अन्वयार्थ : वादळ आणि ‘जागतिक’ घबराट Print

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर थडकून न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या शहरांना वेठीस धरणाऱ्या ‘सँडी’ नावाच्या हरिकेनने (चक्रीवादळाने) कॅरिबियन बेटांपासूनच तडाखे देत तब्बल ८० जणांचे बळी घेतले. या वादळाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फटका पाच कोटी अमेरिकनांना होणार असल्याचे सांगण्यात येते. दहा लाख रहिवाशांचे स्थलांतर, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज अपवादात्मक सलग दोन दिवसांसाठी बंद ठेवावे लागणे, याच शहरातील १०८ वर्षांपूर्वीचा सब-वे बंद ठेवणे, १५ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्दच करावी लागणे, मॅनहॅटनसारख्या प्रतिष्ठित भागात  पाच लाख घरांची वीज जाणे, राष्ट्राध्यक्षांना न्यूयॉर्क, न्यूजर्सी या शहरांसाठी आणीबाणी जाहीर करावी लागणे.. अशा वेगवेगळ्या परिणामांनी या वादळाची तीव्रता किती जास्त आहे हे दाखवून दिले.

या चक्रीवादळामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली ती, हे वादळ ‘ग्लोबल वॉर्मिग’चा- म्हणजे जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे का, याची! हे वादळ वर्षांच्या या काळात निर्माण होणे आणि त्याची तीव्रता इतकी असणे ही कारणे दाखवून ते अपवादात्मक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अमेरिकी मीडियाही या चर्चेत पुढे आहेच, तसेच अशी वादळे आता येतच राहणार, कारण आपण जागतिक तापमानवाढीच्या कडय़ावर पोहोचलो आहोत, अशी घबराट पसरवणारा या चर्चेचा सूर जगातील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला आहे. पण खरोखरच आताचे सँडी वादळ अपवादात्मक आहे का? याचा मागोवा घेतला तर वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर येते. मुळात अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर या दिवसात चक्रीवादळे येणे विशेष नाही. ती अ‍ॅटलांटिक महासागरात निर्माण होतात आणि अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याकडे सरकतात. मार्गात कधी कॅरेबियन बेटांवरही मोठे नुकसान घडवतात. अ‍ॅटलांटिक महासागरातील चक्रीवादळ निर्माण होण्याचा मुख्य हंगाम असतो, १ जून ते ३० नोव्हेंबर या दरम्यान. त्यामुळे हवामानाच्या वेळापत्रकानुसार या काळात चक्रीवादळ येणे स्वाभाविक आहे. दुसरी बाब म्हणजे चक्रीवादळाची तीव्रता. सॅन्डीमधील वाऱ्यांचा वेग साधारणत: ताशी १५० किलोमीटरच्या पुढे-मागे असल्याची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा वेग ताशी २५० किलोमीटपर्यंत पोहोचल्याचा इतिहास आहे. तिथली ‘कॅटेगरी ५’ तीव्रतेचे वादळ सर्वात भयंकर मानले जाते. तो दर्जा मिळण्यासाठी चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी २४५ किलोमीटर इतका असावा लागतो. तितका वाऱ्याचा वेग असलेली अनेक वादळे या भागात निर्माण झाली आहेत. २००५ साली तर एकाच वर्षांत ‘कॅटेगरी ५’ तीव्रतेची चार चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यामुळे सॅन्डी हे अपवादात्मक चक्रीवादळ आहे, हे मानण्यास काही आधार नाही. म्हणूनच, कोणतीही शहानिशा न करता त्याचा संबंध ग्लोबल वॉर्मिगशी जोडणे अतिघाई केल्यासारखे होईल. ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यावर  पर्यावरण तज्ज्ञांचा विश्वास आहे, पण  एखादे वादळ निर्माण झाले की त्याचा संबंध लगेच तापमानवाढीशी जोडणे हे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. हवामानामध्ये नैसर्गिकरीत्या काही चढ-उतार असतात. या घटनांचा इतिहास पाहिला की ही बाब ठळकपणे दिसून येते. पण हा इतिहासच विसरला की प्रत्येक मोठी घटना ही अपवाद वाटू लागते. सध्या असेच काही घडत आहे. विस्तृत अभ्यासाविना प्रत्येक घटनेशी ग्लोबल वॉर्मिगचा संबंध जोडण्यामुळे त्यातील गांभीर्य कमी होते. सध्या ग्लोबल वॉर्मिगबरोबरच वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा हा धोकासुद्धा तितकाच मोठा आहे.