अन्वयार्थ : मतलबी विरोध Print

 

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

देशातील चार महानगरांमधील सर्व दूरचित्रवाणी संचांसाठी सेट टॉप बॉक्स बसविण्याचा सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरविला असला, तरी केबल ऑपरेटर्सकडून त्याला होणारा विरोध अद्याप शमलेला नाही. हा विरोध मतलबी आहे व दुर्दैवाने त्याला राजकीय पाठबळ मिळते. कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय सरकारच्या नजरेतून टाळण्याची धडपड असा विरोध करण्यामागे आहे. सेट टॉप बॉक्समुळे ग्राहकांना सुरुवातीला हजार रुपये जादा मोजावे लागणार असले तरी त्यातून होणारे फायदे अनेक आहेत.

परंतु सध्या महागाईने तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवून सेट टॉप बॉक्सला लागणारी जादा किंमत ही जणू जबरदस्ती आहे असा आक्रोश केबल ऑपरेटर्सनी सुरू केला. मुंबईत त्याला शिवसेना व मनसेची साथ मिळाली. या दोन्ही राजकीय पक्षांच्या केबल व्यवसायात संघटना आहेत व त्यांची दहशतही आहे. तामिळनाडूत जयललिता यांनी विरोध सुरू केला, तर ममता बॅनर्जी यांनी नेहमीप्रमाणे गरिबांची बाजू घेत थयथयाट केला. कोणतेही नवे तंत्रज्ञान आणले की त्यामध्ये परकीय हात दाखवून व वाढत्या खर्चाची भीती घालून लोकांची दिशाभूल करायची हा उद्योग अनेक राजकीय पक्ष करतात. सेट टॉप बॉक्सला होणारा विरोध त्याला अपवाद नाही. या बॉक्समुळे केबल ऑपरेटर्सनी खरोखर किती जोडण्या केल्या आहेत त्याची निश्चित नोंद होईल. मग त्यानुसार केबल ऑपरेटर्सना कर भरावा लागेल. सध्या अशी यंत्रणा नसल्यामुळे केबल ऑपरेटर सांगेल त्या संख्येवर विश्वास ठेवून कर घेतला जातो. जादा कर हे ऑपरेटर्सचे दुखणे आहे व तो भरावा लागू नये म्हणून ते जनतेला वेठीला धरीत आहेत. सेट टॉप बॉक्समुळे ग्राहकांचे दोन फायदे होतील. बॉक्समुळे पडद्यावरील चित्र अधिक सुस्पष्ट दिसेल. प्रसारणातील विक्षेप कमी होतील. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ग्राहकांना हवी ती चॅनेल्स निवडता येतील. मोफत प्रसारित होणारी किमान शंभर चॅनेल्स दरमहा शंभर रुपयांत ग्राहकांना दिली जावीत, अशी नियामक मंडळाची शिफारस आहे. केबल ऑपरेटर्स त्याचे पालन करतील अशी अपेक्षा आहे. प्रसारण संस्थांवरही काही बंधने घालण्यात आली असून यामुळे ग्राहकाला निवडीचे बरेच स्वातंत्र्य राहील. सध्या असे स्वातंत्र्य नसल्याने केबल ऑपरेटर जे दाखवील ते ग्राहकाला निमूट पाहावे लागते. आवडणारी व खिशाला परवडणारी चॅनेल्स नव्या तंत्रज्ञानात ग्राहक निवडू शकतो. ग्राहक व सरकार या दोघांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होणार असून अधिक कर भरावा लागणे इतकाच तोटा केबल ऑपरेटर्सना होईल. मात्र व्यावसायिक प्रामाणिकता दाखविली तर त्यांचाही फायदा वाढेल. सध्याचे युग हे डिजिटल युग म्हटले जाते. सेट टॉप बॉक्समध्ये डिजिटल तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. केबल ऑपरेटर्स वापरीत असलेली अ‍ॅनलॉग पद्धत आता कालबाह्य़ झाली. सतत अद्ययावत होणे हा तंत्रयुगाचा धर्म आहे व त्याचा ग्राहकांनाही फायदा आहे. काही केबल ऑपरेटर्सच्या नादी लागून ग्राहकांच्या व्यापक हिताकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष करू नये. अर्थात केबल ऑपरेटर्सची मनमानी संपून तेथे खासगी प्रसारण सेवा देणाऱ्यांची मनमानी सुरू होणार नाही याचीही दक्षता सरकारला घ्यावी लागेल. तसे होण्याचा धोका नाकारता येत नाही. हा धोका सरकारने टाळला तर पुढील काही वर्षांतच देशभर डिजिटल दूरचित्रवाणीचे लाभ मिळतील.