अन्वयार्थ : लोकप्रियतेचा ‘फॉम्र्युला’! Print

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२

फॉम्र्युला-वन हा मनोरंजनपर आणि टीव्हीसमोर बसून आनंद घेण्यासारखा खेळ. ‘याचि देही, याचि डोळा’ हा खेळ पाहणाऱ्यांना वेगाचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येतो; पण सर्किटच्या एका कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकांना समोरून येणारी कार कोणाची हे समजण्याआधीच ती कार डोळ्यांसमोरून बऱ्याच पुढे गेलेली असते. म्हणूनच फॉम्र्युला-वन हा खेळ टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्याच अधिक आहे. ३०० कि. मी. वेगाने पळणारी कार जगातील कोणत्याही रस्त्यांवर धावत नाही. भारतात तर ताशी १४० कि.मी. वेगाने कार चालवण्याच्या पात्रतेचेही रस्ते नाहीत. भारतीय चाहत्यांचे फॉम्र्युला-वनविषयीचे आकर्षण हे स्वप्नवत आहे.फॉम्र्युला-वनमध्ये वेग हा महत्त्वाचा घटक असला तरी पैसा आणि तंत्रज्ञान या जोरावरच हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय होऊ शकला. प्रत्येक संघ एका वर्षांला अब्जावधी डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करत असतात. त्यात त्यांचा २० कोटी डॉलरपेक्षा जास्त खर्च असतो तो इंजिनवर. इंजिनच्या तंत्रज्ञानात बदल करण्यासाठी प्रत्येक संघाचे अभियंते दिवस-रात्र मेहनत घेत असतात. इंजिनचा वेग एकेका सेकंदाने वाढण्यासाठी न झोपताही त्यांचे अहोरात्र परिश्रम सुरू असतात. म्हणूनच वेगाच्या या खेळामध्ये जास्त पैसा खर्च करण्याची तयारी असलेला संघच बाजीगर ठरतो. भारताचा एकमेव फॉम्र्युला-वन ड्रायव्हर असलेल्या नरेन कार्तिकेयनच्या वाटय़ाला कमी बजेट असलेला हिस्पानिया संघ आला आहे. त्यामुळे वेग असूनही कारची क्षमता नसल्यामुळे कार्तिकेयन मागे पडत आहे. सॅबेस्टियन वेटेलच्या कारवर रेड बुल संघ अधिक पैसा खर्च करत असल्यामुळे अन्य ड्रायव्हरपेक्षा वेटेल सरस ठरत आहे. फॉम्र्युला-वनमध्ये संघ विकत घेण्यासाठीही किमान अडीच कोटी युरो इतकी गुंतवणूक सुरुवातीलाच करावी लागते. त्यानंतर कार, संघ विकत घेणे या बाबतीत खर्चाचा आकडा त्यापेक्षाही मोठा असतो. २००७मध्ये नऊ कोटी युरोंना फोर्स इंडिया संघ विकत घेणाऱ्या विजय मल्ल्या यांचे ग्रह सध्या फिरले असले तरी त्यांचा संघ मात्र अमाप पैसा खर्च करतो. मल्ल्यांची किंगफिशर एअरलाइन्स गाळात असली तरी त्यांचा फोर्स इंडिया संघ मात्र ऐटीत आहे. किंगफिशर बंद पडणार असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागणार आहे, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत, किंगफिशर एअरलाइन्स चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. पण मग फोर्स इंडियासाठी मल्ल्यांकडे पैसा आला कुठून, हा प्रश्न सर्वानाच पडत आहे. प्रत्येक संघाला आपल्या मायदेशात एक फॉम्र्युला-वन शर्यत आयोजित करण्याची संधी मिळते. पण चार-पाच वर्षांपूर्वी भारतासारख्या देशात फॉम्र्युला-वन शर्यत होईल, असा विचार कुणी स्वप्नातही केला नसावा. पण जेपी समूहाने बुद्ध इंटरनॅशनल सर्किटसारखा जागतिक दर्जाचा ट्रॅक, अत्याधुनिक सोयीसुविधा आणि जगातील सर्वात वेगवान ट्रॅक बनवून सर्वाची वाहवा मिळवली. पण हे यश खरोखरच भारताचे आहे का, असा प्रश्न सर्वाना पडतो. ५.१४ किलोमीटरचा हा ट्रॅक बांधण्यासाठी त्यांनी २१.५ कोटी डॉलर खर्च केले. ८७४ एकर जमिनीवर हा ट्रॅक उभारण्यासाठी त्यांनी अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारी भावाने कवडीमोलाने विकत घेतल्या. पैसा असेल तर सर्व काही विकत घेता येते, हे त्यांनी दाखवून दिले. फॉम्र्युला-वनच्या लोकप्रियतेचाही त्याला अपवाद नाही!