अन्वयार्थ : मोदींचा दिग्विजय Print

 

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे कधीही आमच्याकडे व्हिसासाठी अर्ज करू शकतात, असे सांगून जणू अमेरिकेने आता मोदींनी व्हिसा घ्यावाच, असे आर्जव केले आहे. मोदी हेच पंतप्रधानपदाचे लायक उमेदवार आहेत, या त्यांच्या काही लाख चाहत्यांच्या विश्वासाला बळकटी देणाऱ्या घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर घडू लागल्या आहेत. २००२ मधील गुजरातमधील नरोडा पतियासारख्या हत्याकांडांमुळे ब्रिटनप्रमाणे अमेरिकेनेही मोदींपासून चार हात लांब राहण्याचे धोरण स्वीकारले होते. मोदींशी व्यापारी संबंध ठेवण्यात आपलेच हित आहे हे कळत असूनही हत्याकांडांचे माप ज्या-त्या आमदाराच्या पदरात सर्वोच्च न्यायालयाने घालण्याची वाट या देशांना पाहावी लागली.

अखेर दहा वर्षांनी मोदींशी सहकार्याची संधी या दोन्ही देशांनी साधलीच. आंतरराष्ट्रीय पत अशी वाढत असताना राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियता वाढविण्यासाठी मोदी यांना विविध मार्गाचा वापर करावा लागतो आहे -तोही एकटय़ाने आणि एकहातीच- याचा दोष मात्र काँग्रेसइतकाच भारतीय जनता पक्षालाही स्वीकारावा लागेल. जे मोदी गुजरातमध्ये धर्म-जात यांच्या दशांगुळे वर जाऊन केवळ विकास आणि विकासाचेच राजकारण करतात, त्यांना राज्य निवडणुकीच्या प्रचारातही ‘सोनिया मायनो-गांधी’ हे नाव घेऊन टीका करावी लागते, हे पाप शंभर टक्के काँग्रेसचेच! पण यापैकी ‘मायनो’चा उच्चार द्वय़र्थी वाटेल असा करावा लागतो, तो मोदींसारख्या कर्तृत्ववंत नेत्याऐवजी एखाद्या फुटकळ कार्यकर्त्यांने केला असता तरी तितकाच अपमानकारक ठरला असता. मान मोदींनाच मिळतो, म्हणून विरोधकांचे व्यक्तिगत अपमान करण्यातही त्यांनीच वेळ घालवावा, असे अन्य भाजपनेत्यांना वाटते काय? काँग्रेससारख्या पक्षाला मुखस्तंभांनी राज्य करावे आणि गणंगांनी विरोधकांबद्दल अद्वातद्वा बोलत सुटावे, अशी व्यवस्था मानवते. त्या पक्षाने पंतप्रधानपदासाठी निवडलेली व्यक्ती, मोदींच्याच शब्दांत सांगायचे तर ‘मौन’मोहन असते आणि शाब्दिक फुलबाज्या उडवून जनतेचा वेळ निव्वळ वाया जावा, याची काळजी दिग्विजय सिंगांसारखे बोलबुणगे घेत असतात. भाजपकडे ही असली व्यवस्था नाही. त्यामुळेच बहुधा, मोदींच्या शिरावर नाना जबाबदाऱ्या पडतात. माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती अद्याप दिलीच गेलेली नाही, ती दिली गेल्याची कविकल्पना करून एक फुगीर आकडा सांगण्याचे काम मोदींना करावे लागले होते. विषय फार महत्त्वाचा, सरकारी पैशावर दरोडय़ाचा, पण मोदींचेच खरे कसे, हे भाजपमधील नेत्यांनी जनतेला सांगितले असते, तर आठवडय़ाभरात तो- आज खुद्द मोदींनाही न आठवणारा विषय संपला नसता.
अगदी आतादेखील भाजपच्या अन्य नेत्यांनी मौन बाळगल्याने मोदींना बोलावे लागले. थरूर यांनी जिच्याशी लग्न केले होते, त्या माजी मैत्रिणीचा -म्हणजे विद्यमान पत्नीचा- उल्लेख मोदींना करावा लागला. परस्त्री मातेसमान मानण्याचे संस्कार असलेले मोदी, ‘वाह क्या गर्लफ्रेंड है, आपने देखी है कभी पचास करोड की गर्लफ्रेंड?’ अशी टवाळ-नाक्यावर शोभणारी भाषा करताहेत, त्याबद्दल महिलावर्गात किती नाराजी पसरते आहे आणि साधी माफीदेखील मागण्याचे स्वातंत्र्य मोदींना नाही, हे सारे मोदींना भाजपची पुरेशी साथ नसल्यामुळेच घडू शकते. ती असती, तर दिग्विजय सिंगांना वा तत्सम विदूषकांना शोभणारी वक्तव्ये मोदींना करावी लागली नसती. मोदींचा दिग्विजय होण्यासाठी एखाद्या तरी निष्ठावंताने स्वत:च्या आकांक्षा बाजूला ठेवल्याच असत्या.