अन्वयार्थ : विरोधाची ‘उत्स्फूर्त’ चक्रे.. Print

 

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

समाजात काही चांगले घडावे अशी अपेक्षा सगळेजण व्यक्त करत असतात. मुंबईकरांनी स्वत:च एक पाऊल पुढे टाकून काही चांगले घडविण्याची उत्स्फूर्त सुरुवातदेखील केली आणि त्यामध्ये सहभागी होण्याची संधीही मुंबईकराला मिळाली. त्यासाठी सरकारी फतवा काढला गेला नाही किंवा सरकारी यंत्रणांच्या संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली गेली नाही. ‘आपल्या हितासाठी आपलाच पुढाकार’ हा बाणा पुन्हा एकदा मुंबईकरांनी जागविला.

मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची नियोजनशून्य अंमलबजावणी करण्याआधी केवळ नवी छापील भाडेपत्रिका वितरित करण्यापलीकडे काहीही पूर्वतयारी राज्याचे परिवहन खाते करू शकलेले नसल्याने प्रवाशांची दुहेरी लूट सुरू झाली. अद्यापही रिक्षा-टॅक्सीचे मीटर जुन्याच पद्धतीने, बेलगामपणे पळत आहेत, मीटरमधील हेराफेरीच्या तक्रारी सुरूच आहेत आणि रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मुजोरीपुढे सामान्यांची गळचेपी सुरूच आहे. सरकारी यंत्रणा मात्र सुस्तच आहे, हे अनुभवलेल्या मुंबईकरांनी अखेर धडा शिकविण्याचा सुसंस्कृत मार्ग अवलंबिला आणि मुजोर रिक्षा-टॅक्सीचालक, त्यांचे पुढारी आणि त्यापुढे नमते घेणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात अंजन घातले. भाडेवाढीच्या निषेधार्थ बुधवारी पाळलेल्या ‘रिक्षा-टॅक्सी बंद’ आंदोलनाला शहर आणि उपनगरातही उत्स्फूर्त प्रतिसाद देत, ‘मुंबईकराला कधीही वेठीला धरावे’ या समजुतीला मुंबईकरांनीच धक्का दिला. सहनशीलता हा मुंबईकराचा स्वभाव आहे. उपनगरी रेल्वेगाडीच्या डब्यातील आसनावरील ‘चौथी सीट’ हे मुंबईकरांच्या एकमेकांना सांभाळून घेण्याच्या सवयीचे प्रतीक आहे. या चौथ्या सीटमुळे मुंबईकरांमध्ये सामंजस्याची, सहनशीलतेची जाणीव रुजून राहिलेली आहे. त्यामुळे, बुधवारी मुंबईकरांनी मूकपणे पुकारलेले हे रिक्षा-टॅक्सीविरोधी आंदोलन सर्वत्र शंभर टक्के यशस्वी व्हावे अशी अपेक्षाच नव्हती. कारण, असे आंदोलन पुकारल्यानंतर अन्य पर्यायी साधनांची योग्य साथ मिळण्याची आवश्यकता असते. रिक्षा-टॅक्सीच्या मनमानीला नकार देणारा मुंबईकर पर्यायी व्यवस्थेसाठी बेस्ट उपक्रमावर विसंबून राहणार, हे स्पष्टच होते. पण बेस्टची सेवा आजकाल ‘बेस्ट’ राहिलेली नाही.  तकलादू बसगाडय़ांमुळे ती बदनाम होऊ लागली आहे. या उपक्रमाच्या भरवशावरच बुधवारचे टॅक्सी-रिक्षा बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुंबईकरांनी जिवापाड प्रयत्न केले, पण काही ठिकाणी आंदोलनाची ही शक्ती क्षीण झाली. असे असले तरी मुंबईकरांच्या निर्धाराची ताकद या आंदोलनाने दाखवून दिली आहे. मुख्य म्हणजे, या आंदोलनासाठी कुणी पैसे गोळा केले नव्हते, कित्येक दिवस मोहिमा राबविल्या नव्हत्या, किंवा प्रसार माध्यमे वेठीलाही धरली नव्हती. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून याचा प्रसार झाला आणि प्रत्येकाने उत्स्फूर्तपणेच सहभाग घेतला- कुणा पुढाऱ्याने सांगितले, म्हणून नव्हे किंवा कुणाला पुढारी व्हायचे होते, म्हणूनही नव्हे!एका छोटय़ाशा उत्स्फूर्त सुरुवातीतून एक मोठा इशारा मात्र दिला गेला. एवढे झाल्यावरही डोळे मिटूनच बसायचे का, हे संबंधित यंत्रणांनी ठरवायचे आहे.