तरुणाई अभिमानाने अंगावर मिरवू लागली. असे घवघवीत यश क्वचितच कुणाच्या वाटय़ाला येते. कर्करोगाने खंगलेली व्यक्ती केवळ इच्छाशक्ती व काही औषधांच्या जीवावर इतकी मोठी मजल मारू शकेल का, अशी शंका काही जण पूर्वीच बोलून दाखवीत होते. पण आर्मस्ट्राँगच्या लोकप्रियतेपुढे टीकेचा आवाज क्षीण ठरत होता. परंतु आर्मस्ट्राँग उत्तेजक द्रव्ये सेवन करीत असावा, अशी शंका २००५पासून उघडपणे व्यक्त होऊ लागली.  मात्र गेल्या महिनाभरात लार्न्‍सच्या अमानवी ताकदीमागचे गुपित उघड झाले. उत्तेजक द्रव्याच्या सेवनाची तपासणी करणाऱ्या अमेरिकेतील ‘उसाडा’ या संस्थेने खोलवर तपास करून लार्न्‍सला दोषी ठरविले. उसाडाशी लार्न्‍स प्रतिवाद करू शकला नाही. एका अहवालाने लार्न्‍सची सर्व कारकीर्द मातीमोल झाली. लार्न्‍सच्या अचाट विक्रमांमागे उत्तेजक द्रव्यांची ताकद होती. ही लोकांची फसवणूक होती. नैसर्गिकरीत्या ताकद वाढवून त्याने ही मजल मारली नव्हती. यशाचा हव्यास त्याला नडला व उत्तेजक द्रव्यांचा शॉर्टकट घेण्याचा मोह त्याच्यासारख्या झुंजार खेळाडूलाही आवरला नाही. आता संपत्ती गेली व प्रतिष्ठाही लोप पावली. पण त्याहून मोठे नुकसान आर्मस्ट्राँगवर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांचे झाले. त्यांचे प्रेरणास्थान नष्ट झाले. मानव काय चमत्कार करू शकतो याचे उदाहरण म्हणून लार्न्‍सकडे बोट दाखविणाऱ्यांना आता खंतावून मान खाली घालावी लागेल. हे नुकसान केवळ लार्न्‍सचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या इच्छाशक्तीचे आहे. यशाचा हव्यास मानवातील सुदृढ प्रेरणांना मातीमोल करून गेला. मात्र त्यातही कौतुक वाटते ते ‘उसाडा’चे. लार्न्‍स हा अमेरिकेचा आयकॉन. पण त्याची चोख चौकशी करण्यात उसाडाने कोणतीही हयगय केली नाही. आर्मस्ट्राँग अमेरिकेचा देव होता, पण देवाचीही नियमांतून सुटका होत नाही हे ‘उसाडा’ने दाखवून दिले. ‘उसाडा’वर अनेक बाजूंनी दबाव आला असेल. पण संस्थेचे पदाधिकारी त्या दबावाला पुरून उरले. अमेरिकेच्या सरकारनेही हस्तक्षेप केला नाही. आर्मस्ट्राँगने केलेल्या फसवणुकीमुळे मानवी इच्छाशक्तीवरील श्रद्धा थोडी ढासळली असली तरी ‘उसाडा’ने केलेल्या सत्यशोधनामुळे सावरलीही आहे. झगडण्याची मानवी प्रेरणा अद्याप संपलेली नाही.