अन्वयार्थ : गडकरींचे शक्तिप्रदर्शन Print

 

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

भ्रष्टाचारांच्या आरोपांनंतर गप्प बसलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना आता कंठ फुटला असून सध्या ते राज्यभर आपले सत्कार करून घेत आहेत. त्यांचे- म्हणजे फक्त त्यांचेच- भाषण ऐकण्यासाठी पक्षाच्या साऱ्या कार्यकर्त्यांना गोळा करण्यात येत असून त्यांच्या उपस्थितीने सारा पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. माध्यमांनी स्वत:हूनच गडकरी यांच्याशी संबंधित संस्थांमधील गैरव्यवहारांचा तपास सुरू केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची फौजच त्यांच्या समर्थनार्थ माध्यमांपुढे िहडू लागली.

गडकरी यांनी आपण निर्दोष आहोत, एवढेच पालुपद पहिल्यापासून चालू ठेवल्याने त्यांच्या पक्षातील नेत्यांना काहीच नवे सांगता येईना. तरीही गडकरी यांनी आपल्यावरील आरोप परतवून लावण्यासाठी रॉबर्ट वढेरा यांच्यावरच शरसंधान सुरू केले. त्यानंतर बराच काळ त्यांनी मौन धारण केले. तो जेव्हा चर्चेचा विषय ठरू लागला आणि माध्यमांकडूनही त्यावर टीका होऊ लागली, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच गडकरी यांना जनतेच्या दरबारात जाण्याचा सल्ला दिला. तो शिरसावंद्य मानण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय नव्हता, कारण कोणत्याही स्थितीत दुसऱ्यांदा मिळालेले पक्षाध्यक्षपद त्यांना हातून जाऊ द्यायचे नाही. आपण निर्दोष आहोत, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, हा त्यांच्यावरील आरोपांचा खुलासा होऊ शकत नाही. वढेरा काय आणि गडकरी काय, दोघांनीही आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी दुसऱ्यांवर दुगाण्या झाडण्याचाच मार्ग स्वीकारला. वढेरा यांनी ‘मँगो पीपल’ ना वेठीस धरले, तर गडकरी यांनी वढेरा यांना. अध्यक्षपदाच्या पहिल्या काळात गडकरी यांना दिल्लीवर आपली छाप पाडता आली नाही, असे स्पष्टपणे दिसत असतानाच केवळ संघाच्या आग्रहामुळे त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदी ‘निवडण्याचा’ फार्स करण्यात आला. कर्तृत्व, स्वच्छ चारित्र्य आणि स्वच्छ प्रतिमा हे जर रा. स्व. संघाचे बळ असेल, तर मग संघाने कोणत्या कारणाने गडकरी यांना पुन्हा अध्यक्षपदी नेमले हे कळू शकत नाही. येत्या निवडणुकीत पक्षाला केंद्रात सत्ता हवी असेल, तर या त्रिगुणांनी मंडित झालेल्या व्यक्तीकडेच नेतृत्व द्यायला हवे. एकचालकानुवर्तित्व संघाच्या कार्यपद्धतीत मान्य होत असेल; मात्र तेच धोरण लोकशाहीतील सर्वात मोठय़ा राजकीय पक्षाला कसे लागू होऊ शकते? तसे झाल्यास काँग्रेस व  भाजपमधील एकचालकानुवर्तित्वात कोणताच गुणात्मक फरक नाही. अशा स्थितीत राम मंदिराचा मुद्दा पुढे करून काँग्रेसचा फायदा करून देण्यात काय हशील होते, हे राजकारणातील कुणालाच कळेनासे झाले आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी आला, तर भाजपलाही त्याचे फटके बसतील, त्यापेक्षा राम मंदिराचा मुद्दा पुढे करणे पक्षाच्या फायद्याचे आहे, असे जे गणित मांडले जाते, ते काँग्रेसच्याही फायद्याचेच ठरणारे आहे. अशा परिस्थितीत आरोपांचे खंडन इतक्या उशिराने करत हिंडण्याने गडकरी नेमके काय साध्य करीत आहेत, ते कळत नाही. भाजपचेच राज्यातील नेते गोपीनाथ मुंडे आपले तोंड विरुद्ध दिशेला करून उभे असतानाही पक्ष पूर्णत आपल्या पाठीशी आहे, असे भासवण्याचा हा खटाटोप वृथाच म्हणायला हवा.